युथ आयकॉन

विराट कोहलीच्या मेहनतीमुळे सुरुवातीला आक्रमक, अ‍ॅरोगन्ट म्हणून ओळखला जाणारा विराट आता युथ आयकॉन म्हणून ओळखला जातो.

विराट कोहली
विराट नाव, विराट कामगिरी, विराट विनय असे सगळेच विराट असलेला विराट कोहली कमालीचा विनम्र आहे.  या विराटपणाचे ओझे त्याच्या खांद्यावर असतेच. मात्र हे ओझे त्याने कधीच मैदानात आणि बाहेर जाणवू दिले नाही. आपले सगळे लक्ष तो केवळ आपल्या खेळाकडेच देतो. आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यासाठी तो सजग असतोच. आपला फिटनेसबाबत कायमच दक्ष असलेल्या विराटने आपल्या खेळासाठी आपल्या आवडी निवडीलाही मुरड घातली आहे.
विराटचा जन्म दिल्लीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील वकील तर आई गृहिणी होती. विराटने लहानपणापासूनच क्रिकेटचे धडे घेण्यास सुरुवात केली. दिल्लीच्या क्रिकेटमध्ये त्याने पटापट आपली पावले पुढे टाकली. शालेय क्रिकेट असो, १५ वर्षांखालील क्रिकेट असो की १७ वर्षांखालील क्रिकेट त्याने सगळीकडे अप्रतिम प्रदर्शन केले.
विराटने २००६ मध्ये दिल्लीसाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याचवर्षी खर्‍या अर्थाने त्याच्या आयुष्याला आणि क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारा क्षण घडला. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि विराट त्यादिवशीही मैदानात उतरला. त्याने कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात ९० धावांची खेळी केली. त्यादिवसानंतर विराट खूप बदलला. पण विराटची भारतीय चाहत्यांना खरी ओळख झाली ती २००८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात.
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकला. त्याच्या आक्रमक खेळाच्या आणि कर्णधारपदाच्या शैलीमुळे सार्‍यांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या. अगदी निवड समितीच्याही. मग त्याला भारतीय संघात येण्यासाठी फारकाळ वाट पाहावी लागली नाही.
विराटची २००८ मध्ये श्रीलंका दौर्‍यासाठी एकदिवसीय संघात निवड झाली. सलामीवीर म्हणून खेळणार्‍या विराटने या मालिकेत अगदीच साधारण प्रदर्शन केले. पण त्याने त्याच्या १४ व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे १०७ धावांची ’मॅचविनिंग’ खेळी केली आणि तेव्हपासून त्याने मागे वळून पाहिले नाही.
कोणत्याही खेळाडूप्रमाणे विराटच्या कारकिर्दीतही उतार आले. २०१४ साली इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत विराटने अगदीच निराशाजनक प्रदर्शन केले. त्याला ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक अर्धशतकही करता आले नाही. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केली. तर याच काळात त्याच्यात आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात काहीतरी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. विराटच्या खराब प्रदर्शनाला अनुष्काचं जबाबदार आहे, असे म्हणायलाही काहींनी कमी केले नाही.
या सर्व टीकांमुळे विराट अजूनच जिद्दी बनला. त्याने आपल्या खाण्याच्या, पिण्याच्या, व्यायामाच्या सवयी बदलल्या. त्याने ’स्ट्रिक्ट डाएट’ पाळण्यास सुरुवात केली. त्याच्या आवडत्या छोले भटुरे, सामोसे यासारख्या पदार्थांची जागा पालक, ग्रील्ड चिकन यासारख्या पदार्थांनी घेतली. तसेच त्याने रोज जिममध्ये दीड-दोन तास मेहनत घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला हे सगळे कठीण जात होते. पण त्याने हार मानली नाही. हळूहळू त्याला या त्यागांचे निकाल दिसू लागले. त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्यामुळे संघातील इतर खेळाडूंनीही त्याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली.
पूर्वी ’अ‍ॅरोगन्ट’ म्हणून ओळखला जाणारा विराट आज ’युथ आयकॉन’ म्हणून ओळखला जातो. तो आता जगासाठी भारतातील युवा पिढीचा एक चेहरा बनला आहे. त्याने आपल्यात केलेले बदल खूपच उल्लेखनीय आहेत. विराटने जर आपली मेहनत, जिद्द आणि धावांची भूक यापुढेही कायम ठेवली तरी त्याला अनेक विश्वविक्रम मोडण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.