घरताज्या घडामोडीस्पर्धा परीक्षांची बिकट वाट

स्पर्धा परीक्षांची बिकट वाट

Subscribe

स्पर्धा परीक्षांमधील यशाला गवसणी घालण्यासाठी विद्यार्थ्यांची कष्ट उपसण्याची तयारी असते. पालकही मुलांच्या मनात असलेल्या स्वप्नाला बळ देण्याचे काम करतात. त्या बळातूनच भविष्याच्या स्वप्नांची पेरणी होते. त्या स्वप्नांचा पाठलाग करताना यशाचे प्रमाण फारसे नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालावर नजर टाकली तर अवघा एक टक्का विद्यार्थीदेखील पात्र ठरत नाहीत आणि 99 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी नापास होतात. 

– संदीप वाकचौरे

उच्च शिक्षणातील विविध शाखांतील पदवी धारण केल्यानंतर अनेक मुले स्पर्धा परीक्षांसाठी अनेक वर्षे प्रयत्न करतात. त्या प्रयत्नात कोणाला तात्काळ यश मिळते तर कोणाला यशासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. येथील स्पर्धा परीक्षांमधून मिळणारे यश प्रकाशमान असते अशी समाज मनाची धारणा आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळणार्‍या यशाला प्रतिष्ठा आणि समाजमान्यता आहे. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणार्‍या पदांच्या जागा शेकड्यात आणि उमेदवार लाखांत असतात. हे अत्यंत विरोधाभासी चित्र आहे. तीव्र स्पर्धा असल्याने विद्यार्थी झपाटून अभ्यास करतात. यशाला गवसणी घालण्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी असते. पालकही मुलांच्या मनात असलेल्या स्वप्नाला बळ देण्याचे काम करतात. त्या बळातूनच भविष्याच्या स्वप्नाची पेरणी होते. त्या स्वप्नाचा पाठलाग करताना यशाचे प्रमाण फारसे नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालावर नजर टाकली तर अवघा एक टक्का विद्यार्थीदेखील पात्र ठरत नाहीत आणि 99 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी नापास होतात.
आयुष्यातील 20-25 वर्षे पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी खर्च होतात. त्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू होते. पुन्हा दोन पाच वर्षे परीक्षा, मुलाखती, निवड प्रक्रिया, नियुक्ती यात सहज वर्षे निघून जाते. तरीही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा पाठलाग करणे सोडत नाहीत. या स्पर्धेत लाखो मुलांना यश मिळत नाही. अनेक विद्यार्थ्यांचे  स्वतःला आजमावणे घडत राहते. अनेकदा अपयश मिळूनही प्रयत्न सुटत नाहीत. सरकारी नोकरीचे मोठे आकर्षण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना असते. सरकारी नोकरीचे आकर्षण का? मुळात सरकारी नोकरी ही समाजसेवेची उत्तम संधी आहे. त्या संधीचे सोने करणारी माणसंही या व्यवस्थेत आहेत आणि मिळालेल्या संधीने स्वतःच्या अनेक पिढ्या जगू शकतील अशा दिशेचा प्रवास करणारी माणसंही या व्यवस्थेने अनुभवली  आहेत. यातील कोणता प्रवास विद्यार्थ्यांना आकर्षित करतो? का करतो? याचा शोध घ्यायला हवा. स्पर्धा परीक्षेची वाट चालत राहिलो तर भविष्य अत्यंत चांगले आहे अशी साधारण धारणा आहे. त्या वाटेचा प्रवास समाज उद्धाराचा आणि स्वतःला उन्नत करणारा आहे. यातही निर्मळ वाटेने चालणार्‍या माणसांचा शोध घ्यावा लागतो आणि शोधतानाही माणसं सापडणे दिवसेंदिवस कठीण बनत आहे.
स्पर्धा परीक्षेशिवाय इतरत्र जीवन आनंदी करणार्‍या वाटा नाहीत का? स्वतःच्या उन्नतीकरणासाठी स्वतःच्या हाती असणार्‍या कौशल्यांच्या वाटा चालणे का घडत नाही? स्वयंरोजगाराच्या वाटा खुणावत असूनही आणि आपल्या हाती उत्तम कौशल्य असतानादेखील त्या कौशल्यांचा पुरेपूर उपयोग करणारी व्यवस्था निर्माण करण्यात मन रमत नाही. त्या दिशेने प्रवास घडत मात्र नाही. इतकी मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करताना त्यासाठी लागणारी क्षमता किती विद्यार्थ्यांमध्ये आहे? याचा विचार केला जातो का? खरेतर ज्या पदासाठी उमेदवार हवा आहे त्यासाठी लागणारी क्षमता केवळ एखाद्या परीक्षेतून मापली जाणे शक्य आहे का? नियुक्ती केल्यानंतर क्षमता प्राप्त करणे शक्य आहे का? असल्यास किती प्रमाणात ते साध्य होते? किती प्रमाणात प्रशासनात नवनवीन प्रयोग केले याचा विचार केला तर बहुतांश उत्तरे नकारात्मक येतात.
 ग्रामीण भागातील विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडतात त्यामागे आंतरिक प्रेरणेचा भाग किती? हा प्रश्न आहे. पदवी धारण केल्यावर नोकरीचा शोध सुरू होतो. ग्रामीण भागात नोकर्‍यांचे प्रमाण तसे फारसे नाही. ग्रामीण भागात स्वातंत्र्यानंतर विकासाची चाके गतीने फिरली नाहीत. शेती हाच आजही खेड्यांच्या केंद्रस्थानी राहिलेला व्यवसाय आहे. त्यावर आधारित उद्योगाची चाके फिरली नसल्याने तरुणांना नोकरीचेच आकर्षण अधिक आहे. ग्रामीण भागातील तरुणांना मिळेल तेथे कमी आर्थिक उत्पन्नात काम करावे लागते. त्यामुळे किमान पदवी धारण केलेल्या तरुणाईला स्पर्धा परीक्षेचा मार्ग दाखविला जातो. मुलांना तो मार्ग अधिक जवळचा आणि योग्य वाटतो. त्यासाठीची तयारी पदवीनंतरच सुरू होते. स्पर्धा परीक्षेसाठीचा कोणताही पाया शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणात घातला गेलेला नसतो. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गही सापडत नसतो. स्पर्धा परीक्षेसाठी महानगराकडे जाण्याचा मार्ग दिसू लागतो. तेथे जाऊन शिकवणी सुरू होते. आर्थिक संकट असले तरी मनात पेरलेली स्वप्न शांत बसू देत नाहीत.
आईवडील पोटाला चिमटा घेत पैसे पुरवतात. एकीकडे महानगरात राहायचे, भोजन, निवास, शिकवणीसाठीचा मोठा खर्च करायचा. त्या खर्चानंतरही अपेक्षित यश न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा घरची वाट धरावी लागते. मनात निराशेचे घर अधिक भक्कम झालेले असते. त्या निराशेतून मार्ग सापडणे कठीण बनते. मग मिळेल तेथे नोकरीचा मार्ग स्वीकारला जातो आणि मनी उच्च अधिकारी पदाच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. असे कितीतरी विद्यार्थी आजही ग्रामीण भागात आहेत. महानगरात शिकवणी वर्गासाठी राहिल्याने आणि तेथे गरजेप्रमाणे सुविधा घेतल्याने घरच्यांवर कर्ज होते. त्यातून कौटुंबिक आर्थिक स्थिती खालावते. निराशेची छाया मनावर राज्य करते. या स्पर्धेतून यशस्वी झालेल्या  विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची परिस्थिती सुधारते, मात्र इतरांना पुन्हा नव्या वाटा शोधाव्या लागतात.
मुळात आपल्या व्यवस्थेत ज्याला प्रतिष्ठा असते त्या दिशेने गर्दी अनुभवास मिळते. सरकारी नोकरीत एक प्रकारची प्रतिष्ठा आहे. सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना मिळालेले अधिकार, सरकारी पातळीवर असलेल्या पुरेशा प्रमाणातील सुविधा आणि सुरक्षा, नोकरी आणि वेतनाची असलेली हमी, त्यामुळे सरकारी नोकरीचे मोठे आकर्षण समाजातील सर्वच घटकांना आहे. त्यामुळे सरकारी वेतन घेणारा माणूस कोणत्याही पदावर असला तरी त्याची सामाजिक उंची अधिक मानली जाते. आर्थिक स्तरात सुधारणा झालेली पाहावयास मिळते. त्यात येथे श्रमाची कामे कमी आणि बौद्धिक काम अधिक असते असे मानले जाते. ही पदे जनसेवेची आणि समाजपरिवर्तनाची सर्वाधिक प्रभावी पदे आहेत. या पदावरील माणसांनी ठरवले तर समाज जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण करणे सहज शक्य आहे.
आपल्याकडे विद्यार्थी पदवीधर झाल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षांच्या वाटा दिसू लागतात. त्याने पदवी, पदव्युत्तर जे शिक्षण प्राप्त केले आहे, त्या शाखेच्या ज्ञानाचा लाभ त्याला भविष्याच्या वाटचालीसाठी होण्याची गरज असते. सरकारने त्या तरुणांच्या शिक्षणावर केलेला सरकारी खर्च हा जनतेच्या कराचा पैसा असतो. त्यामुळे त्या ज्ञानाचा लाभ समाज व्यवस्थेलाही होण्याची गरज असते. त्यांनी ज्या क्षेत्राची पदवीधारण केली आहे त्या ज्ञानाचा उपयोग त्याच क्षेत्रात झाला तर ते क्षेत्र गतिमान आणि उन्नत होण्यास मदत होईल. तरुणांच्या ज्ञानाचा समाज व राष्ट्र उन्नतीकरिता उपयोग होण्याची गरज असते. आपल्याकडे अनुदानित शिक्षण व्यवस्थेवर सरकार खर्च करीत आहे. त्या खर्चातून आपल्याला विविध पदवीपात्र उमेदवार मिळतात. स्पर्धा परीक्षेत निवड झाल्यावर त्यांच्या पदवीच्या ज्ञानाचा कितपत उपयोग होतो, हा खरा प्रश्न आहे. वैद्यकीय पदवी, पदव्युत्तर शिक्षणातून आपल्या समाजाला उत्तम डॉक्टर मिळत असतात. ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात यश मिळविले आहे त्यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे वैद्यकीय क्षेत्रासाठी निवड झाली तर समजण्यासारखे आहे.
वैद्यकीय शिक्षण घेतलेला विद्यार्थी इतर क्षेत्रात निवडला गेला तर ते यश स्पर्धा परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासाचे आहे. त्या यशातून त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाला समाज मुकला आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून उमेदवाराने पदवीला मिळविलेल्या ज्ञानाचा, माहितीचा उपयोग होण्याची शक्यता नाही. वैद्यकीय पदवीसाठी सरकारने खर्च केल्यामुळे समाजाला उत्तम डॉक्टर मिळणार होता. वैद्यकीय शिक्षणानंतर एखादा डॉक्टर दुसर्‍या क्षेत्रात प्रवेशित झाल्याने व्यक्तीचे हित साधले जाईल, मात्र त्यात समाजाचे हित सामावलेले नाही. आपल्या देशात वैद्यकीय शिक्षण प्रशिक्षित असणार्‍या डॉक्टरांची संख्या सध्याच्या लोकसंख्येची गरज भागवू शकत नाही.
वैद्यकीय शिक्षण घेतलेली माणसं स्पर्धा परीक्षेतून आपले क्षेत्र सोडून दुसर्‍या क्षेत्रात प्रवेशित होतात. तसेच चित्र कृषी क्षेत्रातील पदवीधरांचे आहे. मुळात शेती हा घाट्याचा व्यवसाय मानला जातो. तो अधिक शास्त्रीय पद्धतीने केला गेला तर त्याचे चित्र बदलेल असे मानले जाते, मात्र बहुतांश कृषी पदवीधारक शेतीत रमण्याऐवजी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपली जीवनवाट शोधत असतात. देशात कृषी पदवीधारक अधिक असूनही शेतीचा उद्धार होताना दिसत नाही. शेती हा स्वातंत्र्यानंतरही तोट्याचाच भाग बनला आहे. शेतीत फारसे प्रयोग होताना दिसत नाहीत. शेती आजही पारंपरिक पद्धतीने सुरू राहते. त्या पदवीधारकांचे ज्ञान त्यांच्या पदवीच्या क्षेत्रात उपयोगी  पडणार असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे. स्पर्धा परीक्षेमुळे निवडलेल्या पदाने एखाद्या विभागाला ज्ञान कौशल्याचा उपयोग होईल, पण त्याच्या समग्र ज्ञानाचा उपयोग त्या क्षेत्राला झाला तर परिवर्तनाची वाट चालणे शक्य आहे. त्यांच्या ज्ञानाचा पुरेसा उपयोग न झाल्याने समाज व राष्ट्राचे सर्वाधिक नुकसान होते. हे नुकसान व्यक्तिगत नसले तरी सामाजिक मात्र निश्चितच आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -