फेरीवाला

Subscribe

रोज दारावर भाजी विकायला येणार्‍या भाजीवाल्या मावशी, मासे विक्रेता, जुन्या चप्पल घेऊन बदल्यात लसूण, रताळी देणारी लसूणवाली, जुन्या कपड्यांवर चकचकीत स्टीलचे भांडे देणारी भांडीवाली वगैरे तत्सम फेरीवाले असोत वा पत्र घेऊन येणारे पोस्टमन काका त्या चाळीचाच एक भाग बनून गेलेले असायचे. आता बर्‍यापैकी चाळीचे रूपांतर मोठमोठ्या इमारतीत झालेय. तिथे फेरीवाल्यांना फिरकण्यास सक्त बंदी असते. काळानुरूप माणसं बदलत गेली व विश्वासार्हता लोप पावू लागली.

– कस्तुरी देवरुखकर

माझे बालपण मुंबईतील चाळीत गेले असल्याने तिथले वातावरण अतिशय खेळीमेळीचे होते. तेथील निरनिराळ्या वस्तू विकायला येणारे फेरीवाले हा मोठा कुतूहलाचा विषय असायचा. खासकरून बच्चेकंपनीकरिता पर्वणीच. वस्तू विक्रीकरिता विशिष्ट पद्धतीने सूर लावत आवाज देण्याची फेरीवाल्यांची ती ढब काही वेगळीच होती. रामप्रहरी यायचा तो दूधवाला. रोजचे उकाड्याचे दूध घरोघरी वेळेत पोहचविणारा हा दूधवाला सायकलवरून पांढर्‍या शुभ्र दुधाने भरलेली मोठाली किटली घेऊन येताना दिसायचा. ती भलीमोठी किटली आणि दूध मापून देण्याकरिता असलेले विशिष्ट आकाराचे भांडे पाहताना गंमत वाटायची. त्यानंतर अगदी पाठीला पाठ लावून जशी सख्खी भावंडं येतात त्याप्रमाणे दारोदारी वर्तमानपत्रांचे वाटप करणारा त्यामागोमाग पाव, बटर, खारी विकणारा यायचा. मग काय चहासोबत हा खाऊ मिळावा म्हणून आमचा आईकडे हट्ट असायचा. त्यामुळे बन मस्का, खारी, बटर, नानकटाई घरात आवर्जून हजर असायचे. याचा अर्थ असा नाही की स्वयंपाकघरात वडिलांना डब्याकरिता बनवलेली पोळी भाजी दुर्लक्षित असायची. मुळात ती खाल्ली तरच बाहेरचे पदार्थ दिले जायचे, अन्यथा उपवास ठरलेला.

दुपारचे जेवण उरकून जेव्हा बच्चेकंपनी निवांत असायची बरोबर ती वेळ साधूनच आईसक्रीमची गाडी घेऊन यायचा तो आईसक्रीमवाला. कधी कधी बोरं, चिंचा, आवळे, पेरू विक्रेता यायचा, तर कधी गोड गोड कापसाच्या फिकट गुलाबी पुंजक्याला बालकांच्या नजरेतून जिभेवर रेंगाळत ठेवत तोंडात पाणी आणायला यायचा तो कापूसवाला. खरी गंमत अशी होती की सर्व लहान मुलांना बाहेरच्या रस्त्यावर कुठला खाद्यपदार्थ विक्रेता आलाय हे घरात बसून कळायचे. त्यामुळे आईबाबांकडून किती पैसे मागायचे हे आधीच ठरलेले असायचे. कधी कधी संध्याकाळ होता होता एखादा भेळवाला, कुल्फीवाला आल्यावर सर्वांची भूक वाढायची. त्यांच्याकडील ती चटपटीत भेळ खाल्यावर मधुर, रसभरीत कुल्फीचा आस्वाद घेताना चौपाटीवर उभं असल्याचा भास व्हायचा.

- Advertisement -

अशा गमती जमतीत बालपण सरता सरता एक स्त्री असल्याने मला आपसुकच बांगड्यांची आवड वाटू लागली. त्यावेळी दारोदारी बांगड्या विकायला यायचा तो बांगडीवाला. लाकडी चौकटीत लाल, हिरवा, निळा, केशरी, गुलबक्षी, जांभळा, पिवळा, राखाडी, सोनेरी, चंदेरी…असे सर्व प्रकारचे गडद अन् हलके रंग ओतून त्यावर नक्षीकामाचे कोंदण चढवून काचेच्या तसेच धातूच्या बांगड्या सजवून हा नजराणा खास महिलांसाठी घेऊन यायचा तो बांगडीवाला.
कुणाचा साखरपुडा असो वा लग्न वा हळदीकुंकू समारंभ किंवा हौस म्हणून का होईना त्यानिमित्ताने दारावर आलेल्या बांगडीवाल्याकडून बांगड्या भरण्याकरिता बायकांची गर्दी व्हायची. त्या घोळक्यात प्रत्येक ललनेच्या हाताच्या मापाची व तिला हव्या त्या रंगाची, नक्षीची बांगडी भरून देण्यात बांगडीवाला मग्न होऊन जायचा. यावरून एक गोष्ट आठवली, खेड्यात एखादा लग्नप्रसंग असला की संपूर्ण वाडीतील महिलावर्गाला वधू अथवा वराच्या घरच्यांनी स्व:खर्चाने बांगड्या भरून देण्याची प्रथा आहे. माझ्या माहेरच्या गावी ती प्रथा आजतागायत सुरू आहे. असे करून एकप्रकारे वाडीतील समस्त स्त्रियांना मानपान देऊन त्यांची मर्जी राखत आपल्या घरच्या कार्यात सहभागी होऊन हातभार लावण्याचे आमंत्रणच दिले जाते.

रोज दारावर भाजी विकायला येणार्‍या भाजीवाल्या मावशी, मासे विक्रेता, जुन्या चप्पल घेऊन बदल्यात लसूण, रताळी देणारी लसूणवाली, जुन्या कपड्यांवर चकचकीत स्टीलचे भांडे देणारी भांडीवाली वगैरे तत्सम फेरीवाले असोत वा पत्र घेऊन येणारे पोस्टमन काका त्या चाळीचाच एक भाग बनून गेलेले असायचे. आता बर्‍यापैकी चाळीचे रूपांतर मोठमोठ्या इमारतीत झालेय. तिथे फेरीवाल्यांना फिरकण्यास सक्त बंदी असते. काळानुरूप माणसं बदलत गेली व विश्वासार्हता लोप पावू लागली. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे नियम लागू होत गेले तसेच आता सुपरमार्केट, फूड बाजारसारखे पर्याय जास्त प्रमाणात उपलब्ध असल्याने लोकांना त्यांची फारशी गरज भासत नाही.

- Advertisement -

आजही घरी आलेल्या कामगाराला चहा विचारण्याची संस्कृती आमच्या पिढीकडे आहे. कारण तो माणुसकीचा वारसा जपत वयाने अन् मनाने मोठे होण्याचा सुवर्णकाळ आम्ही अनुभवला आहे. ठरावीक अपवाद वगळता चारचौघात न मिसळता सिमेंटच्या चार भिंतींच्या बंदिस्त वातावरणात संकुचित आणि संशयी वृत्तीने वाढणार्‍या पुढच्या पिढीतले चित्र काही अंशी वेगळेच असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -