घरदेश-विदेशफ्रान्सचे लिंबू आणि भारतीय संस्कृती!

फ्रान्सचे लिंबू आणि भारतीय संस्कृती!

Subscribe

केंद्रीय मंत्रिमंडळातल्या एका महत्त्वाच्या खात्याचे मंत्री म्हणून राजनाथ सिंहांनी राफेलचा ताबा घेतला खरा, पण तो घेतल्यावर आपल्या घराच्या गल्लीतल्या कुणाही सोम्यागोम्यानं दुचाकी किंवा चारचाकी खरेदी केल्यानंतर करावी तशी पूजा त्यांनी केली. बरं पूजा केली तर केली, वर राफेलच्या चाकांखाली लिंबू ठेऊन ‘आमच्या राफेलला कुणाची नजर लागायला नको’ असंच जणूकाही म्हणत ते राफेलमध्ये जाऊन बसले आणि इथपासूनच हे फ्रान्सचे दोन लिंबू सेलिब्रिटी झाले!

अण्वस्त्रांमध्ये घातक रसायनांऐवजी त्याहून घातक असा लिंबाचा रस भरण्याचं मोठं काम अमेरिका, फ्रान्स आणि अर्थात भारत आदी देशांनी हाती घेतलं आहे. लिंबामध्ये असलेल्या प्रचंड परिणामकारक शक्तीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातल्या सर्व बंदूक श्रेणीतल्या हत्यारांमध्ये गोळ्यांच्या जागी मॅगझिनमध्ये छोटे लिंबू वापरण्याचे आदेश दिले आहेत. गोळ्यांच्या आकाराच्या लिंबांचं उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहणाचा देखील कार्यक्रम केंद्रीय पातळीवर हाती घेण्यात आला आहे. अर्थात, यात काही प्रमाणात भ्रष्टाचार आणि पावसाचा उत्पादनाला फटका या बाबी लक्षात घेता अमेरिकेसोबत गोळ्यांच्या आकाराच्या लिंबांच्या आयातीसंदर्भात करार करण्यासाठी उच्च पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. देशातल्या सर्व ज्योतिष आणि साधू-महाराजांनी तिसरं महायुद्ध हे पाणी किंवा जमिनीसाठी नसून लिंबांसाठी होईल याची केलेली भविष्यवाणी खोटी ठरावी म्हणून देशभरात ठिकठिकाणी ‘लिंबो’टी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे!

कदाचित आणखी काही वर्षांनी जेव्हा जगातले इतर देश चंद्रावर वसाहती करून राहात असतील, तेव्हा भारतात मात्र माध्यमांना अशाप्रकारच्या बातम्या देण्यावाचून पर्याय उरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समधल्या त्या दोन लिंबांनी देशात जो काही गदारोळ उडवला आहे, त्यावरून तरी चित्र असंच दिसतंय. या लिंबांना पाठिंबा देणारे अक्षरश: इरेला पेटले आहेत. इतके, की हनुमानाने लक्ष्मणासाठी उचलून आणलेल्या गोवर्धनावर याच लिंबांची झाडं होती की काय? किंवा समुद्रमंथनातून अमृत आणि विषानंतरचं तिसरं महत्त्वाचं रत्न म्हणून हेच लिंबू आले होते की काय? अशीच शंका वाटावी. कारण फ्रान्सचे हे दोन लिंबू एका दिवसात थेट हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक झाले! त्यांना अर्जुनाच्या हातातल्या शिवधनुष्याहून जास्त पवित्र स्थान प्राप्त झालं आणि त्या लिंबांवर आक्षेप घेणं म्हणजे जगातील एकमेव पवित्र अशा हिंदू धर्माचा, एकमेव समृद्ध अशा भारतीय संस्कृतीचा आणि पर्यायाने या महान अशा भारत राष्ट्राचा अपमानच आहे असं चित्र उभं केलं गेलं आणि ते प्रमोट देखील केलं गेलं.

- Advertisement -

आपले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्सच्या कुठल्याशा नावही उच्चारणं कठीण जावं अशा ठिकाणच्या एअरबेसवर गेले. अनेक घोटाळ्यांचे आरोप झाल्यानंतर भारताच्या हाती पडणार्‍या लढाऊ राफेल जेटचा ताबा घ्यायला. भारत सरकारचे एक प्रतिनिधी म्हणून भारत सरकारने केलेल्या करारानुसार पहिल्या राफेलचा ताबा घेण्यासाठी ते तिथे गेले होते. त्यामुळे या भेटीमध्ये त्यांना सर्व भारत सरकारी शिष्टाचार लागू होते. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या एका महत्त्वाच्या खात्याचे मंत्री म्हणून राजनाथ सिंहांनी राफेलचा ताबा घेतला खरा, पण तो घेतल्यावर आपल्या घराच्या गल्लीतल्या कुणाही सोम्यागोम्यानं दुचाकी किंवा चारचाकी खरेदी केल्यानंतर करावी तशी पूजा त्यांनी केली. बरं पूजा केली तर केली, वर राफेलच्या चाकांखाली लिंबू ठेऊन ‘आमच्या राफेलला कुणाची नजर लागायला नको’ असंच जणूकाही म्हणत ते राफेलमध्ये जाऊन बसले आणि इथपासूनच हे फ्रान्सचे दोन लिंबू सेलिब्रिटी झाले!

वास्तविक १९७६साली झालेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे आपल्या संसदेनं म्हणजेच आपण भारतीयांनी भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये ‘समाजवादी, धर्मनिरपेक्ष’ या दोन शब्दांचा समावेश केला. यातल्या ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाचा थोडक्यात अर्थ म्हणजे सरकार कोणत्याही एका धर्माला दुसर्‍यावर लादणार नाही आणि सरकारला स्वत:चा असा कोणताही धर्म असणार नाही. राज्यघटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या तत्वाला धरूनच हे तत्व आहे. त्यामुळे राजनाथसिंहांनी फ्रान्समध्ये एक तर कोणत्यातरी एका धर्मातील पद्धतीनुसार पूजा करून आचरण करणं हेच मुळात त्यांच्या कर्तव्यांच्या आणि देशाच्या राज्यघटनेच्या विरोधी कृत्य होतं. कारण घटनेनं जरी त्यांना त्यांच्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलं असलं, तरी ते त्यांनी सामान्य व्यक्ती म्हणून उपभोगणं अपेक्षित आहे. जेव्हा ते भारत सरकारच्या प्रतिनिधीच्या भूमिकेत असतात, तेव्हा त्यांना कोणत्याही धर्माचं आचरण करण्याची परवानगीच राज्यघटना देत नाही. त्यामुळे त्यांनी भारतीय संस्कृतीचं आचरण केलं, धार्मिक रितीरिवाज आहे, आपण सगळेच पूजा करतो, मग त्यांनी केली तर काय बिघडलं? या अशा चर्चांना कोणताही अर्थ उरत नाही.

- Advertisement -

आता मुद्दा येतो तो श्रद्धेचा. राजनाथसिंहांनी राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवणं ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? यावरही बरीच चर्चा झाली. मुळात, लिंबामुळे अनिष्ट दूर होतं, वाईट नजर लागत नाही, यश मिळतं वगैरे वगैरे बर्‍याच प्रकारच्या समजुची देशात बर्‍याच ठिकाणी अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी लिंबू अशुभ मानला जातो तर काही ठिकाणी शुभ! पण मुळात लिंबांमुळे जर कुणाचं बरं-वाईट झालं असतं, तर कुणालाही मारणं किंवा कुणापासूनही वाचणं हे सहज शक्य झालं असतं हे दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो किंवा इतर अंधश्रद्धाविरोधी संस्था असोत, विज्ञानाच्या आधारावर अगदी सहज समजावून सांगू शकतात. लिंबू इतके शक्तिशाली असतील, तर सैन्याला बंदुकांमध्ये गोळ्या सोडून लिंबूच द्यायला हवेत, अशा आशयाचे विनोद देखील सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले, पण देशातल्या इतक्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने कोणत्या गोष्टी आचरणात आणाव्यात? आपल्या कृतीतून कशा गोष्टी प्रमोट होतील, याचं कोणतंही भान राजनाथ सिंहांनी ठेवलं नाही. वर ‘मला जे योग्य वाटलं, ते मी केलं’ असं समर्थन देखील त्यांनी केलं, पण मुळात त्यांना जे वाटलं, तेच चुकीचं होतं हा आक्षेपच त्यांना बहुधा समजला नसावा. जिथे आपल्या नेत्याला ‘फोलो’ करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमधल्या त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते, तिथे या नेतेमंडळींची अंधश्रद्धा अगदी सहज सामान्यांमध्ये पसरू शकते.

राजनाथ सिंहांच्या कृतीवर चहुबाजूंनी टिकेची झोड उठायला सुरुवात होताच देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांच्या मदतीला धावले (जे अपेक्षितच होतं!). ‘विजयादशमीसाठी त्यांनी शस्त्रपूजन केलं. ही परंपरा सुरू ठेवायला हवी. राजनाथ सिंहांनी शस्त्रपूजन केलं. काँग्रेसवाल्यांनी त्याचाही विरोध केला’, असं समर्थन अमित शहांनी केलं, पण देशाचे संरक्षण मंत्री म्हणून भारत सरकारच्यावतीने राजनाथ सिंह तिथे गेले असताना देखील त्यांनी तिथे धार्मिक विधी का केले? याचं उत्तर मात्र अमित शहांनी दिलं नाही, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये याचं उत्तर देऊन ठेवलं होतं. दिल्लीतील एका कार्यक्रमात मोदी म्हणाले होते, ‘रिवाजांमध्ये अडकलेला समाज कधीच प्रगती करू शकत नाही. आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. इथे अंधश्रद्धेचं कोणतंच स्थान असू शकत नाही. एका मुख्यमंत्र्याने एक कार खरेदी केली. त्यांना कुणीतरी काहीतरी सांगितलं, म्हणून त्यांनी कारवर लिंबू-मिरची आणि न जाणो काय काय ठेवलं. हे लोक देशाला काय प्रेरणा देणार?’ असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणाले होते. त्यामुळे विरोधकांचे लिंबू ती अंधश्रद्धा आणि स्वत: ठेवलेले लिंबू ती मात्र संस्कृती, असा अजब न्याय समस्त भाजप प्रेमी, भाजप भक्त, भाजप नेते-कार्यकर्ते आणि खुद्द भाजप अध्यक्ष अमित शहाच लावत आहेत हे आता स्पष्ट झालं आहे.

भाजपचे हे कथित संस्कृतीरक्षक फक्त या घटनेचं समर्थनच करत नाहीत, तर नेहमीच्या सवयीप्रमाणे, ‘आम्हाला काय बोलता? काँग्रेसवाल्यांनी तरी आधी काय केलं?’ अशा टिपिकल पद्धतीने टीका करायला सुरुवात केली. मग काँग्रेसचे जुने संदर्भ काढून जवाहरलाल नेहरूंनी काय केलं होतं? गांधी घराण्याने काय केलं होतं? असे संदर्भ निघू लागले. त्यांनी केलेल्या चुका संदर्भात घेणं चुकीचं अजिबात नाही, पण सध्या होत असलेल्या चुकीच्या गोष्टींसाठी भूतकाळात घडलेल्या चुका समर्थनीय ठरू शकत नाहीत, हे या कथित संस्कृती रक्षकांना आणि सर्वकालीक काँग्रेस टीकाकारांना अद्याप उमगलेलं नाही. ते लवकर उमगावं आणि भारतीय लोकशाहीवरचं हे अनिष्ट दूर व्हावं, यासाठी कोणते लिंबू ओवाळून टाकावे लागतील, हे जर समजलं, तर आख्खा भारत त्यासाठी हातात लिंबू घेऊन उभा राहील, पण जे लवकर उमगलं नाही, तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बंदुकांमध्ये गोळ्यांऐवजी लिंबू भरण्याची वेळ सैन्यावर येण्याची दाट शक्यता आहे!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -