घरफिचर्सप्रतिकारशक्ती कमी होणे हेच व्याधींचे मूळ कारण !

प्रतिकारशक्ती कमी होणे हेच व्याधींचे मूळ कारण !

Subscribe

आयुर्वेद या प्राचीन भारतीय वैद्यकीय शास्त्रात आयुर्वेदिय चिकित्सेइतकेच पथ्यकर आहार-विहाराला महत्त्व दिले आहे. ज्या कारणांनी व्याधी झाला त्यांचा त्याग करणे हे चिकित्सेचे पहिले सूत्र असल्याने कॅन्सरग्रस्त रुग्णांनी अयोग्य आहार-विहाराच्या सवयी वर्ज्य कराव्यात. व्याधी प्रतिकारशक्ती कमी होणे हेच सर्व व्याधींचे मूळ असल्याने कॅन्सरमध्येही व्याधी क्षमत्व वाढविणारा आहार पथ्यकर ठरतो.

मागील लेखात आपण कॅन्सर व आयुर्वेदिय शोधन चिकित्सा याबद्दल माहिती जाणून घेतली. आजच्या लेखात आपण कॅन्सर व आयुर्वेदिय शमन चिकित्सा, अनुषंगिक उपक्रम, रसायन चिकित्सा व पथ्यकर आहार याबाबत जाणून घेणार आहोत.

शोधन चिकित्सा घेण्यास रुग्णाचे बल चांगले असणे आवश्यक असते. कॅन्सर व्याधीमुळे रुग्ण अशक्त झाला असल्यास त्याला शोधन चिकित्सा देता येत नाही. अशावेळी रुग्णास शमन चिकित्सा देणे आवश्यक ठरते. यात प्राधान्याने मुखावाटे औषधे देऊन वाढलेल्या दोषांना शरीरात साम्यावस्थेत आणले जाते. यात एकेरी वनस्पतीज चूर्णे, मिश्र चूर्णे, गुटी-वटी, आसव-अरिष्ट, गुग्गुळकल्प, सिद्ध तेल, सिद्ध घृत (औषधांनी सिध्द केलेले तूप), काढे, स्वरस (वनस्पतींचा ताजा रस), सिद्ध जल, सिद्ध दुग्ध, रसकल्प अशा विशिष्ट औषधी कल्पनांंचा समावेश होतो.

- Advertisement -

अनुषंगिक उपक्रमांचा विचार करता, शिरोपिचू, शिरोधारा, शिरोबस्ति, योनीपिचू, योनीधावन, गंडूष यासारखे उपक्रम विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपयुक्त ठरतात. मस्तिष्काच्या (मेंदूच्या) कॅन्सरमध्ये शिरोपिचू (डोक्यावर औषधी तेलात बुडवलेला कापसाचा बोळा ठेवणे), शिरोधारा (कपाळावर औषधी तेलाची धार सोडणे), शिरोबस्ति (शिरप्रदेशी तेल धारण करणे) तर मुख व गलगत कॅन्सर प्रकारात गंडूष (औषधी काढ्याने गुळण्या करणे) लाभदायी ठरते. गर्भाशयमुखाच्या कॅन्सरमध्ये योनीधावन (योनीप्रदेशाची औषधी काढ्याने शुध्दी करणे) व योनीपिचू (योनीप्रदेशी औषधी तेलात/तूपात बुडवलेला कापसाचा बोळा ठेवणे) हे उपक्रम लाभदायी ठरतात.

कॅन्सरमध्ये रसादी सात धातूंची विकृती असते. त्यामुळे कॅन्सरची चिकित्सा करताना व कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्यासाठी रसादी सात धातूंना बल देणारी रसायन चिकित्सा महत्त्वपूर्ण ठरते. यात दूध, तूप, साळीचा भात यासारखा सात्विक रसायन आहार, शतावरी, गुळवेल, आवळा युक्त रसायन औषधे व मानसिक शुचिता वाढविणारे आचार रसायन म्हणजेच धर्मविहित आचरण यांचा समावेश होतो.

- Advertisement -

आयुर्वेद या प्राचीन भारतीय वैद्यकीय शास्त्रात आयुर्वेदिय चिकित्सेइतकेच पथ्यकर आहार-विहाराला महत्त्व दिले आहे. ज्या कारणांनी व्याधी झाला त्यांचा त्याग करणे हे चिकित्सेचे पहिले सूत्र असल्याने कॅन्सरग्रस्त रुग्णांनी अयोग्य आहार-विहाराच्या सवयी वर्ज्य कराव्यात. व्याधीप्रतिकारशक्ती कमी होणे हेच सर्व व्याधींचे मूळ असल्याने कॅन्सरमध्येही व्याधीक्षमत्व वाढविणारा आहार पथ्यकर ठरतो. यासाठी तांदूळ भाजून भात-साठेसाळी मिळाल्यास उत्तम, भाताची पेज, तांदळाचे घावन, फुलका, ज्वारीची – तांदूळाची भाकरी, रव्याची पेज, रव्याचा गोड शिरा, उपमा, मुगाचे वरण, मसूर डाळीचे वरण, पडवळ – कोबी – दुधी – भेंडी – दोडका – तांदूळजा यासारख्या भाज्या, तूप – जिरे धने – आले – लसूण – कांदा यांची फोडणी दिलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप यांचा आहारात समावेश करावा. ल्युकेमिया म्हणजे रक्ताच्या कॅन्सरमध्ये मूळा – बीट- गाजर सूप, २ खजूर – १ सुके अंजीर व ५ – १० काळ्या मनुकामिश्रित गाईचे दूध, कोकमाचे सार (नारळाचे दूध न घालता) असा रक्तवर्धक आहार हितकर ठरतो.

कॅन्सरमध्ये भूक मंदावणे, तोंडाला चव नसणे अशी लक्षणे बहुतांशी दिसत असल्याने मोरावळा, लिंबाचे गोड लोणचे, सुधारस जेवणात समाविष्ट करावा. बहुतांशी गोड, आंबट रसाची फळे तर्पण करणारी असतात. त्यापैकी कॅन्सरमध्ये गोड द्राक्षे, गोड डाळिंब, सफरचंद, सुका मेव्यापैकी काळ्या मनुका, अंजीर, खजूर यांचा आहारात समावेश करावा. फळे ताजी, गोड असावी. हिवाळ्यात – पावसाळ्यात फळांच्या फोडींना सूंठपुड, जिरे – मिरेपूड लावून सेवन केल्यास किंवा फळांच्या रसात चिमूटभर सुंठ पावडर घातल्यास सर्दी-कफाचा त्रास होणार नाही.

मांसाहारी कॅन्सर रुग्णांमध्ये विशेषत: ज्या कॅन्सर रुग्णांचे वजन कमी होत आहे, अशक्तपणा आहे, हाडामध्ये कॅन्सर पसरला आहे, अशा रुग्णांत मटणसूप किंवा चिकनसूप – तूप, जिरे, मिरे, आले, लसूण अशा पाचक द्रव्यांची फोडणी देऊन घेतल्यास लाभदायक ठरते. रक्तक्षय – पांडुरोगाची लक्षणे असल्यास प्राधान्याने पायासूप किंवा लिव्हरसूप उपयुक्त ठरते.

थोडक्यात पचनास हलका परंतु शरीरातील रस रक्तादी सातही धातूंचे वर्धन – तर्पण करणारा, मल – मूत्रांचे शरीराबाहेर योग्य प्रकारे विसर्जन करण्यास मदत करणारा, प्रतिकारशक्ती वाढविणारा आहार कॅन्सर रुग्णांना पथ्यकर असतो.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख

-ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
-संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -