घरफिचर्सईरशाळ सुळक्याची भ्रमंती

ईरशाळ सुळक्याची भ्रमंती

Subscribe

चौक फाटा ते ईरशाळ वाडी हे अंतर साधारणपणे तासाभराचे आहे. सुरुवातीला वेगाने चालणारी पावले सूर्य माथ्यावर आल्यावर मंदावली. पुरेसा पाणीसाठा सोबत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला होता. ऊन-सावल्यांच्या खेळात तर कधी एखाद्या झाडाखाली क्षणभर विश्रांती घेत आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी असणारी ईरशाळवाडी गाठली.

सकाळी साधारण ९ च्या सुमारास खोपोली गाठली. बाजारपेठेतून मार्गक्रमण करत आम्ही एस.टी. स्थानकाजवळ आलो. रस्त्यावर बर्‍यापैकी वर्दळ होती. जांभूळ, करवंदे, काजू, आंबे असा गावरान मेवा घेऊन विकायला बसलेल्या स्त्रियांची लगबग सुरू होती. खोपोली नगरपालिकेच्या बसेस एका बाजूला लागल्या होत्या. मात्र त्यातील पनवेल बस सुटण्यास अवकाश असल्याने आम्ही एस.टी.चा पर्याय निवडला. आजच्या प्रवासात जेमतेम चौघांची साथ लाभली. एस. टी. महामंडळाच्या लाल डब्यात बसून मी ईरशाळ सुळक्याचा मनोमन अंदाज बांधू लागलो. एव्हाना चौकच्या दिशेने प्रवास सुरु झाला होता. चौक फाटा…!! कोण उतरणारे असतील तर लवकर उतरून घ्या…!!

एस.टी. वाहकाच्या आवाजाने भानावर येऊन आम्ही गाडीतून उतरलो. महामार्गालगत असलेल्या तुळजाभवानी उपाहारगृहात अल्पोपहार उरकून घेतला. गरमा गरम समोसे आणि फक्कड चहाचे घुटके घेत आम्ही ईरशाळ सुळक्याकडे पाहत होतो. चौक फाटा ते ईरशाळ वाडी हे अंतर साधारणपणे तासाभराचे आहे. सुरुवातीला वेगाने चालणारी पावले सूर्य माथ्यावर आल्यावर मंदावली. पुरेसा पाणीसाठा सोबत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला होता. ऊन-सावल्यांच्या खेळात तर कधी एखाद्या झाडाखाली क्षणभर विश्रांती घेत आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी असणारी ईरशाळवाडी गाठली.

- Advertisement -

लहान परंतु सुसंगत असणारी घरांची रचना, शेणाने सारवलेल्या कुडाच्या भिंती, घराशेजारी असणारा जनावरांचा गोठा, अंगणात लहान मुलांसोबत असलेल्या वयोवृद्ध स्त्रिया आणि त्यांचा पेहेराव, घरामागील परिसरात फुलवलेली हिरवळ पाहून दुर्गम भागदेखील आपले वैयक्तिक आयुष्य समाधानाने जगत असावा अशी माझी धारणा झाली. मूलभूत सुविधांची पूर्तता झाल्यास दुर्गम भागदेखील कायापालट करू शकतो याची जाणीव मनाला झाली होती. वस्तीशेजारी असणार्‍या एका छोट्या मंदिरात नारळ अर्पण करून आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. पायवाटेने चालत असताना आंबे तसेच करवंदांचा मोह आम्हाला काही केल्या स्वस्थ राहू देत नव्हता. एका ठिकाणी कपारींच्या सहाय्याने सुळक्याकडे जाणारी वाट होती. त्या वाटेने आम्ही सुळक्याच्या दिशेने चढाई सुरु केली. काही अंतरावर कातळात खोदलेले एक पाण्याचे टाक आहे. थंडगार पाण्याने आमची तहान भागवली होती. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरेसा आणि पिण्यायोग्य पाणीसाठा असलेले येथील हे एकमेव पाण्याचे टाक असावे.

डावीकडे विशाळा देवीची मूर्ती आहे. येथे एक लाकडी शिडी बसविल्याने पुढे जाण्याचा मार्ग सोपा बनला आहे. सोपे प्रस्तारारोहण करून आम्ही नेढ्यापर्यंत पोहोचलो. ईरशाळ सुळक्याबद्दल बरेच ऐकून होतो मात्र आज प्रत्यक्षात अनुभवण्याची वेळ होती. नेढ्यातून मोरबे धरण आणि आसपासच्या परिसराचे विस्तीर्ण रूप दिसत होतं. पूर्वेला आपल्या अफाट विस्ताराने नावाजला जाणार प्रबळगड, त्याला खेटून असणारा कलावंतीण सुळका तर पश्चिमेला दूरवर दिसणार कर्नाळा किल्ला या सर्वांची भ्रमंती करून आलेला मी ईरशाळ सुळक्याच्या नेढ्यात बसून आज त्यांची विस्तीर्णता अनुभवत होतो. आभाळा एवढं सामर्थ्य असलेल्या सह्याद्रीच्या दर्‍या-खोर्‍यांतून भटकंती करण्याचा हा आनंद गर्भश्रीमंतांपेक्षा कांकणभर जास्तच…!! दुपारचे जेवण उरकून आम्ही नेढ्याच्या उजवीकडील बाजूने वर प्रवेश केला आणि आकाशाला गवसणी घालणारा उंच सुळका दृष्टीस पडला. सुळक्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचण्याकरीता प्रस्तरारोहणाची आणि आवश्यक त्या सामुग्रीची आवश्यकता असल्याने आम्ही दुरवरूनच दंडवत केला. छायाचित्रण उरकले आणि आसपासचा परिसर डोळ्यांत साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

- Advertisement -

नेढ्यातून उतरत असताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. किंचित घाई किंवा बेसावधपणा गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे ईरशाळ सुळक्याला भेट देणार्‍या नवख्या गिर्यारोहकांनी आपल्यासोबत अनुभवी व्यक्तींना घेऊन जाणे योग्य ठरेल. एकंदरीत ईरशाळ सुळक्याची ही भेट अविस्मरणीय ठरली आणि या आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही कर्जतच्या दिशेने रवाना झालो.



– संदेश कुडतरकर (पाऊलखुणा ट्रेकर्स)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -