घरफिचर्सआवाज कुणाचा

आवाज कुणाचा

Subscribe

मला बाबासाहेब खूपच आवडतात, भावतात, पटतात. कारण त्यांनी मुक्यांना ‘आवाज’ दिला. त्या आवाजाबद्दल मला इथे आज तुमच्याशी बोलायचे आहे. माझा जन्म शहरातला. शिक्षण घेतलं शहरात आणि आयुष्याचा बराच काळ शहरातच एकदम मध्यमवर्गीय क्षेत्रात, मध्यमवर्गीय लोकांसाठीच नोकर्‍या केल्या. शहरात लोक उशिरा का होईना एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर का होईना, पण बोलतात.

आज 14 एप्रिल, जगभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस ‘मानवता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कदाचित माझ्यासारखे तुम्हीही आज या साजरीकरणात सहभागी असाल. महामानवांचे जन्मदिन कसे साजरे करावे हा आपल्याकडचा मोठाच वादाचा मुद्दा आहे. आपण फारच महान आहोत. ज्या कारणासाठी त्या महामानवाने त्यांचे आयुष्य कारणी लावलेले असते त्या तत्वांची आपण पार वाट लावतो. उदा. बुद्धाने मूर्तीपूजा नाकारली; पण जगभरात सर्वात जास्त मूर्ती बुद्धाच्या आहेत. हिंदू धर्मातल्या कर्मकांडामुळे मानवतेला काळिमा फासला जात होता म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडला आणि सर्वांना बौद्ध धर्मात प्रवेश करुया असे सांगितले, तर आमच्या महाभागांनी बौद्ध धर्माचेच कर्मकांड करून टाकले. जगभर बाबासाहेबांना स्त्रियांचे उद्धारकर्ते म्हणून ओळखले जाते; पण ज्या देशाची राज्यघटना बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लिहिली गेली,ज्यावर त्यांच्या विचारांचा, संशोधनाची छाप आहे त्यातले स्त्रियांसाठीचे कायदे अमलात यायला अजूनही हवी त्या प्रमाणात सुरुवात झाली नाही. देशाच्या एक राष्ट्र प्रमुख पदावर बाई विराजमान झाल्या या एकाच अनुभवावर स्त्रियांवर रोज होणारे अन्याय दुर्लक्षिले जातात.

- Advertisement -

मला बाबासाहेब खूपच आवडतात, भावतात, पटतात. कारण त्यांनी मुक्यांना ‘आवाज’ दिला. त्या आवाजाबद्दल मला इथे आज तुमच्याशी बोलायचे आहे. माझा जन्म शहरातला. शिक्षण घेतलं शहरात आणि आयुष्याचा बराच काळ शहरातच एकदम मध्यमवर्गीय क्षेत्रात, मध्यमवर्गीय लोकांसाठीच नोकर्‍या केल्या. शहरात लोक उशिरा का होईना एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर का होईना पण बोलतात. एकदा माणसं बोलायला लागली की मग त्यांना शिस्त लावता येते. पण जिथे माणसं बोलतच नाही तेव्हा त्यांचं स्वतःचं, समाजाचं आणि सार्‍या देशाचं काय नुकसान होतं याचा अनुभव सध्या मी घेते आहे. पूर्वी मला ‘बोलणार्‍याचे कुळीद विकले जातात; पण न बोलणार्‍याचे बन्सी गहू विकले जात नाही’, असं माझी आजी म्हणायची त्याचा अर्थ आता कळायला लागला आहे.

ज्या ज्या समूहांना त्यांच्या आवाजाचा शोध लागला, त्यांनी तो आवाज वापरला त्या त्या समूहाचं, त्या त्या व्यक्तींचं भल झालं. अनेक वर्षे कौटुंबिक हिंसाचार झाल्यामुळे त्रस्त झालेल्या स्त्रियांसोबत काम करीत होते. प्रत्येक स्त्रीला ‘तुला आवाज आहे’ याची जाणीव करून दिली की ती बरोबर तिच्या समस्यांवर मात करते, असा आमचा अनुभव आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की, स्त्रियांना जाणीव करून देणे हे आमचे काम आहे. त्यांच्यावतीने मारामारी करण्याची गरज नसतेच. सध्या आदिवासी भागात राहते, आदिवासी समूहातील सहकार्‍यासोबत काम करते तेव्हा पुन्हा एकदा या ‘आवाजा’ची कमी जाणवते आहे. फक्त आणि फक्त आदिवासी आवाज करीत नाहीत. त्यामुळे त्यांची साधन, त्यांचे वाटेचे बजेट दुसरेच कोणीतरी बिनबोभाट वापरताना दिसतात.

- Advertisement -

आमच्याकडे आदिवासी भागात तीन तीन प्रकारचे बजेट आणि त्यांच्या तरतुदी असतात. ग्रामपंचायतीचे स्वतःचे बजेट, पेसाचे बजेट असते, 14 वा वित्त आयोग शिवाय राज्याचे आदिवासींसाठी विशेष बजेट असते. एवढं सगळं असूनही मोखाडा, जव्हार किंवा कुठल्याही तालुका पातळीवरील गावांचे मुख्य रस्ते सोडले तर रस्ता शोधावा लागतो आहे. मला पंधरा दिवसांतून एकदा कधीतरी तेही एसी गाडीतून जायचे असते. तरी खड्ड्यांमधून रस्ता शोधून गाडी चालवणार्‍या आमच्या सर्व गाड्या चालकांचे विशेष आभार मानावेसे वाटतात; पण या रस्त्यांवरून जाणारे गावकरी, स्थानिक लोक, अधिकारी, लोकप्रतिनिधी कोणीच यावर ‘आवाज’ उठवताना दिसत नाही. मग तुम्हाला ते टिपिकल उत्तर माहीतच असेल की, आईसुद्धा बाळ रडल्यानंतरच बाळाला खायला, प्यायला देते तसं सरकार, कुठल्याही प्रकारचे अधिकारी मागणी नाही म्हणून चक्क काम सोडून देतात. कंत्राटदाराला हाताशी धरून, त्याचे पाकीट यांना पोहोचले की काम पूर्ण झाल्याचा दाखला मिळतो आणि कामाची बिलं मात्र लगेच वेळेवर मिळतात. हे सगळं राजरोस घडतं. कारण कोणीच, कशावरच बोलत नाही, ‘आवाज’ उठवत नाही.

आमच्याकडच्या लोकवस्त्या विरळ आहे म्हणून शाळा फक्त झेडपीच्या आणि त्याही फक्त चौथीपर्यंतच. या शाळेचे शिक्षक बर्‍याच वेळा शाळेत येतच नाही, आले तर वेळेवर येत नाही, आले तर ते चांगले शिकवतीलच याची काहीही शाश्वती नसते; पण तरी गाव गप्प. पावसाळ्यात शाळा गळते, गावाला रस्ता नाही, आमच्याकडे पावसाळ्यात नद्या येतात एरवी तिथे कोरडे ठाक असते. अशा नद्या आल्यामुळे आणि त्यावर पूल नसल्यामुळे मूल शाळेत जाऊ शकत नाही; पण पालक गप्प, शिक्षक गप्प, शिक्षणाधिकारी गप्प. आश्रमशाळेत शिक्षकांनी शाळेतच राहावे असे गृहीत आहे तर ते रोज आपल्या शहरी गावातून येतात त्यांच्या सोयीने आणि जातात त्यांच्याच सोयीने. शाळा सुरू होते 9.30 वाजता, हे येतात 11 ते 11.30 वाजता, शाळा संपते 5.30 वाजता; पण हे 5.30 वाजता त्यांच्या त्यांच्या घरी कुटुंबांसोबत असतात. मग सकाळी 9.30 ते 11.30 आणि संध्याकाळी 4 ते 5.30 शाळेतील विद्यार्थी नेमके काय करतात? हा जाब कोणीच विचारत नाही.

प्रत्येक शाळेत कायद्याने ‘शाळा व्यवस्थापन समिती’ असते; पण तिला आवाजच नाही. बाबासाहेबांनी आपली हयात शिक्षणासाठी दिली. त्यांची जयंती जोरात होईल; पण त्यांनी शिक्षणासाठी दाखवलेली तळमळ मात्र तितक्या गांभीर्याने उतरत नाही. त्यांच्या जयंतीला जेवढा आवाज वाद्यांचा, लोकप्रतिनिधी आणि पुढार्‍यांच्या भाषणाचा असतो त्याचा एक टक्का आवाज गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काढला तर आज जे अख्ख्या पिढीचे नुकसान होत आहे ते थांबेल. घरातलं एक तोंड खाण्याचं कमी होईल म्हणून पालक मुलांना शाळेत घालतात आणि शाळेचे लोक त्यांना कसेबसे जेवण देऊन पोट भरण्याचे काम पूर्ण करतात; पण ज्या शिक्षणासाठी हा सर्व आटापिटा आहे ते शिक्षण मात्र कुठे दिसत नाही. आज प्रत्येक पावलावर संगणक लागतोय अशा स्पर्धेच्या काळात ही आमची ठरवून मुकी, अशिक्षित ठेवलेली मुलं कशी टिकणार हा प्रश्न ज्या दिवशी पगार घेणार्‍या शिक्षकांना पडेल तो दिवस खर्‍या अर्थाने भारताला सक्षम करणारा असेल, सुशिक्षित करणारा असेल.

कुपोषणामुळे कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी जेवढे पैसे आणि लोकशक्ती गुंतवली जाते त्याच्या अर्ध्या इतकी जरी गुंतवणूक संबंधितांनी प्रामाणिकपणे काम करून मुरवली तरी रोज पेपरमधून मरणार्‍या मुलांची आकडेवारी आटोक्यात येईल. सामाजिक संस्थांच्या मदतीने, सीएसआरच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा, अंगणवाड्या इथे साधने तर मिळाली; पण त्यांचा होत असलेला वापर पाहून मन विषण्ण होते. मोखाडा-जव्हारसारख्या मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या सुविधा घेणार्‍यांची प्रचंड संख्या असणार्‍या ठिकाणी कायम औषधांची कमी, पेशंटच्या वेळेत डॉक्टर तिथे उपलब्ध होईलच असे नाही. तिथे हवी तेव्हा लाईट असेलच असे नाही.

लोकांची कमी तर कायम पाचवीलाच पुजलेली आहे या भागाच्या. लोकशाहीत कोणीच आवाज उठवला नाही तरी लोक प्रतिनिधी, प्रशासन स्वतःचे कर्तव्य पूर्ण करतील अशा आशा शिकलेल्या वर्गाकडून खरं तर असते; पण घेतलेले शिक्षण काम न करण्यासाठीची कारणे शोधण्यात, कसं काम करणं अवघड आहे हे पटवून देण्यात वाया घालवले जाते हे दु:खद आहे. मोखाडा-जव्हारसारख्या भागांमध्ये जिथे थोडी शहर वस्ती आहे, बाजाराची गावे आहेत तिथे फिरल्यावर कळते की, अशा गावांमध्ये लोकसंख्येएवढे पुढारी आणि कंत्राटदार आहे. त्यांच्या घराचे आकार, त्यांच्या घराच्या दारात उभ्या असणार्‍या गाड्या आणि त्यांच्याकडे येणार्‍यांची वर्दळ याचाच ‘आवाज’ गावातल्या एकूण लोकांच्या ‘आवाजा’पेक्षा जास्त आहे. हे सगळं घडतं. कारण आपण सगळे गप्प आहोत.

आपण गप्प आहोत. कारण आपल्याला याची झळ पोहोचत नाही. आपण आदिवासी नाही, आपल्यावर डायरेक्ट कौटुंबिक हिंसाचार नाही, आपली पोरं आश्रमशाळेत नाहीत. याचा अर्थ सगळीकडे अंधार आहे असे मी म्हणत नाही. पूर्वी खायला न मिळाल्यामुळे गावंच्या गावं मरत होती ती आता मरत नाहीत. प्रश्न आहे, जेवढे गुंतवले आहे त्या प्रमाणात त्याचे फळ दिसत नाही. तुम्ही आज तुमच्या घरी नाहीतर ऑफिसमध्ये जी गार हवा खात आहात ती आमच्या गप्प बसण्यामुळे. तुम्ही वाहते पाणी भरमसाठ वापरता ते आमच्याकडून आम्ही जाऊ दिले म्हणून. तुम्ही कधीच अंधारात नसतात. कारण आम्ही आमचा उजेड तुम्हाला देऊन टाकला. कधीतरी आम्ही जागे होऊ आणि तुम्हाला जाब विचारुच तोपर्यंत तुम्हाला विचार करायला संधी आहे. गावांना ओरबाडून उत्सव साजरा करणार्‍या तुम्हा सर्वांना वेळीच जागे होण्याची ही संधी आहे.

जे तुमचे वडील, काका, मामा, मावश्या, आत्या नोकरीसाठी आमच्याकडे येतात त्यांना त्यांचे कर्तव्य करायला सांगा. कारण ज्या दिवशी आम्ही आमचा ‘आवाज’ दाखवू तेव्हा प्रलय येईल, जो तुम्हाला झेपावणार नाही. त्याआधी तुम्ही सावध व्हावं यासाठी या शुभेच्छा. बाबासाहेबांनी तुम्हाला ‘आवाज’ दिला, त्याची जाणीवही दिली तशी ती आम्हालाही दिली आहे. आम्हालाही ‘आवाज’आहे हे तुमच्या लक्षात यावं यासाठी हे नम्र निवेदन, जयंतीच्या शुभेच्छांसह……..

– अनिता पगारे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -