सोशल मिडियावर लिहिण्यास कारण की…

social media

मी सोशल मिडियावर आले तेव्हा फेसबुक अस्तित्वात नव्हतं. म्हणजे खरंतर मी आणि माझ्यासारख्या अनेक जणी प्री फेसबुक काळातल्या आहोत. तेव्हा ऑर्कुट एकदम जोरात होतं. ऑर्कुटच्या गुहेत काय दडलंय हे शोधायला आम्ही अनेक जणी त्यावेळी ऑर्कुटवर गेलो होतो. त्यानिमित्ताने नव्या ओळखी झाल्या. जुने शाळकरी, कॉलेजकरी मित्र-मैत्रिणी भेटायाला सुरुवात झाली होती. सेलिब्रिटी हाकेच्या अंतरावर आले होते. समाज माध्यमांचं मार्केटिंग आणि सोशल मिडिया सेलिब्रिटी हा प्रकार अजून जन्माला यायचा होता, स्मार्टफोनवर सतत ऑर्कुट बघण्याची सोय नव्हती. जेव्हा केव्हा निवांत वेळ मिळेल किंवा कामातून जरा उसंत मिळाली कि ऑर्कुट म्हणजेच सोशल मिडियावर जाण्याची पद्धत होती. पण तेव्हाही बायाकांचा ठळक वावर या माध्यमातून दिसायचा.मग आलं फेसबुक. आणि पाठोपाठ इतर अनेक सोशल नेटवर्किंग साईट्स. आणि तिथे वावरणार्‍या लोकांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

विशेषतः स्त्रियांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली. आज आपल्या ओळखीतली जवळपास प्रत्येक स्त्री फेसबुकवर असते. ट्विटरवर सगळ्या नसल्या तरी संख्या मोठीच आहे. व्हॉट्स अँप प्रत्येक जण वापरतं, अनेक जणी अनेक ग्रुप्समध्ये स्वतःचं लेखन पोस्ट करत असतात. डेटिंग साईटवर वावरण्याचं तरुणीचं प्रमाणही जोमाने वाढतंय. बायकांचा सोशल मीडिया वावर बारकाईने बघितला तर तो पुरुषांपेक्षा बराच वेगळा आहे.

सर्वसामान्य, कुठल्याही विशिष्ठ प्रोफाइल नसलेल्या, विविध आर्थिक, सामाजिक स्तरातल्या बायकांना लिहितं करण्यात फेसबुकचं मोठं योगदान आहे असं मी मानते. फेसबुकवरच्या लिखाणाच्या चोर्‍या करणं, त्यात थोडेफार फेरफार करून आपल्या नावाने खपवणं असले उद्योग स्त्रिया करतात हे मान्य असूनही मला वाटतं, सर्वसामान्य स्त्रियांना लिहितं करण्यात फेसबुक महत्वाची भूमिका बजावतं. माझ्या आयुष्याचे प्रश्न इतर कुणी लेखिकेने लिहिणं आणि ते मीच स्वतः माझ्या शब्दात मांडणं, थेट वाचकांना भिडणं हे करण्याची मोठीच संधी सोशल नेटवर्किंग साईट्सने दिली आहे. ब्लॉगिंग पेक्षा हे वेगळं, जलद आणि थेट आहे. त्याचा परिमाणही तितकाच जलद आणि थेट आहे. तीव्र आहे. म्हणूनही असेल पण सोशल नेटवर्किंग साईट्स वर व्यक्त होणार्‍या स्त्रिया हा एक खूप मोठा क्रांतिकारी बदल आहे.
अशा कितीतरी स्त्रिया आहेत, ज्या एरवी, कशाही विषयी काहीही लिहायला गेल्या नसत्या, त्यांनी लिहिलेल्या चार ओळी

वृत्तपत्रांनी, मासिकांनी छपल्या नसत्या, किंवा छापल्या असत्या तरी त्यांना हव तेव्हा, हवं तसं, हवं त्या शब्दात व्यक्त होण्याची मुभा त्यांना मिळाली नसती. सोशल मीडियाने ती संधी स्त्रियांना दिली आहे. आता कुणी असंही म्हणेल, स्त्रिया नको इतके लिहायला लागले आहेत, कशाला आपल्या आयुष्यात काय चालू आहे ते सगळं लिहायचं, सतत काही ना काही लिहीत राहिलं पाहिजे असं कुठेय? पण लिहिलं तरी त्यात बिघडतं कुठे? काही विशिष्ठ शहरांमधल्या, विशिष्ठ वर्तुळात वावरणार्‍या स्त्रियांना ‘स्त्रीपणा’ विषयी व्यक्त होण्याची संधी असणं आणि कुठल्याही स्त्रीला व्यक्त होण्याची संधी असणं यात, दुसरा पर्याय जास्त महत्वाचा, गरजेचा आणि मोठा बदल घडवणारा वाटतो. कालपर्यंत कुठलाही चेहरा नसलेल्या कितीतरी स्त्रिया आज विविध विषयांवर लिहिताना दिसतात.

राजकारणापासून सामाजिक बदलांपर्यंत आणि स्त्रियांच्या प्रश्नांपासून विनोदी लेखनापर्यंत सगळ्या आघाड्यांवर प्रस्थापित चेहर्‍यांपेक्षा खूप नवे चेहरे सोशल मिडियामुळे पुढे आले आहेत. या स्त्रियांची भाषा त्यांची आहे. ती अनेकदा पांढरपेशी नाहीये. भाषा आणि विषय प्रचंड मोकळे आहेत. ते लिहितांना आजवर समाजानी बायकांच्या व्यक्त होण्याला घातलेल्या चौकटी, कुंपणं ओलांडून अनेक जणी पुढे जाताना दिसतात. अमुक एका पद्धतीने लिहिलं म्हणजे ते सभ्य आणि सुसंकृत बाकी सगळं गचाळ मानणार्‍या अभिरुची संपन्नतेच्या भ्रामक कल्पनांच्या पुढेही जाता येणं पुष्कळसं सोशल मिडियामुळे शक्य झालंय हे नाकारून चालणारच नाहीये. आणि या सगाळ्याचा सोशल मिडीयावर वावरणार्‍या स्त्रिया पुरेपूर वापर करून घेताना दिसतात.

ही झाली एक बाजू पण बायकांनी मुक्तपणे व्यक्त होण्याच्या या सगळ्या प्रयत्नांच्या बर्‍या वाईट प्रतिक्रियाही याच व्यासपीठावर मोठ्याप्रमाणावर उमटतांना दिसतात. जेव्हा वर्चस्ववादाच्या चौकटी फुटतात, आवाज होतोच. तसा तो सोशल मिडियावरही होतो आहेच. मोकळेपणाने लिहिणार्‍या स्त्रियांविषयी वाईटसाईट बोलणं, त्यांना ट्रोल करणं, त्यांच्या लेखनाला गचाळ ठरवून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं या आणि असल्या गोष्टी सातत्याने होतायेत. होत राहणार आहेत. खरंतर प्रकाशित होणारं प्रत्येक पुस्तक आपण विकत घेतो का, वाचतो का किंवा आपल्याला आवडणार्‍या लेखकाचीही सगळी पुस्तकं आपण विकत घेतोच असं नाही, मग सोशल मीडियावर चालू होणारी, व्यक्त होणारी प्रत्येक वॉल आपण वाचलीच पाहिजे असाही नियम नसतो. मोकळेपणाने, धीटपणे व्यक्त होणार्‍या स्त्रियांची वॉल आपल्याला आवडत नसेल, झेपत नसेल, पेलवत नसेल, गलिच्छ वाटत असेल तर ती वॉल वाचायला जाऊ नये इतका मूलभूत सभ्यतेचा नियम अनेकांना समजत नाही आणि मग सेक्सबद्दल, स्त्री पुरुष नातेसंबंधांबद्दल, नात्यातल्या पॉवर गेम्स बद्दल, स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या लैंगिक सुखाबद्दल, न्यूडिटीबद्दल मोकळेपणाने लिहीणार्या स्त्रियांचा त्रास व्हायला लागतो. लोक स्वतःच्या नजरेत असलेल्या सभ्यतेच्या फूटपट्ट्या घेऊन हिच्या तिच्या वॉलवर हिंडताना दिसतात. कधी एकेकटे तर कधी टोळीने. यात फक्त पुरुष असतात असं नाहीये, यात स्त्रियांचीही संख्या पुष्कळ असते.

सोशल मिडियामुळे बायका कशा वाहवत चालल्या आहेत, त्यांचं घराकडे मुलांकडे, घरातल्या लोकांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं, त्यांचं सगळं लक्ष सोशल मिडियावर मिळणार्‍या मान्यतेवर लागलेलं असतं, त्यांच्या अशा वागण्याने कुटुंब विस्कळीत होतात, घराचं घरपण हरवून जातं. एक ना अनेक आरोप स्त्रियांवर करण्याची हल्ली एक पद्धत आहे. सोशल मीडियाचं व्यसन कुणालाही लागू शकतं. नियमितपणे सोशल मीडिया वापरणार्‍या फक्त स्त्रियांना ते लागतं आणि पुरुषांना ते लागूच शकत नाही असा अविर्भाव आणण्याची खरंच गरज नसते. सोशल मिडियाची व्यसनाधीनता हा स्वतंत्र विषय आहे, पण इथे वावरणारा प्रत्येक जण व्यसनी नसतो. प्रत्येक जण वाहवत गेलेला नसतो. त्यामुळे सोशल मीडियामुळे बायका कशा बिघडत चालल्या आहेत याची चर्चा करत, त्यावरचे जोक्स फॉरवर्ड करून या विचाराचं सार्वत्रीकरण करण्यापेक्षा बायकांच्या सोशल मिडिया वावराच्या सकारात्मक बाजूंकडे बघण्याची नितांत आवश्यकता आहे.

स्वतःला हवं तेव्हा, हवं त्या शब्दात, हव्या त्या पद्धतीने व्यक्त करण्याची संधी असणं, इतरांनी व्यक्त केलेल्या मतांवर चर्चा करण्याची संधी मिळणं, मनातली घुसमट काढण्यासाठी व्यासपीठ आणि श्रोते उपलब्ध असणं, आपलं कुणीतरी ऐकून घेणार आहे, आपल्याला जे सांगायचं आहे ते ऐकायला कुणीतरी उत्सुक आहे हे माहित असणं, टिंगल टवाळी करायला मिळणं, प्रत्यक्षात नाही पण आभासी जगात कट्टे जमवण्याची संधी मिळणं अशा कितीतरी गोष्टी आहे, ज्यासाठी स्त्रिया फेसबुकवर येतात, टिकतात. टीका झाली, ट्रोलिंग झालं तरी ते पचवून त्यांना जे म्हणायचं आहे ते लिहीत राहतात.
हे खूप महत्वाचं आहे.

अमेरिकेतल्या मॅश हॅमिल्टन या महिला पत्रकाराने ‘अफगाण वुमेन्स रायटिंग प्रॉजेक्ट’ काही वर्षांपूर्वी सुरु केला. अफगाणी स्त्रियांच्या मनातल्या निरनिराळ्या भावभावनांना वाट करून देणं इतकाच या प्रॉजेक्टचा हेतू आहे. महिलांना लिहितं करावं, त्यांच्या मनातली तगमग शब्दात मांडता यावी, त्यांच्या लेखनातून त्यांच्या मनाचा ठाव घेत एक दस्तावेज उभा राहावा यासाठी गेली अनेक वर्ष हि चळवळ सुरु आहे. भारतात आणि विशेषतः मराठीत फेसबुकवर लिहीणार्या स्त्रियांची अशी कुठलीही चळवळ नाहीये. वुमेन रायटिंग प्रॉजेक्ट नाहीये. पण सोशल मिडियावर आलेल्या सगळ्या लेखनाचा एकत्रित विचार केला तर समकालीन स्त्रियांनी त्यांच्या जगण्याचा रोजच्या रोज घेतलेला तो आढावा आहे. एक प्रचंड मोठा दस्तावेज आहे. ज्याला फुटकळ ठरवण्याची चूक आपण न केलेली बरी !