घरफिचर्सवडेट्टीवारांची साधनशुचिता!

वडेट्टीवारांची साधनशुचिता!

Subscribe

वडेट्टीवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. कोणत्याही विषयावर वक्तव्य करण्याचा त्यांना अधिकार जरूर आहे. मंत्री असल्याने अधिकारवाणीने ते राजकारणावरही बोलू शकतात. पण संकट ओढवून घेतलं जाईल, असं वक्तव्य त्यांना आणि ते ज्या सरकारमध्ये आहेत त्या महाविकास आघाडीला परवडणारं नाही, याची जाण वडेट्टीवार यांनी ठेवली नाही.

राजकारणात सारं काही माफ असतं, असं अनेकांना वाटतं. यामुळे आपण कसंही वागलं, काहीही बोललं तरी चालतं, अशी राजकारणातल्या अनेकांची मानसिकता असते. यामुळेच कंबरेचं सोडून ते डोक्याला बांधतात. आजवर महाराष्ट्रातल्या राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे की आज कोणीही कोणाविषयी काहीही बोलतो. मोठ्याचा मान राखावा असं त्यांना वाटत नाही. साधनशुचितेचं त्यांना जणू काही पडलेलंच नाही. हे दोन्हीकडून पध्दतशीरपणे सुरू आहे. खासगीतील गोष्टी राजकारण्यांनी उगाळू नयेत, असे संकेत असतात. या संकेतांनाही ही मंडळी पायदळी तुडवतात तेव्हा त्यांच्या जिभेला हाड आहे की नाही, असा प्रश्न सहज पडतो. गेल्या आठवड्यात राज्याचे एक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या कुठल्याशा वक्तव्याची जाहीर कार्यक्रमात उजळणी घेतली. आपण खूप काही तीर मारल्याचा अविर्भाव वडेट्टीवारांचा होता. गडकरींना फडणवीसांची जिरवायची होती, असं सांगताना वडेट्टीवार यांच्या चेहर्‍यावर या दोघांमधल्या कथित वैराचा प्रचंड आनंद दिसत होता. नांदेडच्या बिलोलीत प्रचार सभेत त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. पण त्यामुळे वडेट्टीवारांची शोभा झाली असेच म्हणावे लागेल, कारण वडेट्टीवारांच्या या विधानानंतर गडकरी यांनी वडेट्टीवरांचे विधान खोडून काढले. राजकारणात टीका करताना कितपर्यंत खाली जायचे याला आता काही सीमा राहिलेली नाही, असेच दिसते. काही गोष्टी या खासगीत बोलल्या जात असतात, ते अंदाज असतात, याला कोणताही ठोस आधार नसतो. अशा गोष्टी जाहीर भाषणांमध्ये बोलायच्या नसतात, हा एक प्रोटोकॉल असतो. वडेट्टीवार यांनी गडकरी यांच्यासारख्या कर्तृत्व सिद्ध केलेल्या नेत्याबद्दल अशा प्रकारचे विधान करून फार काही मिळवले असे नाही.

वडेट्टीवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. कोणत्याही विषयावर वक्तव्य करण्याचा त्यांना अधिकार जरूर आहे. मंत्री असल्याने अधिकारवाणीने ते राजकारणावरही बोलू शकतात. पण संकट ओढवून घेतलं जाईल, असं वक्तव्य त्यांना आणि ते ज्या सरकारमध्ये आहेत त्या महाविकास आघाडीला परवडणारं नाही, याची जाण वडेट्टीवार यांनी ठेवली नाही. यातूनच त्यांनी भाजपच्या या दोन नेत्यांमधल्या वादाला फोडणी दिली. फडणवीस हे राज्यातील राजकारणात आणि भारतीय जनता पक्षातही तसे ज्युनियरच. ज्युनियर असतानाही इतरांना दूर ठेवत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. अचानक झालेल्या या बदलाने भाजपतील अनेकांच्या भुवया जशा उंचावल्या तसं पक्षातले इतर ज्येष्ठ नेते नाराज होणं हे स्वाभाविक आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यात आलेल्या अहंकाराने सार्‍यांनाच धक्के बसले. विशेषत: पक्षातील बुजूर्ग कोपर्‍यात गेले. स्पर्धेतील सर्वांचेच काटे काढण्यात आले. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे या स्पर्धेतील नेत्यांचा पध्दतशीर बिमोड करण्यात आला. गडकरी तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले राज्यातील एकमेव नेते होते. राज्याची सत्ता हाती येणं हा जसा एकनाथ खडसे यांचा अधिकार होता. तसा तो गडकरींचाही होता. पण फडणवीसांच्या वशिलेबाजीमुळे अधिकार असतानाही मुख्यमंत्रीपदाचा मान या ज्येष्ठांना मिळू शकला नाही. केंद्रात मंत्री असणं आणि राज्यात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. तसं केंद्रीय मंत्र्यांचं नाही. आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणजे ‘ना जान ना पहेचान मै तेरा मेहमान’, असा प्रकार होय. अर्थात याला गडकरी अपवाद आहेत. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पदाला त्यांनी पुरेपूर न्याय दिला. यामुळे मंत्रिमंडळातील एकमेव तत्पर मंत्री म्हणून गडकरींचं नाव सर्वच घेतात. अनेकजण बुक्क्याचा मार म्हणून हे दडपण स्वीकारत आहेत, हे वास्तव नाकारता येत नाही. पण म्हणून गडकरींनी नाराजी व्यक्त करू नये, असं नाही. यात वडेट्टीवार यांनी नाक खुपसावं, हे अजिबात अपेक्षित नाही. वडेट्टीवार हे जरी विदर्भातील नेते असले तरी दुसर्‍या पक्षात काय चालू आहे, यावर उघड भाष्य करण्याचा अधिकार त्यांना काँग्रेस पक्षाने दिलेला नाही. गडकरींविषयी तर त्यांनी बोलणं शक्यतेहून पलिकडचं होतं. आपल्या मनातील खल खासगीरित्या व्यक्त करून अनेकांना हलकं झाल्यासारखं वाटत असतं. ते त्यांनी कोणा मित्राकडे व्यक्त केलं असेल तर ते जाहीर सभेत व्यक्त करण्याची आवश्यकता काँग्रेसच्या वडेट्टीवारांना नाही. आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारपुढच्या अडचणी वडेट्टीवार यांना चांगल्या ठावूक आहेत. भाजपच्या नेत्यांना आपल्या मतदारसंघाकडे पाहण्याऐवजी फडणवीसांनी या नेत्यांना जणू महाविकास आघाडीवर नजर ठेवण्यासाठीच नेमलं, अशी स्थिती असताना एका ज्येष्ठ मंत्र्याने गडकरींविषयी काहीबाही वक्तव्यं करणं अगदीच खोडसाळपणाचं आहे. वडेट्टीवारांच्या उथळ स्वाभावाचा महाविकास आघाडीच्या सरकारला यापूर्वीही धक्का बसला होता. गडकरी देशातील जनतेसाठी कितीही मोठे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापुढे कोणालाच किंमत नाही. म्हणून त्या व्यक्तीचं महत्व कमी होत नसतं, इतकंही वडेट्टीवार यांना कळू नये? कोण्या फडणवीसांची जिरवण्याइतका कद्रूपणा गडकरींकडे नाही. त्यांचा तो स्वभावही नाही. गडकरी आणि फडणवीस यांची कुठल्याच क्षेत्रात एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. प्रगल्भ राजकारणाची परंपरा गडकरींच्या मागे आहे. या राजकारणात त्यांनी कधीच कोणाला कमी समजलं नाही. विरोधी पक्षनेते म्हणून राज्य विधानसभेत त्यांनी सत्ताधारी काँग्रेस आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. पण त्यांनी व्यक्तीगत राग सत्ताधार्‍यांवर ठेवल्याचं दिसलं नाही. किंवा विरोधकांना धडा शिकवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला नाही. राजकारणातील शुचिर्भूतता त्यांनी जपलीच पण विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी आपलं महत्व सत्ताधार्‍यांना दाखवून दिलं.

- Advertisement -

कुठल्याही कारणासाठी अगदी वडेट्टीवार यांच्याकडेही गडकरींनी नाराजी व्यक्त केलीही असेल. यासाठी त्यांनी विश्वासाचा धागा सांधला असेल. तर तो तुटणार नाही, याची खबरदारी संबंधिताने घेतली पाहिजे. त्याऐवजी सार्वजनिक करून आपण विश्वासपात्र नाही, असंच वडेट्टीवार यांनी दाखवून दिलं आहे. गडकरी यांच्यावर असे प्रसंग अनेकदा आले. त्यांचं महत्व कमी करण्यासाठी ते विरोधकांशी जवळकी साधून असल्याच्या असंख्य तक्रारी त्यांच्याच पक्षातून झाल्या. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र वरचढच राहिला पाहिजे यासाठी गडकरींनी अनेकदा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत बैठकी घेतल्या. या बैठकांनी अनेकांना पोटशूळ उठलं. जाब विचारावा म्हणून अनेकांनी काड्याही लावल्या. पण त्याचा उपयोग झाला नाही. २०१९च्या निवडणुकीच्या काळात भाजपला पुन्हा सत्ता मिळायची असल्यास नितीन गडकरींचं नाव संघाने पुढे केलं होतं. तेव्हाही विरोधी पक्षातल्या अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. आणि शरद पवार यांनी गडकरींच्या सुरक्षेची काळजीही वाहिली होती. याचा अर्थ समजून घेण्याइतकी तयारी वडेट्टीवार यांची नाही, याचं आश्चर्य वाटतं. जिभेवर आलेल्या सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, याचं भान राखलं तर वडेट्टीवार मोठे होतील. गर्दी पाहून काहीबाही बोलत रहिलं तर नेत्याचं आणि नेतेगिरीचंही महत्व राहत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -