घरफिचर्सदुभंगलेलं गांव - भाग १

दुभंगलेलं गांव – भाग १

Subscribe

सलवा जुडूमच्या धुमाकुळानंतर पातरपारा आत्ताशी कुठे सावरलेय.आणि आता परत ही नवीन समस्या.ठीक आहे आपल्या संरक्षणासाठी आले म्हणतात, पण एकदा सांगायचे-विचारायचे नाही?शहरात तुमच्या घरात आम्ही असे घुसलो तर?आवडेल तुम्हाला?तंबू कुठे लावायचा हे सुद्धा आम्हाला ठरवायचा अधिकार नाही?कमाल आहे?आदिवासी गावात प्रश्नांचा डोंगर उभा झाला.

मे २०१३ चा एक दिवस:
सीआरपीएफचा कँप आपल्या गावात लावू द्यायचा का?पोडीयाराम हाबका प्रश्न उपस्थित करतात. पातरपारा गावाचं या प्रश्नावर एकमत होत नाही. अजून तरी. हाबका हे बस्तरच्या बिजापूर जिल्ह्यातील पातरपारा या छोट्याशा आदिवासी गावचे तरूण सरपंच. दोन दिवसांपूर्वी मोठाल्या गाड्या गावात आल्या. कुणाला थांग-पत्ता नाही. एका दिवसात सीआरपीएफच्या जवानांनी गावाच्या मधोमध तारांचे कुंपण तयार केले. दोन-तीन तंबू गाडले.आणि मग लोकांना कळले की त्यांना नवीन शेजारी मिळालेत. पण हे शेजारी न विचारताच आले.
आपले घर. हे लोक बाहेरचे.आणि आपल्या घरात तंबू गाडून बसले तर आपल्याला विचारलेसुद्धा नाही. साधा शिष्टाचार नाही.आपल्या गावात पोलिसांची छावणी होणार,हे कोणीच कसे कळवले नाही?
त्यामळे गावातील लोक अस्वस्थ.शेवटी सरपंचाकडे आले. आपण याबद्दल काहीतरी केले पाहिजे असा त्यांचा आग्रह.या पोलीस कँपमुळे गावाला त्रास होईल,ही त्यांची वाजवी भीती.

सलवा जुडूमच्या धुमाकुळानंतर पातरपारा आत्ताशी कुठे सावरलेय. आणि आता परत ही नवीन समस्या. ठीक आहे आपल्या संरक्षणासाठी आले म्हणतात,पण एकदा सांगायचे-विचारायचे नाही? शहरात तुमच्या घरात आम्ही असे घुसलो तर?आवडेल तुम्हाला?तंबू कुठे लावायचाहे सुद्धा आम्हाला ठरवायचा अधिकार नाही?कमाल आहे?आदिवासी गावात प्रश्नांचा डोंगर उभा झाला. आज त्यावर विचार-विमर्श करायला पातरपारा गावातील आदिवासी जमलेत. सत्तर-ऐंशीलोकं.बाया, माणसं, पोरं, वृद्ध,सगळेच आहेत. ‘बाकीचे येतील हळूहळू’,असे गोंडी भाषेत म्हणत हाबका रीतसर सभेला सुरुवात करतात.भर उन्हाळ्यात आंब्याच्या झाडाखाली सावलीत भरलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी गावाचे एक ज्येष्ठ आहेत.

- Advertisement -

एक फाटक्या कपड्यातला साधारण चाळीशीत असलेला सडपातळ माणूस गोंडीत बोलायला सुरुवात करतो.माझ्याबरोबर असलेला माझा एक सहकारी मित्र माझ्या कानात कुजबूजतो. जिथे कँप ठाकला आहे,ती या व्यक्तीची जमीन आहे.त्याचे घरही बाजूलाच आहे.तो विचारतो आहे त्याने कुठे जायचे?हाबका ऐकून घेतो.आणि एका कागदावर टिपणलिहितो.तो माणूस म्हणतो, कँप गावाबाहेर लावायला सांगा. सलवा-जुडूम संपल्यानंतर बस्तरच्या गावांत काय स्थिती आहे हे बघून-समजून त्यावर एक शृंखला ज्या वर्तमानपत्रासाठी मी काम करीत होतो तिथे लिहिण्याचा माझा मानस होता. मी गावांत पोचलो तेव्हा या बैठकीविषयी समजले. कुतूहल वाटले. म्हणून थांबलो.

एका पाठोपाठ एक असेलोक आपले म्हणणे शांतपणे मांडत आहेत.एवढ्या संकटातसुद्धा,या आदिवासींचा तोल जात नाही हे पाहून-ऐकून मला त्यांची कमालच वाटली.अवास्तव मोठ्या आवाजात कोणीही बोलत नाही.सभ्य भाषेत, सगळे आपले मत मांडतात आणि दुसर्‍याचे ऐकून घेतात. माझा मित्र मला सांगतो: सगळ्यांचे म्हणणे बहुतेक एकच आहे.कँप लावायचाच असेल तर गावात नको.‘काहींचे म्हणणे असे की आपल्याला पोलिसांचा किंवा सरकारचा विरोध करता यायचा नाही. उद्या नक्षलवादीही धारेवर धरतील तर त्यांनासुद्धा आपल्याला समजावता यायचे नाही. मधल्यामध्ये आपली गोची होणार.
त्यामुळे पोलिसांना फक्त हात जोडून विनंती करायची, की कृपया आपला कँप वेशीबाहेर लावावा.जुडूमची जुनी छावणी होती तिथे आता कोणीच राहत नाही.त्या जागेवर हा कँप हलवावा, हाच या संकटावर तोडगा असेल. दोन-तीन तासांच्या चर्चेनंतर लोकांचे असे ठरले की हाबका आणि गावातील काही लोक तसे विनंतीवजा पत्र अधिकार्‍यांना लवकरच देतील. स्थानिक आमदारांकडेही तशी विनंती करतील.
क्रमश:

- Advertisement -

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -