गजानृत्य

पारंपरिक वेशभूषेत असलेले वीसएकजण या खेळात दंग झाले होते. हा खेळ कुठला? तेव्हा कळलं की, या खेळाला गजानृत्य असे म्हणतात. हे नृत्य धनगर समाजाचे लोकनृत्य आहे. गजानृत्य या शब्दाची फोड केली असता गज म्हणजे हत्ती, या नृत्यप्रकाराचे स्वरूप बघितले असता हत्ती जसा एकाच ठिकाणी उभा राहून डुलत डुलत असतो त्याप्रकारे या नृत्याचे साधारण स्वरूप असते.

नृत्य

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल मी सातारा जिल्ह्यातील वाकी वरकुटे या मित्राच्या गावी गेलो होतो. त्या मित्राच्या सांगण्यावरूनच जवळ असणार्‍या शिखर शिंगणापूर या स्थळाला आम्ही भेट द्यायाला गेलो. हे शिखर चढायला सुरुवात केली आणि त्याच्या पायथ्याशीच बघितलं तर भंडारा उडवला जात होता. आजूबाजूला लोक झुंडीने जमा झाले होते. कुतुहूल म्हणून आम्ही गर्दी कसली म्हणून तिथे गेलो.तर तिथे पारंपरिक खेळ चालला होता. पायाच्या टाचा उंचावत आम्ही तो खेळ बघू लागलो. त्या खेळाने मी मंत्रमुग्ध झालो. पाय जागेवर खिळून राहिले. कानात लोकगीताचे शब्द पडू लागले….हाय रं गज्जा…जान्पाय जान्पाय ….!!.

पारंपरिक वेशभूषेत असलेले वीसएकजण या खेळात दंग झाले होते. हा खेळ कुठला? तेव्हा कळलं की, या खेळाला गजानृत्य असे म्हणतात. हे नृत्य धनगर समाजाचे लोकनृत्य आहे. गजानृत्य या शब्दाची फोड केली असता गज म्हणजे हत्ती, या नृत्यप्रकाराचे स्वरूप बघितले असता हत्ती जसा एकाच ठिकाणी उभा राहून डुलत डुलत असतो त्याप्रकारे या नृत्याचे साधारण स्वरूप असते. धनगर समाजाबद्दल जाणकारांनी एक निकष मांडला आहे तो असा- हा समाज मुखत्वे शेळ्या-मेंढ्या पाळून त्यावर आपली उपजीविका करण्याच्या निमित्ताने अगदी गोकुळ, वृंदावन आणि मथुरेहून गुजरातेत आले आणि तेथून महाराष्ट्रात उतरले. त्यामुळे या गजानृत्यात या ठिकाणच्या पारंपरिक नृत्याची झलक आपणास बघावयास मिळते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजदेखील दसर्‍याच्या दिवशी गजानृत्य सादर करतो. पूर्वीच्या काळी कमरेला लंगोटी आणि खांद्यावर घोंगडी एवढाच परिग्रहाचे साधन असणारा हा उंच धिप्पाड गडी गजानृत्य करताना मात्र पांढरा चोळणा, पांढरा सदरा गळ्यात माळ घालून नृत्याला उभा राहत असे. त्यापैकी काहीजण मात्र उघड्याअंगाने गळ्यात ढोल घेऊन गाण्याच्या तालावर ठेका धरतात. या लोकनृत्याच्या वेळी गायली जाणारी गीते ही एका पिढीने दुसर्‍या पिढीकडे पारंपरिक पद्धतीने सोपवलेली आढळतात. या गीतांमध्ये बहुतेक धार्मिकतेचा भाग असतो. धनगर समाजाच्या दृष्टीने बिरोबा, धुळोबा आणि शिंगरोबा या दैवतांना विशेष महत्त्व आहे. यातील शिंगरोबाबद्दल एक कथा सांगितली जाते ती अशी-मुंबई पुणे महामार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंगरोबा म्हणून कोणी एक घनगर रहात होता.

या शिंगरोबा धनगराने आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता वापरून मुंबई-पुणे हा रेल्वेमार्ग कसा तयार करावा याबाबत इंग्रज अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. शिंगरोबा मेंढ्या पाळण्याच्या निमित्त या डोंगरदर्‍यातून फिरला असल्याने रस्ता कसा करावा, बोगदे कुठे तयार करावेत याबाबत इंग्रज अधिकार्‍यांना मार्गदर्शन केल्याने आधुनिक मुंबई-पुणे हा लोहमार्ग तयार झाला. पुढे हा लोहमार्ग तयार झाल्यावर त्या इंग्रज अधिकार्‍याने शिंगरोबाला मारून टाकले. ज्या जागेवर शिंगरोबाला ठार केले त्याठिकाणी शिंगरोबाचे स्मारक म्हणून एक छोटेसे देऊळ बांधले गेले आहे. या शिंगरोबाला हा समाज देव मानतो.

आजही जनमानसात शिंगरोबाची कथा समाजरूढ आहे. गजानृत्यामध्ये या आणि अशा देवांची आराधना करण्यासाठी ओव्या गायल्या जातात. या ओव्या पद्य स्वरुपात असून त्यामागून गद्य भाग म्हणजे कथा येते. ही कथा म्हणजे ओव्याच असतात, म्हणजे ओव्यांचाच भाग कथेत येतो. या कथेच्या भागाला ‘सपाद्नी’ असे म्हटले जाते. या शिंगरोबाच्या ओव्यातील पहिली ओवी तर प्रत्येकाच्या मुखात असते. सुंबरान मांडीलं ग सुंबरान मांडिला….. यातील सुंबरान हा शब्द बहुदा शिंगरोबा या दैवतावरून घेतला असावा.

सुंबरान मांडीलं ग, सुंबरान मांडीलं
शिंगृबा हे नावाचा, रहात व्हता धनगर.
खंडाळ्याच्या घाटाला गं खंडाळ्याच्या घाटाला
रस्ता नव्हता घावत गोर्‍या सायबाला
शिगृबाला बोलतो रस्ता दाव आम्हाला.
म्होर तवा जायला. म्होर तवा जायला.
रस्ता दावला शिंगृबान गोर्‍या त्या सायबाला.
गोरा सायब झाला बईमान ग झाला बईमान गं.
गोळी त्यान भरलं नी ठार केला शिंगृबा
गोळीयाचा आवाज गं, मेंढ्यांच्या कानाला.
गोळी मग आयकुनी , शिंगृबाच्या भवतन
शेळ्या गोळा मेंढ्या गोळा.
आन गोळा बगा व्होउन, वरडाय लागल्या.
नारळाच फळ या खंडाळ्याच्या घाटाला
फळ बगा देऊनी गाडी गेली निगुनी.
सुंबरान मांडील गं सुंबरान मांडील

अशा प्रकारे शिंगरोबा धनगराच्या बुद्धिमत्तेची महती सांगणारी कथा पद्य आणि गद्य रुपात ऐकायला मिळते. धनगर समाज पूर्वी भटकण्याच्या व्यवसायामुळे स्थिर नव्हता. आज या समाजातील तरुणवर्ग शिकत आहे, उच्च पदावर नोकरी करत आहे. तरी या लोककलेला विसरलेला नाही.

हे गजानृत्य इतर लोककलेप्रमाणेच संशोधनाचा विषय ठरले आहे. यातील कथा आणि गाणी आता आधुनिकतेकडे वळताना दिसतात. पण गजानृत्यात ठराविक पदन्यास त्याचा ठेहराव अजूनही बदललेला नाही. आधुनिकीकरणामुळे गजानृत्यातील गाणी ही देवदेवतांपर्यंत मर्यादित न रहाता भारतीय स्वातंत्र्य, देशभक्ती, देशनिष्ठा यांचे महत्त्वदेखील या गाण्यातून व्यक्त होताना दिसते. या लोककला जपणार्‍या लोकांना भेटल्यावर या गोष्टींची प्रचिती येते. या लोककलेला जपणार्‍या कलाकारांनी जी माहिती दिली त्यावरून काही गावखेड्यात नैसर्गिक आपत्ती जसे दुष्काळ किंवा अतिवृष्टी यामुळे नुकसान थांबण्यासाठी गजानृत्य देवळात किंवा अंगणात सादर केले जाते. त्यावेळी त्या नृत्यातून या संकटापासून वाचवण्यासाठी ते देवाची करुणा भाकतात. तसेच घरात कोण आजारी असेल तरी हे गजानृत्य सादर करण्याची प्रथा आहे. या गजानृत्याच्या सादरीकरणाने संकट दूर होते अशी गावची एक श्रद्धा आहे.

या श्रद्धेच्या पलीकडे जी आधुनिकीकरणाची जी गाणी गायली जातात तीदेखील विशेष भावतात.
सुंबरान मांडील गं सुंबरान मांडील
तिरंगी झेंड्याला राष्ट्राच्या ध्वजेला वंदन करून.
मात्या आणि पित्याला वंदन करुनी.
दोनी मार्ग दाखवले त्या गुरूला वंदन करुनी.
बसलेल्या तमामाला, शाहिराचा मुजरा.
कथी ढोलावर काठी पडली आणि आणि गजानृत्याला सुरुवात झाली की, सगळं विसरून त्या नृत्याचा थिरक बघत राहावा, आपल्याला मोहून टाकल्याशिवाय राहणार नाही. शेवटी एक ओळ मनावर ठसून राहते.
चांदण्या राती बसविला मेळ
रंगला कसा बघा माझ्या गजाचा हा खेळ.

– प्रा. वैभव साटम.