घरफिचर्ससारांशचैतन्याची गुढी!

चैतन्याची गुढी!

Subscribe

होळीचा उत्सव संपतो ना संपतो तोच गुढीपाडवा चैतन्याची नवी पालवी घेऊन येतो. या सृष्टीतील नित्यनूतनता प्रकट करणारा हा सण. माणसाने किती कल्पकतेने हे सोहळे निर्माण केले? हे सण-उत्सव नसते तर मानवी जीवन निरस झालं असतं. जीवनात रंग भरण्याचे काम करतात ते हे सण उत्सव. म्हणूनच हे सर्व उत्सव म्हणजे मानवी जीवनातील एक प्रकारचं सेलिब्रेशनच. जुने जाऊद्या मरणालागुनी... असे कवी केशवसुतांनी म्हटले आहे. त्याचा संदर्भ वेगळा असला तरी होळी आणि पाडवा या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर हे पाहिले असता या कवितेचा अर्थ वेगळ्या बाजूनेही लक्षात येतो.

-डॉ. अशोक लिंबेकर

भारतीय संस्कृतीतील विविध सण, उत्सव यांना दीर्घ परंपरा आहे. मुळात ही संस्कृतीच निसर्गपूजक असल्याने मानवी जीवनात तिचे विविध कला, परंपरेमध्ये पडसाद उमटलेले दिसतात. ऋतुमानानुसार विविध प्रकारचे सण, उत्सव साजरे होतात. यासंदर्भात काही पौराणिक तर काही लौकिक आख्यायिका, दंतकथाही प्रचलित आहेत. या कथांनाही मानवी जीवनाचा प्रादेशिक गंध आहे. त्यात विविधता आहे. असे असले तरी एका व्यापक सांस्कृतिक पटावर यात एक प्रकारची एकता आहे.

- Advertisement -

होळीचा उत्सव संपतो ना संपतो तोच गुढीपाडवा चैतन्याची नवी पालवी घेऊन येतो. या सृष्टीतील नित्यनूतनता प्रकट करणारा हा सण. माणसाने किती कल्पकतेने हे सोहळे निर्माण केले? हे सण-उत्सव नसते तर मानवी जीवन निरस झालं असतं. जीवनात रंग भरण्याचे काम करतात ते हे सण उत्सव. म्हणूनच हे सर्व उत्सव म्हणजे मानवी जीवनातील एक प्रकारचं सेलिब्रेशनच. जुने जाऊद्या मरणालागुनी… असे कवी केशवसुतांनी म्हटले आहे.

त्याचा संदर्भ वेगळा असला तरी होळी आणि पाडवा या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर हे पाहिले असता या कवितेचा अर्थ वेगळ्या बाजूनेही लक्षात येतो. होळीच्या सणाला आपण सर्व अनिष्ट गोष्टींचे दहन करून पुन्हा जीवनाला नव्याने सन्मुख होण्यासाठी सज्ज होतो. इथे वर्षातील सर्व सणांची समाप्ती होते आणि लगोलग रंगपंचमी, वसंत पंचमीच्या रंगोत्सवाने मानवी जीवनात रंग भरतो. शिमग्याला सर्व बोंबा ठोकून झाल्यावर आपण पुन्हा एकवार संवादी होतो. जीवनसंगीताच्या समेवर येतो. निसर्गातील फुललेला वसंत पाहून आपोआप आपल्या मनातील बहरलेला चाफा त्या चैत्र पालवीला साद घालू लागतो.

- Advertisement -

चैत्रातील हा रंगोत्सव पाहून मन भरून येते आणि सुरू होते ती सलज्ज कुजबूज. मग कुठून तरी दूर रानातून हलकेच कानावर बासरीचे मंजुळ स्वर पडतात आणि मोहरलेल्या, बहरलेल्या आंब्याच्या डहाळीवर कोकीळेचे कुजन आसमंत भारून टाकते. ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का, प्रीत लपवुनी छपेल का’, असा काहीसा अवखळ, हट्टी, अनुनय करणारा प्रश्नही यावेळी मनात रुंजी घालू लागतो. म्हणूनच मानवी मनाला खर्‍या अर्थाने रंगीन बनवणारा हा ऋतू आहे.

हा ऋतू ग्रीष्मात येत असला तरी आजूबाजूचा फुललेला वसंत पाहून, रंगोत्सव पाहून निसर्गातली कोवळीक आपल्या डोळ्यालाही थंडावा देते. नाहीतर ही शुष्कता शोषणे किती अवघड झाले असते? आता हेच बघा ना श्रावणातील रंगाने नटलेली हिरवाई वेगळी आणि वसंतातली कोवळीक वेगळी. वसंतातल्या कोवळ्या तांबूस पालवीचा रंग श्रावणात किती गर्द हिरवा झालेला असतो. नुकतेच जन्माला येणारे बाळ कसे लोभस, कोवळे, लुसलुसीत असते तसा हा ऋतू, पण सृष्टीची ही बाल्यावस्था दिवसागणिक बदलत जाते. त्याचे रंग, पोत, आकार बदलत जातात.

ही अवस्था संपते ना संपते तोच येतो कुमारवयीन अवखळपणा आणि हा अवखळपणा जाऊन मनात एक प्रकारची उदासी, हुरहूर भासू लागते. मनातील मोर नाचू लागतात. मन पंचमीच्या झुल्यावर झुलू लागते. हे सरते ना सरते तोच शरदातील टिपूर चांदणे मनाला भुरळ घालते आणि नकळत ओठातून चांदण्यात फिरताना, धरलास तू माझा हात, सखया रे, आवर ही, सावर ही चांदरात!! हे गाणे साद घालू लागते. भटांच्या या ओळीने आपल्या मनात जागा केलेला तो श्वासांचा मालकंस आणि स्पर्शाचा पारिजात कोण बरे विसरेल?

हा श्रावणाचा झिम्माडझिम्मा संपतो आणि चाहूल लागते ती गारठून टाकणार्‍या अश्विन, कार्तिकाची. एकीकडे दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोर्‍यात एकदा… हे जसे मर्ढेकरांचे गीत आपणास आठवू लागते तसेच कार्तिकातला वनमाळीही भल्या पहाटे साद घालून आळवू लागतो ती उदयाचली मित्र आल्याची पहाटगाणी! हे मंतरलेले पवित्र स्वर विरतात आणि पुन्हा माघाची थंडी कशी मस्त शेकोटी पेटवून मज्जा पाहत कोपर्‍यात उभी असते.

याच काळात नाघची रानोमाळ गेलेली शीळ ऐकू येऊ लागते आणि मन गाऊ लागते ‘रानात सांग कानात आपुले नाते’ माघ संपतो नि येतो फाल्गुन. पुन्हा मनात विरक्तीचे ढग जमा होऊ लागतात. जीव दमतो, भागतो. काय मिळवले? काय हरवले? याचा जमाखर्च लागत नाही. शेवटी सर्व भोगून झाल्यावर विरक्तीचे रंग मनात साचू लागतात आणि संत कबिराचे ते निर्गुणी भजन कुमार गंधर्व यांच्या स्वरात ऐकू येऊ लागते. उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला!

झाडावरची पाने गळून पुन्हा ती हिरवी होतात तसेच जीवनाचे शरीररूपी पिंजर्‍यातून प्राणरूपी हंस एकटाच उडून जातो इथे सर्व रंग मिटतात. आसक्तीचे, मोहाचे, वासनेचे सर्व… या सर्व रंगात रंगून शेवटी आपला पाय मोकळा करावाच लागतो. जसे झाडांवरची पाने गळून पडतात तसेच माणसाचे. निसर्गचक्राप्रमाणे जशी झडलेल्या पानांच्या जागी कोवळी तांबूस पालवी फुटते तसेच मानवी जीवनाचेही. हे निसर्गचक्र आपल्याला हाच संदेश देत असते.

चैत्र पाडव्याकडून काय घ्यावे? तर सृष्टीतील नित्यनूतनता समजून घ्यावी. त्यासाठीच गुढी उभारून जगण्याचे स्वागत करावे. पाडगावकरांनी यासाठीच म्हटले आहे, ‘या ओठांनी चुंबून घेईल हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.’ ही चैत्र पालवी हाच मौलिक संदेश देते.

ते जाणण्यासाठी मात्र हवी मोठेपणातील कोवळीक! जसे नव्या नवरीच्या डोळ्यातील मोठेपण असते ना तशीच! सुरेश भटांनी ‘मेंदीच्या पानावर’या गाण्यात त्याचे सुंदर वर्णन केलंय. ‘अजून तुझे हळदीचे, अंग अंग पिवळे ग, अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कोवळे ग.’ पण असं पाहण्याची दिठी लाभली तरच आपल्या मनातील मेंदीचा रंग खुलू शकतो. मन तसेच त्या पानावर झुलू लागते. हा वसंत ऋतू हाच सांगावा, हेच आनंदाचे गाणे घेऊन आलेला असतो.

वसंतातला हा सण म्हणजे हिंदू वर्षाचा प्रारंभ. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, तर रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र याच दिवशी अयोध्येत परत आले. त्यांचे स्वागत विजयोत्सवाने आणि गुढ्या उभारून केले गेले. साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा हा एक मुहूर्त. याला ‘महापर्व’ असेही म्हणतात. महाभारतातील आदिपर्वात ‘उपरिचर’ राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी तिची पूजा केली तो हाच दिवस.

क्षीरसागरात योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूने याच दिवशी मत्स्यरूप धारण करून समुद्राच्या तळाशी बसलेल्या शंखासुराचा वध केला आणि त्याच्या विनंतीवरून या दिवसापासून हातात शंख धारण केला. शालिवाहन राजाने हुणाचा पराभव करून या दिवसापासून शालिवाहन शकास सुरुवात झाली. या पौराणिक आख्यायिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाला प्रारंभ होतो. हाच गुढीपाडवा आपल्याही जीवनात आनंदाचे नानाविध रंग घेऊन येतो. हे रंग वर्षभर बदलत जातात. पाडवा ते होळीपर्यंत सहा ऋतूंचे हे सहा सोहळे अनुभवण्यासाठी आणि पुन्हा नव्या उमेदीने जीवनाला सामोरे जाण्यासाठी आपणही या बदलत्या रंगात रंगून जात असतो. जीवनात आनंद असतो तो या नित्यनूतनतेमुळेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -