घरक्रीडाभरोसेमंद ते बेभरवशाचा...

भरोसेमंद ते बेभरवशाचा…

Subscribe

एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७४ सामन्यांत जवळपास ५० च्या सरासरीने ७९१० धावा, जागतिक क्रमवारीत काही वर्षांपूर्वीपर्यंत अव्वल स्थान, मात्र इंग्लंडमधील विश्वचषकासाठी संघात स्थान मिळण्याबाबत अनिश्चितता! ही कहाणी आहे द.आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाची. विश्वचषकासाठी द.आफ्रिकेच्या संघाची घोषणा होण्याआधी काही दिवस आमलाची संघात निवड होण्याबाबत प्रश्नचिन्ह होती. याला कारण होते त्याचा मागील काही काळातील फॉर्म. एबी डी व्हिलियर्स, फॅफ डू प्लेसिस यांच्यासोबत आमला हा द.आफ्रिकन संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ होता.

मात्र, आमलाचे प्रदर्शन दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. आमलाच्या गाठीशी असलेला अफाट अनुभव आणि इंग्लंडमधील चांगली कामगिरी लक्षात घेऊन द.आफ्रिकेच्या निवड समितीने त्याची विश्वचषकाच्या संघात निवड केली. दोन्ही सराव सामन्यांत अर्धशतक करणार्‍या आमलाला इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मात्र अवघ्या १३ धावाच करता आल्या. त्यातच जोफ्रा आर्चरच्या तेजतर्रार मार्‍याने त्याला चांगलेच अडचणीत टाकले. आर्चरचा चेंडू हेल्मेटला लागल्यामुळे त्याला मैदानाबाहेरही जावे लागले. त्यामुळे आगामी सामन्यांत आपले संघातील स्थान टिकवायचे असल्यास आमलाला कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.

- Advertisement -

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०००, ३०००, ४०००, ५०००, ६००० आणि ७००० धावांचा टप्पा पार करणार्‍या आमलाने २०१८ च्या सुरुवातीपासून १६ सामन्यांत अवघ्या ३३.८८च्या सरासरीने ५४२ धावा केल्या आहेत. आपल्या कामगिरीतील सातत्यासाठी ओळखल्या जाणार्‍या आमलाला मागील ४ वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ ६ शतके करता आली आहेत. त्याआधीच्या ४ वर्षांत याच आमलाने ११ शतके केली होती. त्याला केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच धावांसाठी झुंजावे लागत आहे का?, तर नाही.

कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानल्या जाणार्‍या आमलाला मागील ५ वर्षांत केवळ ५ शतके करण्यात यश आले आहे. याउलट त्याआधीच्या ५ वर्षांत त्याने खोर्‍याने धावा करताना १६ शतके लगावली होती. त्यामुळे आमलाची आधीची कामगिरी आणि मागील काही काळातील कामगिरी यात खूप तफावत आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीला खेळण्याच्या तंत्रावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

- Advertisement -

द.आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये दर्जेदार फलंदाजांचा दुष्काळ आहे. रायली रुसो, हायनो कुन यांसारखे बरेच फलंदाज आता इंग्लंडमध्ये जाऊन खेळण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे आमलासारख्या अनुभवी फलंदाजाला संघातून वगळणे निवड समितीला कठीण जात आहे. यंदाचा विश्वचषक सुरु होण्यापूर्वी द.आफ्रिकेचा फॅफ डू प्लेसिसने ही गोष्ट मान्य केली होती की आमलाला मागील काही वर्षांत कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले आहे.

मात्र, त्याच्याकडे असलेल्या अनुभवामुळे तो संघात टिकून आहे. आता या विश्वचषकात द.आफ्रिकेला आपला ‘चोकर्स’चा शिक्का पुसून टाकायचा असल्यास आमलाला चांगला खेळ करावा लागेल. तो आता विश्वचषकात आपल्या अनुभवाचा फायदा घेत दमदार कामगिरी करतो का? याकडे सार्‍यांचे लक्ष असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -