घरफिचर्सबिन भिंतींची उघडी शाळा

बिन भिंतींची उघडी शाळा

Subscribe

कोरोनामुळं सगळीकडे शाळा बंद आहेत. पहिल्या पावसाबरोबर सुरू झालेली शाळा मात्र रोज भरतीय. तुम्ही जाताय न ह्या शाळेत? पालकहो! पाठवताय का तुम्ही तुमच्या मुलांना ह्या शाळेत? ह्या शाळेत इयत्ता, वय, अभ्यासक्रम, असं काही काही भेदाभेद केलं जात नाही. पटसंख्या कमी आहे म्हणून शिक्षक कमी करत नाहीत, तुमच्या शाळेचे दुसर्‍या शाळेत समायोजन केलं जात नाही. ही अखंड चालणारी शाळा तुमची वाट पाहतीय. या शाळेत मुलांसोबत पालकांनाही जाता येते. कळतंय का काही, मी कोणत्या शाळेबद्दल बोलतोय ते? अहो! निसर्गाची बिन भिंतींची उघडी शाळा. माडगूळकरांनी म्हटल्याप्रमाणे ह्या शाळेत लाखो शिक्षक आहेत. त्याचं शिकवणं निरंतर चालू आहे. तुम्हाला फक्त तेथे जायचं आहे, इतकंच.

शाळा सुरू नाहीय. दिवसभर मुलं घरी आहेत. दिवसभर मुलांच्या वेळेचा नाही म्हटलं तरी अनेक पालकांना वैताग येत असणारच. लॉकडाऊनचे पहिले काही महिने उन्हाळी सुट्ट्यासारखे, कोरोनाच्या सुट्ट्या म्हणून अनेकांनी समजून घेतलं. ज्यांना मुलांना वेळ देता येत नव्हता त्यांना आनंदच झाला. मात्र जस जसे मुलं घरी असण्याचा कालावधी वाढत चाललाय तसं तसे अनेकांचे प्रश्न वाढू लागले आहेत. आता महाराष्ट्रातील बर्‍याच भागात लॉकडाऊन उठवलं जाते आहे. तुम्ही योग्य काळजी घेऊन घराबाहेर पडू शकताय. ही चांगलीच संधी आहे. शासनाने जरी शाळा बंद ठेवल्या तरी निसर्गाच्या शाळेचे दरवाजे मात्र नेहमी उघडे आहेत.

पहिल्या पावसाबरोबर सगळीकडे हिरवळ फुटलीय. अगदी तुमच्या घराशेजारी असलेल्या छोट्या मोठ्या मोकळ्या जागेपासून तर तुम्ही राहताय त्या शहरात साधारण एक दोन किलोमीटर अंतरावरील जागेत छोटी टेकडी, छोट्या बागा, मैदान, रस्त्याकडेने असलेल्या मोकळ्या जागा ह्यावर अनेक वनस्पती उगवून आल्या असतीलच. तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर प्रश्नच नाही. छोटी महानगरे, तालुक्याची ठिकाणे येथे मोकळ्या जागा, छोटे तलाव, टेकड्या नक्कीच असतात. मात्र तुम्ही मोठ्या महानगरात राहत असला तरी तिथे अशा मोकळ्या जागा असणे अपेक्षित असते. तुम्ही राहताय तेथून एक किमीच्या परिघात जर अशा मोकळ्या जागा नसतील तर तुमच्या स्थानिक शासन संस्थाना पर्यावरणाची तर काळजी नाहीच आणि नागरिकांच्या दृष्टीनेदेखील ही बाब चुकीचे आहे. अशा मोकळ्या जागा न राखणारे शासक हे चांगले शासक नाहीत हे समजून घ्यायला हवंय.

- Advertisement -

निसर्गात सध्या उत्साह आणि चैतन्य भरभरून वाहते आहे. अगदी ओसाड वाटणार्‍या जागेतही दाटीवतीने हिरव्यागार वनस्पती उगवून आल्या आहेत. जणू शाळा सुरु होऊन नवीन चिमुकली मुलं, त्यांचे पालक जसे शाळेत गर्दी करतात तसे निसर्गातील वेगवेगळ्या घटकांची लगबग तुम्हाला पाहायला मिळेल. घराशेजारीच्या अशा मोकळ्या जागांना भेटी द्यायला जा. जवळपासचे डोंगर पहा. तलाव पहा. तलावातील वनस्पती, त्यावरील छोटी मोठी किडी, फुलपाखरे, तेथे येणारे पक्षी यांचे निरीक्षणं करा. नोंदी घ्या. आधी कधी इतर कामानिमित्त तुम्ही अशा जागा बघितल्या असतील. मात्र आता खास त्या जागा पाहण्यासाठी म्हणून भेटी द्या.

जखमजोडी (Tridax procumbens) ही वनस्पती अगदी थोड्या जागेत, नाल्यावर, भितींच्या खाचेत उगवून येत असते. ह्याला येणारी फुले ही लांबसर देठाच्या टोकाला गोंडा असल्यासारखे असतात. ही फुलं फुलपाखरांना बसण्यासाठी अगदीच योग्य जागा असते. ही वनस्पती तसी बारमाही फुलत असते, मात्र पावसाळ्यात ती जोमात असते. जखमजोडी फुलली आहे आणि तिथे रंगीबेरंगी फुलपाखरांचे नाहीत असे होतंच नाही. टनटनी (Lantana camara) ही एक दुसरी वनस्पती आता बहुतेक भागात पसरत आहे. ह्याला पिवळी, लाल, पांढरी रंगात, गडद फिकट अशा वेगवेगळी छटा असलेली, अनेक फुलं बहरून येतात. त्यावर देखील किमान तीन चार प्रकारचे फुलपाखरे मधुरस पिण्यासाठी येत असतात. पावसाळ्यात ओलधरून शेवाळ फुटलेली जागा, कुठलेतरी सडलेले फळ किंवा जनावरांची विष्ठा असेल तिथे एक दोन प्रकारची फुलपाखरे बसलेली दिसतीलच. सीताफळ, कडीपत्ता, लिंबू, सदाफुली, टाकळा, यासह पावसाळ्यात उगवणारी अनेक छोटी छोटी वनस्पती व त्यांची फुले ही सुंदर सुंदर फुलपाखरांना आकर्षित करतात.

- Advertisement -

फुलपाखरे खूप चंचल असतात. सकाळचा काही वेळ सोडता एका जागी जास्त वेळ बसत नाहीत. तुमच्याकडे जर कॅमेरा असेल तर तुम्ही फुलपाखरांची सुंदर फोटोग्राफी करू शकता. मात्र तुम्ही निसर्गाच्या शाळेत गेल्यावर तिथल्या वेगवेगळ्या घटकांना तुमच्यामुळे त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. फोटो काढण्यासाठी म्हणून फुलपाखरांच्या मागे खूप धावणे, धावतांना वेगवेगळ्या वनस्पती पायांनी तुडवणे, असे प्रकार टाळावे. अनेकांना निसर्ग आणि निसर्गातील वेगवेगळे घटक आपल्या कॅमेर्‍यात सामावून घेण्याची ओढ असते. फोटो काढण्या आधी थोडं त्याचं निरीक्षण करा. समजून घ्या.

निसर्गाच्या शाळेत निरीक्षण खूप मोलाचे असते. ह्या शाळेत पहिले काही दिवस, काही आठवडे, काही महिने कैकदा तर काही वर्षे तुम्हाला वेगवेगळ्या घटकांचे परस्पर सहसंबंध समजून घेण्यासाठी द्यावे लागतात. निसर्गाच्या शाळेत अनेक कोडी असतात. त्यांचा उलगडा लगेच होईल असं नाही. तुम्हाला अनेकदा त्यासाठी वाट पहावी लागते.

वेगवेगळ्या पक्षी आणि वनस्पती ह्याचं नातं असते. वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे आपापसात देवाण घेवाण असते. अगदी छोट्यातील छोटी किडींची निसर्गातील भूमिका मोलाची असते. ही भूमिका लगेच लक्षात येईलच असे नाही. निरीक्षण, नोंदी ह्यातून ते हळूहळू उलगडत जाते. पूर्व आफ्रिकेत बाभळी झाडाच्या काही प्रजाती आहेत. ही झाडे स्वतःच्या संरक्षणासाठी काट्यांपेक्षा मुंग्यांशी दोस्ती करतात. होतं असं की या बाभळी, मुंग्यांसाठी मातीच्या छोट्या छोट्या गोळ्यासारखी घरे बनवतात. ज्यांना डोमॅशिया म्हणतात. ही झाडे मुंग्यांना खाण्यासाठी गोड रस पाझरतात. याच्या बदल्यात ह्या दोस्त मुंग्या जंगलात चरणार्‍या जिराफ, हरीण यासारख्या प्राण्यांपासून बाभळीचे रक्षण करतात. केनिया या देशात टॉड पाल्मर आणि त्यांच्या गटाने बाभळी, मुंग्या आणि बाभळी खाणार्‍या जंगली जनावरांचा हा मजेदार अभ्यास केला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी तिथल्या जंगलाचे खुप निरीक्षणे केली, नोंदी घेतल्या. बिनभिंतीच्या शाळेत समजून घेऊन त्यांनी मांडलेला अभ्यास आज जगभर समजून घेतलं जातंय.

मग तुम्हीही निसर्गाच्या शाळेत जाणार ना? निसर्गातील अशा वेगवेगळ्या गमती समजून घ्याल ना? तुम्ही फुलपाखरांच्या निरीक्षणापासून सुरु करा. फुलपाखरांचे रंग, शरीरावरील खुणा, उडण्याचे तर्‍हा, त्यांच्या आवडीच्या वनस्पती ह्यावरून त्यांना मराठीत नावं देण्याचाही प्रयत्न करा. तुम्हालाही एखादे नवे कोडे उलगडेल. (क्रमशः)

-बसवंत विठाबाई बाबाराव: लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक असून सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, पुणे या संस्थेत प्रकल्प समन्वयक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -