घरफिचर्सश्रावण मनातला

श्रावण मनातला

Subscribe

आमचा श्रावणात ‘श्रावणी सोमवार’ आणखी एक आकर्षणाचा वार.‘साबुदाना’ खायला मिळायचा म्हणून उपवास अन् महादेवाचे दर्शन हा कित्ता न चुकता शाळकरी वयात गिरवला जायचा, तो आज बंद आहे. पण मजा यायची ती गावापासून दहा बारा किलोमीटरवर असणार्‍या डोंगरावरच्या महादेवाच्या यात्रेत. श्रावणातला तिसरा सोमवार म्हटले की शाळेला हमखास सुट्टी. मग अख्खी शाळाच डोंगरावर दिसायची. पंचक्रोशीतल्या दहा वीस गावातली माणसं या छोट्या व मोठ्या महादेवाला गर्दी करायची.

शहरात आल्यापासून श्रावण आल्याची कल्पना एक तर माध्यमातून येणार्‍या श्रावणी सोमवारच्या मंदिरातील गर्दीच्या बातम्या आणि अगदी अलीकडे समाजमाध्यमातून येणार्‍या श्रावणमास आरंभाच्या शुभेच्छा वगैरे असल्या रंगीबेरंगी संदेशांच्या माध्यमातून समजते. एरव्ही त्यातही

श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे

- Advertisement -

या बालकवींच्या कवितेच्या चार ओळीं मनातल्या मनात गुणगुणण्यापलिकडे आम्हाला श्रावणाबद्दल कुतूहल शिल्लक उरले असे नाही. श्रावण आला म्हणजे आमच्या अवतीभवती फार तर काय बदल होतो, तर काल परवाच केलेल्या रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडतात. सतत रिमझिम पडलाच तर शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग साठतात. काही वस्त्यांतून तर नाक दाबल्याशिवाय तुम्ही जाऊच शकत नाही. तेव्हा आम्ही विसरतो की तिथेही माणसंच राहतात. बालकवींच्या कवितेचे शहरांच्या श्रावणी परिस्थितीवर विडंबन केले तर ….

जिकडे तिकडे खड्डेच खड्डे
दुर्गंधीचे साम्राज्य चोहीकडे

- Advertisement -

याप्रमाणे श्रावण शहरात येतो आणि जातो. फ्लॅटचा दरवाजा किंवा प्रवासात गाडीच्या काचा बंद करून वातानुकूलित वातावरणात सौमित्रचा ‘गारवा’ ऐकला की श्रावणाची भूक भागते. म्हणून नागरी माणसांना श्रावणाचे तसेही अप्रूप वगैरे वाटत असेल असे आता वाटत नाही. तोच तो दिनक्रम नको म्हणून सुट्टीच्या दिवशी माणसं पर्यटनस्थळी गर्दी करतात. तिथेही हल्ली निसर्ग डोळ्यात साठवून घेण्याऐवजी आम्हीच आम्हाला मोबाईल कॅमेर्‍याने कैद करत सुटतो. छायाचित्राच्या पार्श्वभागी निसर्ग येतो तितकाच काय तो ऋतू बदल,आम्हाला सुखावून जातो.

मूलतःच माणसं निसर्गविन्मुख झाली. सत्ता, संपत्ती, पैशाच्या हव्यासाने निसर्गातील चिरंतन गोष्टींच्या आनंदापासून दूर गेलीत. कदाचित याच न्यायाने निसर्गही मुक्त हस्ते आता आपल्या रंगाची उधळण करीत नसावा.”आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतु तरी” चातक पक्षाला कंटाळा येईपर्यंत ढगांचं रीतं होणं आता कुठं आलं! पाऊसही हल्ली माणुसकी विसरला. तो बेभरवशाचा झाला.‘पडला तर अति नाही तर माती’ असंच आता म्हणावं लागतं. पूर्वी श्रावणातला पाऊस कधी अवखळ नसायचा तर खट्याळ असायचा. ऊन सावल्यांचा खेळ खेळत नाना विभ्रम फुलपाखरू होऊन दाखवायचा. आजही आठवतात ते दिवस जेव्हा आठ आठ दिवसाची ‘झड’लागायची. घराच्या भिंतीला ओलावा सुटायचा. रानाला पान्हा फुटायचा, काळी-पांढरी तरारुन यायची, नदी-नाले खळखळून वाहत असायचे.

ओल्या पानांतल्या रेषा
वाटतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी.

मर्ढेकरांनी रंगवलेले हे काव्यत्म चित्र सत्यात उतरायचे. ऊन पावसाचा खेळात धरती चिंब व्हायची. नव्या नवरीप्रमाणे अंगावर हिरवा शालू, साज शृंगारातले हे मोहक रुप पाहून डोळ्याचं पारणं फिटायचं. निसर्गानेच भरभरून दिल्यामुळे सगळे कसे आल्हाददायक वातावरण आकारास यायचे.

वेशी बाहेरच्या मर्‍याआईला पोतराजाच्या ओव्या व डफाच्या बोलांवर वाजत गाजत नैवेद्य झाला की गावातली रोगराई बाहेर जाऊन गावात सण, उत्सवाच्या हंगामाला सुरुवात व्हायची.गावाला श्रावणसणांची आस लागायची. निसर्गपूजक

कृषीसंस्कृतीत माणसांइतकेच शेतीमातीशी निगडित घटकांना महत्त्व असायचं, त्याची प्रचिती श्रावणातला पहिलाच सण ‘नागपंचमी’ यायचा. सकाळी उठल्यावर पावसानं ओलसर झाल्याला भिंतीला आईनं पोतारा फिरवावा. नागदेवाचं रेषारेषातले चित्र काढावं, की त्यावर हळद-कुंकू व त्याच्या बाजूला बाजारात मिळतात ते छापील नागपंचमीचे एक चित्र चिटकावं. त्या चित्रातील ‘शेष’नागावर पहुडलेल्या भगवान विष्णूसमोर आईनं मान दाबून आमचा माथा टेकवला, हातात हळीदनं पिवळा झालेला नागदेवाचा दोरा बांधला की झोका खेळायला परवानगी मिळायची, मग काय आनंदी आनंद गडे ..!

वैशाखात सासरी गेलेल्या नववधू माहेराला आल्यामुळे गाव फुलून यायचा. जागोजागी झाडाला बांधलेल्या झोक्यागणिक बालगोपाळांचा आनंद वाढत जायचा. गावात एका मोठ्या झाडाला जाड नाड्याचा ‘झोका’ हमखास कोणी तर हौशी गडी बांधणार हे ठरलेलेच. जिथं सगळ्या माहेरी आलेल्या लेकी गोळा व्हायच्या. संसारातल्या नव्या नवलाईचे कोडकौतुक करीत कधी कोणा दोघींचा झोका उंच जातो त्याला पारावर नसायचा. सूर्यास्तापूर्वी बुरुजाजवळ बायकांचे गोल रिंगण तयार व्हायचे. त्यांच ‘फेर’ धरून लोकगीतं म्हणणं आणि माणसांचे ‘राम कृष्ण हरी’च्या तालावर वारुळातल्या नागपूजनाला जाणं हे ओघानंच आलं…!

आमचा श्रावणात ‘श्रावणी सोमवार’ आणखी एक आकर्षणाचा वार.‘साबुदाना’ खायला मिळायचा म्हणून उपवास अन् महादेवाचे दर्शन हा कित्ता न चुकता शाळकरी वयात गिरवला जायचा, तो आज बंद आहे. पण मजा यायची ती गावापासून दहा बारा किलोमीटरवर असणार्‍या डोंगरावरच्या महादेवाच्या यात्रेत. श्रावणातला तिसरा सोमवार म्हटले की शाळेला हमखास सुट्टी. मग अख्खी शाळाच डोंगरावर दिसायची. पंचक्रोशीतल्या दहा वीस गावातली माणसं या छोट्या व मोठ्या महादेवाला गर्दी करायची. छोटा महादेव डोंगरातल्या दरीत जावून बसला. बाजूला तुडुंब भरलेला तलाव. तर मोठा जिथं सर्वात उंच डोंगर त्या टेकाडावर. दोन महादेवात पुन्हा चार पाच किलोमीटरचे अंतर ते पायी चिखल तुडवित कड्याकपारीने पार करायचे. परंतु त्यातही वेगळीच मजा असायची.

आम्हा शाळकरी मुलांना डोंगरावर यात्रेत फिरताना आनंदाला पारवार नसायचा. यात्रेने डोंगर फुलून यायचा. खालून माणसांनी पाहिलं की डोंगरावरची माणसं फुलपाखरासारखी रंगीबेरंगी दिसायची. डोंगरावरून गेलेल्या नागमोडी वाटा, खळाळते पाणी सर्वकाही विलोभनीय दिसायचं. यात्रेत मौजमजा, सोबत शाळेत फडक्यात गुंडाळून नेलेली बाजरीची भाकर, भुरका, लोंच अन् यात्रेतली भेळ खाऊन पिऊन झालं की रानं आबादानी. यात्रेत तांब्या गरम करून महापुरुषांच्या छोट्या फोटोंचे छापे खिशावर मारण्याचा आम्हाला भारी नाद. एकदा दहा रुपये मोजून शर्टाच्या खिशावर शिवाजी महाराजांचा फोटो छापला अन् दुसर्‍या दिवशी पुन्हा तोच शर्ट शाळेत घालून गेलो. तर मास्तराने आगंतुक मूल्यांची आठवण करून देत छडीने फोडून काढले. तेव्हा आजही श्रावणात महादेवाची यात्रा, महाराज आणि मास्तर सोबतच आठवतात..!

तरीही पोत्याचा घोंगटा करून चिखल तुडवीत, कधी खळाळत्या पाण्यातून वाट काढत शाळेत जाणं सोडलं नाही. आभाळाचा अंदाज पाहून मुख्याध्यापक आम्हा खेड्यापाड्यातील पोरांना दुपारीच सुट्टी देत. दुपारी सुट्टी मिळाली की मग गावाकडं जाणारा सरळ रस्ता सोडून आमचा मोर्चा सरळ आडवाटेनं निघायचा. मनसोक्त जांभळं, मुगाच्या शेंगा खात खात, पांदीला ओले सागरगोटे काढायचे. रस्त्यावर येऊन रिंगण मारले की डाव सुरू. सागरगोटा दगडावर घासून दुसर्‍याला चटका द्यायला जाम मजा वाटायची. तर कधी शाळेच्या रस्त्यावर लागणार्‍या तळ्यावर पोहायला. आभाळाने ‘फळी’ धरली की पोरं शाळेतून अजूनही कशी आली नाही म्हणून घरी चलबिचल सुरू व्हायची. कोणाच्याही घरचं कोणी तरी एकजण सायकल काढून शाळेत जावूनही यायचे, तेव्हा त्यांना कळायचं की पोरांना दुपारीच सुट्टी झाली होती. आमचा डाव मध्येच कुठे तरी तळ्याच्या भिंतीवर रंगलेला असायचा. हे कायमचं असल्यामुळं आपसुकच आम्ही सापडले जायचो. पुन्हा सगळं काही पावसाने झोडपून काढावं तसं नित्याचंच…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -