घरफिचर्सस्टॅन्ले कॉफमन आणि सत्यजीत राय

स्टॅन्ले कॉफमन आणि सत्यजीत राय

Subscribe

सत्यजीत राय हे जीवन गौरवाचं ऑस्कर मिळवणारे कलाकार.त्यांचेही चित्रपटांच्या अनेक अंगांवर प्रभुत्व होते. भारतीय सिनेमाला वास्तववादाशी नाळ जुळलेल्या नव्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणारे म्हणून त्यांची ओळख आहे.

काही माणसांकडे अनेक गुण असतात.अशी माणसे चांगलीच ध्यानात राहतात.त्यातही ती जर रुपेरी दुनियेतील असली तर त्यांच्याबाबत जास्तच कौतुक वाटतं. अगदी चटकन आठवतात राज कपूर,किशोर कुमार.चित्रपटांच्या अनेक अंगांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि किशोर कुमारचं तर राज कपूरपेक्षा थोडं जास्त.कारण निर्माता-दिग्दर्शक,अभिनेता,संकलक,तर तो होताच पण त्याशिवाय तो संगीतकार,गीतकार आणि गायकही होता.इतका चांगला की गायक म्हणूनच अनेकांना त्याची ओळख आहे.त्यांच्याच थोरवीचे,किंबहुना त्यापेक्षा जास्त थोर मानले जाणारे सत्यजीत राय हे जीवन गौरवाचं ऑस्कर मिळवणारे कलाकार.त्यांचेही चित्रपटांच्या अनेक अंगांवर प्रभुत्व होते. भारतीय सिनेमाला वास्तववादाशी नाळ जुळलेल्या नव्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. अर्थात मराठी माणसांना मात्र याबाबत बाबूराव पेंटर यांच्या सावकारी पाश ची आठवण होईल. (पण नेहमीप्रमाणे मराठी माणसाकडे नेहमीच होते तसे दुर्लक्ष त्यांच्याकडेही झाले.)तर आपण बोलत होतो सत्यजीत राय यांच्याबाबत.

आपल्याकडे अशी एक रीत आहे की,एखाद्याला श्रेष्ठ ठरवले की मग तो जे काय करील ते दर्जेदार,चांगलेच म्हणायचे.काही झालं तरी तोही अखेर माणूसच आहे,त्याच्याकडून काही कमीजास्त होऊ शकते हे आपण मान्यच करत नाही.आधी जरी त्यांच्याबाबत आधी काहीही बोललेले,लिहिलेले असले तरी श्रेष्ठत्व मिळाल्यावर ते सारे विसरून त्यांना फक्त चांगले म्हणायचे हे अगदी कर्तव्य समजून पार पाडले जाते. राय यांचे सिनेमे भिन्न प्रकृतीचे होते तरी सर्वच तसे नाहीत. काहीही झाले तरी माणसाला आपल्या कामाला सर्वांची दाद मिळावी असे वाटतच असते.

- Advertisement -

त्यामुळे पथेर पांचाली,अपराजितो आणि अपूर संसार(परदेशांत द वर्ल्ड ऑफ अपू)अशी त्रिधारा बंगालीमध्ये निर्माण केल्यानंतर राय यांनी सर्वसामान्य लोकांनाही आवडतील असे तीन कन्या, (परदेशात टू डॉटर्स म्हणून दाखवल्या गेलेल्या या सिनेमात भारतात आणखी एक कथा जोडण्यात आली होती)जलसाघर,देवी आणि त्यांनंतरही काही बंगाली चित्रपट माधवी मुखर्जी,शर्मिला टागोर,सिमी,स्मिता पाटील अशा अभिनेत्रींना घेऊन तयार केले आणि नंतर हिंदीतही शतरंज के खिलाडी. त्याहीपेक्षा महत्त्वाची आणि दुर्लक्ष झालेली त्यांची निर्मिती म्हणजे त्यांनी तयार केलेले अनेक माहितीपट,हिमालयन लेक्स हा त्यापैकी दीर्घकाळ स्मरणार राहणारा.

पहिले तीन सिनेमे क्रांतीकारी म्हटल्यावर नंतरच्यांवर केवळ ते चांगलेच रंजक होते म्हणून टीका करणे हे कर्तव्य असल्याचे मानून तसे केले गेले. आता असे का हा ज्याच्या त्याच्या मतांचा प्रश्न आहे.म्हटलेच आहे ना,एका माणसाचे विष ते दुसर्‍याचे अमृत असते. परदेशातही काही वेगळी तर्‍हा नसते. तेथेही अशा आवडी निवडी भिन्नच असतात व त्या सिनेमांबाबतच्या लिखाणात दिसतातही. अमेरिकेतील आघाडीचे सिनेसमीक्षक म्हणून ओळखले गेलेले स्टॅन्ले कॉफमन यांचे ए वर्ल्ड ऑफ फिल्म नावाचे एक पुस्तक आहे,त्यामध्ये त्यांनी द न्यू रिपब्लिकमध्ये केलेल्या परीक्षणांपैकी निवडक परीक्षणांचा त्यात समावेश आहे. त्यानंतर ते न्यूयॉर्क टाइम्समध्ये नाट्यसमीक्षक म्हणून काम करू लागले होते.विविध देशांतील ख्यातनाम दिग्दर्शकांच्या कलाकृतींची ओळख त्यांनी या पुस्तकात करून दिली आहे.त्यातील काही आशियाई(सम एशियन्स) या विभागात त्यांनी सत्यजीत राय आणि जपानचे अकिरा कुरोसावा यांच्या काही चित्रपटांच्या समिक्षांचा समावेश केला आहे. त्यात अपूची बी.बॅनर्जी यांच्या पथेर पांचाली या कादंबरीवर आधारलेली त्रिधारा,टू डॉटर्स आणि द म्युझिक रूम (जलसाघर) यांचा समावेश आहे. (मुख्य म्हणजे हे चित्रपट वेगवेगळेही स्वतंत्रपणे पाहिले तरी काही बिघडत नाही.)
त्रिधारेतील पथेर पांचाली आणि अपराजितो यांच्यापेक्षा अपूर संसार कसा भिन्न आहे ते त्यांनी दाखवले आहे.

- Advertisement -

आधीच्या चित्रपटांत काही तांत्रिक तुटी असतीलही पण ते भारतीय जीवनाचे, हळूवार, काव्यात्म दर्शन घडवत होते व ते भारताचा अभिमानाचा विषय होते. त्यातील पात्रे ही केवळ वैयक्तिक कहाण्याच सांगत होती तरीही त्यांतून त्यांच्या स्वतःपेक्षा एका विशाल गोष्टीचेही कथन करत होती.अपूर संसार(द वर्ल्ड ऑफ अपू)मात्र त्या दर्जाचा विचार करता संकुचित वाटतो.तो केवळ एकाच व्यक्तीची कहाणी सांगतो.विशिष्ट परिस्थितीत झालेले त्याचे लग्न. एका विवाहाला तो गेला असताना ऐनवेळी नियोजित वर-नवरा मुलगा वेडसर असल्याचे कळल्याने केवळ लग्न मोडल्याने त्या मुलीचे आयुष्य वाया जाऊ नये म्हणून अपूला तिच्याशी लग्न करणे भाग पडते.पण त्यानंतर त्याचा संसार,पत्नीचे अचानक निधन,त्याचे त्याला झालेले दुःख आणि नंतर त्याची विमनस्क अवस्थेतील,दाढी वाढलेल्या अवस्थेतील भटकंती,ही अगदी नाटकी प्रकारची आणि नंतर शेतांमधून एक एक पाऊल उचलत सूर्यास्ताकडे चाललेला अपू,या सार्‍या गोष्टींनी आपण आणि ही कलाकृती यांत दुरावा निर्माण होतो,असे त्यांनी लिहिले आहे.

पथेर पांचालीबाबत त्यांनी म्हटले आहे की, याची येथे येईपर्यंत वाजवीपेक्षा जास्तच स्तुती झाली आहे. तो चित्रपट बनला आहे एवढ्याच कारणाने. त्याची लांबी निदान एक-पंचमांश कमी करता आली असती. गरीब ब्राह्मण कुटुंबाची माहितीपटाच्या धर्तीवर चित्रित केलेली ही कथा साधारण खिळवून ठेवणारी आहे. तिचे अतिशय सुंदर चित्रण करण्यात आले आहे.सर्वसाधारण कृतींमधूनही म्हणजे चालणे, पाण्याच्या कळशा घेऊन चालणे इ. यातूनही हे लोक किती डौलदार हालचाली करतात ते कळते.अगदी गरीब अशा या कुटुंबातील थाळ्या,मातीची भांडी,त्यांची गोधडीसारखं पांघरुणं यांतही र्सौदर्य दिसते.ही एक मोहक सौंदर्यदृष्टी आहे. पण त्याचबरोबर ती त्यांच्या नैसर्गिक प्रकृती आणि स्वभावाचे दर्शन घडवतेः म्हणजे भिन्न प्रकारच्या वास्तवावर विश्वास ठेवून ते उपासमारीबरोबर लढा देत आहेत.

अपराजितोबाबत ते म्हणतात की हा पाहिला तर आधीचा जास्तच चांगला वाटायला लागतो.कारण तो राय यांनी जाणीवपूर्वक देशातील महान चित्रपट म्हणूनच बनायचा प्रयत्न केला आहे.त्यात पहिल्यापेक्षा अधिक नाट्य आहे आणि जेव्हा येथे दुःख येते तेव्हा ते आपल्यालाही ओढून घेते.केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली धडपड न राहता तो अधिक खोलवर पोहोचतो आणि त्यामुळे पहिल्या सिनेमातील व्यक्तिरेखांवर अधिक प्रकाश पडल्यासारखे वाटते.मला पथेर पांचालीतील आईमध्ये आता इच्छा नसूनही आक्रस्ताळी बनलेली बाई न वाटता तिच्यात अधिक गुंतागुंत दिसते.
तो शिक्षणासाठी कलकत्त्याला जातो. आईच्या गाठीभेटी दीर्घकाळानेच पडतात.वडिलांनंतर त्यांच्याप्रमाणेच पुजारी बनण्याचा काकांचा आग्रह अपू मान्य करत नाही. तो अंत्यसंस्कारांसाठीही न थांबता मी ते कलकत्त्यातच करीन असे सांगतो.अशा प्रकारे दारिद्र्य,अभिमान आणि बुद्धीमत्ता घेऊन अपू आता जगात जायला निघतो.त्याच्या आईला आता बदल केवळ त्याच्यातच नाही तर सार्‍या विश्वातच होत आहे असे वाटते.कॉफमन त्यांनी असे नोंदले आहे की, राय प्रत्येक चित्रपटानंतर बरेच काही नवीन शिकत आहेत.ज्यावेळी अपू बॅग खांद्यावर टाकून मोठी पावले टाकत रेल्वे स्टेशनकडे जात असतो तेव्हा आपण या त्रिधारेतील अखेरच्या चित्रपटाचा विचार करू लागलेले असतो.

अपूर संसारबाबत लिहिताना ते शेवटी म्हणतात की, ही त्रिधारा समाधानकारक आहे,असे आपण म्हणू शकत नाही. हा अखेरचा भाग भावनात्मक असला तरी आपल्याला एकूण त्रिधारेचा विचारच करावा लागेल.एकसारख्या नसल्या तरी या कलाकृती राय यांनी पुर्‍या केल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना आघाडीवरील दिग्दर्शकांत स्थान मिळाले आहे.त्याला कारण त्यांची या माध्यमाबाबतची एकंदर दृष्टी, निष्ठा आणि त्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती अगदी नोंद घ्यावी अशी आहे.


-आ.श्री.केतकर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -