घरफिचर्ससारांशकरांच्या स्व-मूल्यांकनाचे विविध पैलू!

करांच्या स्व-मूल्यांकनाचे विविध पैलू!

Subscribe

स्व-मूल्यांकन या शब्दाचा अर्थ स्वत:च स्वत:च्या कराचे मूल्यांकन करायचे आणि जो काही कर येत असेल तो सरकारी तिजोरीत जमा करायचा हा साधा आणि सरळ अर्थ आहे. म्हणजेच स्वत:चे उत्पन्न किती, त्यातून मला काय काय कायदेशीर वजावटी उपलब्ध आहे त्या वजा करून सरकारने ठरवून दिलेल्या टॅक्स दरानुसार टॅक्स काढून मी तो सरकारी तिजोरीत भरणे. सहसा सरकार तुमच्या स्व-मूल्यांकन प्रक्रियेत दखल घेत नाही, परंतु आता डिजिटल प्रकियेमध्ये खूप सारी माहिती आयकर विभाग आणि जीएसटी विभागाकडे उपलब्ध असते. त्यामुळे तुमचे स्व-मूल्यांकन किती बरोबर आहे हे लगेच समजते.

आयकर कसा काढला जातो 

आयकर हा भारतातील व्यक्ती आणि व्यवसायांना भरावा लागणारा सर्वात महत्त्वाचा कर आहे. आयकर हा तुमच्या उत्पन्नावर भरावा लागतो. आयकर काढताना आयकर कायद्यात उत्पन्नाचे पाच हेड केलेले आहेत. हाऊस प्रॉपर्टी उत्पन्न, पगाराचे उत्पन्न, व्यवसायाचे उत्पन्न, प्रॉपर्टी किंवा गुंतवणूक विक्रीतून (कॅपिटल गेन) आलेले उत्पन्न व इतर उत्पन्न असे आहेत. ह्या प्रत्येक हेडचे उत्पन्न कसे काढायचे याचे वेगवेगळे नियम आहेत. प्रत्येक हेडचे उत्पन्न काढून सर्व हेडचे उत्पन्न एकत्र केले जाते. यात एखाद्या उत्पन्नाच्या हेडखाली जर तोटा (लॉस) असेल तर तो वजा करून सर्व हेडचे एकत्रित उत्पन्न काढले जाते.

- Advertisement -

एकत्रित आयकर उत्पन्नातून वजावटी

सर्व हेडचे उत्पन्न काढल्यानंतर त्यातून काही गुंतवणुकी केल्या असतील जसे की जीवन विमा, पीएफ, पीपीएफ, घराचा कर्ज हफ्ता (मुद्दल रक्कम) तर त्या वजा करून करास पात्र उत्पन्न काढले जाते व त्यावर कर आकारणी केली जाते. कंपनी, भागीदारी फर्म यासाठी ठरवून दिलेल्या आयकर दराने कर आकारणी केली जाते. इतरांसाठी आयकराचे स्लॅब ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार कर आकारणी केली जाते.

आयकराचे रिटर्न भरणे

मूल्यांकन वर्ष : मूल्यांकन वर्ष हे ज्या आर्थिक वर्षात तुम्ही उत्पन्न मिळवता त्या वर्षानंतरचे वर्ष असते. उदाहरणार्थ 2022-23 आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी मूल्यांकन वर्ष 2023-24 आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ही ऑडिट नसणार्‍या करदात्यांसाठी मूल्यांकन वर्षाची 31 जुलै असते. ऑडिट असणार्‍या व कंपनीसाठी ही मूल्यांकन वर्षाची मुदत 30 सप्टेंबर असते, मात्र ही तारीख सरकार वाढवू शकते. मुदतीत आयकर रिटर्न भरले नाही तर दंड भरावा लागतो.

- Advertisement -

आगाऊ आयकर : अ‍ॅडव्हान्स टॅक्स

आर्थिक वर्षासाठी तुमची एकूण कर देयता एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला संपूर्ण वर्षभर हप्त्यांमध्ये आगाऊ कर भरावा लागेल. समजा सन 2023-2024 वर्षीचे आयकर रिटर्न जरी तुम्हला 31 जुलै 2024 पर्यंत भरता येईल, पण तुम्हाला आगाऊ कर हा ठरवून दिलेल्या चार हफ्त्यांमध्ये दि. 31/3/2024 पर्यंत भरावा लागेल. तो भरला नाही तर त्यावर व्याज भरावे लागते. असा कर आगाऊ भरताना करदात्याने स्वत:च स्वत:चा कर रक्कम काढून भरायची आहे (स्व-मूल्यांकन). हा कर भरताना तुमचा आयकर जर कुणी कापला असेल (टीडीएस) तर त्याचीसुद्धा वजावट मिळत असते.

आयकर रिटर्नचे प्रोसेसिंग

आयकर रिटर्न भरल्यानंतर प्रत्येक भरलेले आयकर रिटर्न हे प्रोसेस होत असते. प्रोसेस होणे म्हणजे तुम्ही स्वत:चे स्व-मूल्यांकन करून जे उत्पन्न आयकर रिटर्नमध्ये दाखवतात. त्यावर घेतलेल्या वजावटी योग्य आहेत का व काढलेला आयकर योग्य आहे का हे तपासले जाते. जसे वर मी संगितले की, आता आधार आणि पॅन लिंक झाल्यामुळे आयकर विभागाकडे तुमची खूप सारी माहिती अगोदरच पोहचलेली असते. अशी माहिती व तुम्ही आयकर रिटर्नमध्ये दिलेली माहिती ही बरोबर आहे का याची तपासणी आयकर रिटर्न प्रोसेस करताना केली जाते. त्यात काही तफावत दिसली तर वाढीव आयकर आकारणी केली जाते. प्रत्येक करदात्याने तुम्ही भरलेले आयकर रिटर्न प्रोसेस झाले की नाही हे तुमच्या आयकर खात्याला लॉगिन करून तपासता येते. अशी आयकर रिटर्न प्रोसेसिंग ऑर्डर तुमच्या आयकर खात्याकडे रजिस्टर असलेल्या ई-मेल आयडीवरसुद्धा पाठवली जाते. आयकर खाते आणि करदाते यांच्यामध्ये कर रकमेबाबत काही वाद असेल तर अपील सिस्टीमसुद्धा उपलब्ध आहे.

वस्तू आणि सेवाकर (जीएसटी)

जीएसटी हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर आहे. जीएसटीचे स्वयं-मूल्यांकन व्यवसायांसाठी महत्त्वपूर्ण आहे. जीएसटी कर संकलन हे दर महिन्याला दीड लाख कोटींच्या वर गेलेले आहे. त्यामुळे हा कर फार महत्वाचा आहे.

नोंदणी

ठरावीक उलाढाल पार केल्यानंतर व्यवसायांना जीएसटीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

जीएसटी रिटर्न भरणे

नियमित करदात्यांनी जीएसटी-1 (बाह्य पुरवठ्यासाठी) आणि जीएसटी-3 इ (मासिक सारांशासाठी) रिटर्न भरणे आवश्यक आहे. कराचा भरणा हा दर महिन्याला करावा लागतो. तसेच जीएसटीचे वार्षिक रिटर्नसुद्धा भरणे गरजेचे आहे.

इनपुट टॅक्स क्रेडिट

तुमचे कर ओझे कमी करण्यासाठी जीएसटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा कसा करायचा आणि ते तुमच्या आउटपुट दायित्वाशी कसे जुळवायचे हे समजून घेणे आवश्यक आहे. इनपुट म्हणजे तुम्ही तुमच्या खरेदीवर भरलेला कर हा वजावट मिळतो, परंतु हे सर्व ऑनलाईन होत असते. त्यासाठी ज्याच्याकडून खरेदी केली आहे त्याने जीएसटी रिटर्न वेळेत भरणे आवश्यक आहे.

भारतीय करांचे स्वयं-मूल्यांकन ही प्रत्येक करदात्याची मूलभूत जबाबदारी आहे. स्व-मूल्यांकन करून कर आणि त्याचे रिटर्न भरेपर्यंत शक्यतो आयकर खाते किंवा जीएसटी खाते करदात्याला काहीही विचारणा करत नाही. विविध कर प्रकारांबद्दल जागरूक असणे, वजावट आणि सूट समजून घेणे आणि कर रिटर्न वेळेत भरणे व कर कायद्यांचे पालन करणे महत्वाचे आहे. जरी कराची स्व-मूल्यांकन पद्धत असली तरी आता पॅन आणि आधार लिंक झाल्यामुळे बँकेकडून, शेअर दलालांकडून प्रॉपर्टी खरेदी-विक्री व्यवहार सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदविले जातात. त्या ऑफिसकडून विदेश यात्रा केली असेल तर अशी विविध माध्यमातून करदात्यांची माहिती आयकर व जीएसटी विभागाला जात असते. ही माहिती करदात्याच्या आयकर अकाऊंटमध्ये लॉगिन केल्यानंतर एआयएस प्रणालीखाली करदात्याला तपासायला उपलब्ध आहे. त्यामुळे कराचे स्व-मूल्यांकन करताना विशेष काळजी घेणे जरुरी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -