घरफिचर्सभारतातील विमाननिर्मितीचे उड्डाण

भारतातील विमाननिर्मितीचे उड्डाण

Subscribe

भारतातील विमान उद्योगाची सुरुवात २३ डिसेंबर १९४० रोजी झाली. त्या दिवशी वालचंद हिराचंद यांनी हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड ही कंपनी बंगलोर येथे स्थापन केली. या कंपनीने दट्ट्याचे इंजिन असलेल्या व प्रशिक्षणासाठी वापरावयाच्या हॅर्लो विमानाचे परवान्यानुसार उत्पादन करण्याचे काम प्रथम हाती घेतले. बंगलोर येथे जुळणी करून बनविलेल्या पहिल्या हॅर्लो विमानाचे चाचणी उड्डाण जुलै १९४१ मध्ये करण्यात आले. त्यापुढील महिन्यात सैनिकांची ने-आण करणार्‍या दहा आसनांच्या ग्लायडरचे चाचणी उड्डाण करण्यात आले. या ग्लायडरचा अभिकल्प (आराखडा) विष्णू महादेव घाटगे यांनी तयार केला होता. विमानाचा अभिकल्प तयार करणे व विमानांचे उत्पादन करणे ही कामे कंपनी करीत असे. १९४२ साली कंपनीने आपल्या या कामांत बदल केला. दुसर्‍या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना मदत करण्यासाठी असा बदल करण्यात आला. आग्नेय आशियात दोस्त राष्ट्रे वापरीत असलेल्या लढाऊ, बॉम्बफेकी व वाहतुकीच्या विमानांची दुरुस्ती व संपूर्ण निरीक्षण (ओव्हरहॉल) करण्याचे काम कंपनी करू लागली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कंपनीने विमानाचा अभिकल्प तयार करण्याचे व विमान उत्पादनाचे काम परत हाती घेतले. दट्ट्याच्या इंजिनाचे, प्रशिक्षणासाठीचे एचटी-२ या विमानाचा अभिकल्प तयार करण्याचे काम ऑक्टोबर १९४८ साली घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले. याच्या पहिल्या आद्य नमुन्याचे उड्डाण ऑक्टोबर १९५३ मध्ये करण्यात आले. कंपनीने बनविलेली अशी अनेक विमाने भारतीय हवाई दलात तीस वर्षांहून अधिक काळ वापरात होती. नंतर कंपनीने मरूत (एचएफ-२४), किरण, पुष्पक व कृषक या विमानांचे अभिकल्प तयार करून उत्पादन करण्याचे काम हाती घेतले.

- Advertisement -

कूर्ट टँक (टांक) हे जर्मन गृहस्थ मरूत विमानाचे प्रमुख अभिकल्पक होते. त्यांच्या हाताखाली अभियंते, आरेखक, कार्यशाळा तंत्रज्ञ व साहाय्यक अशा १,००० भारतीयांची तुकडी काम करीत होती. मरुतचा अभिकल्प तयार करण्यास ऑगस्ट १९५६ मध्ये सुरुवात झाली व त्याच्या पहिल्या आद्यनमुन्याचे उड्डाण जून १९६१ मध्ये करण्यात आले. किरण, पुष्पक व कृषक या विमानांचे प्रमुख अभिकल्पक घाटगे होते. किरणच्या अभिकल्पाची सुरुवात डिसेंबर १९५९ मध्ये झाली व त्याच्या पहिल्या आद्यनमुन्याचे उड्डाण सप्टेंबर १९६४ मध्ये करण्यात आले. याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात आले. झोत विमानाचे मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय हवाई दलात वापरण्यात येणारे मरुत हे प्रमुख विमान आहे.

जानेवारी १९६० मध्ये भारत सरकारने हॉकर सिड्ली व व्हरो-७४८ (ब्रिटन) या विमानांच्या उत्पादनासाठी हवाई दलाचा एक विभाग म्हणून एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डेपो कानपूर येथे स्थापन केला. ऑगस्ट १९६३ मध्ये एरॉनॉटिक्स इंडिया लिमिटेड ही कंपनी स्थापली. सोव्हिएट मिग-२१ या विमानांच्या सांगाडा-चौकटी, एंजिने व वैमानिकीय इलेक्ट्रॉनिकीय घटक यांचे उत्पादन करण्यासाठी या कंपनीने ओझर (जि. नासिक), कोरापूट (ओरिसा) व हैदराबाद येथे कारखाने उभारले. एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग डेपोचे जून १९६४ मध्ये एरॉनॉटिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीत विलीनीकरण करण्यात आले. नंतर या कंपनीचेही हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड या कंपनीत विलीनीकरण होऊन हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही कंपनी ऑक्टोबर १९६४ मध्ये स्थापन झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -