घरलोकसभा २०१९लोकसभा निवडणूक पूर्व तयारीचा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

लोकसभा निवडणूक पूर्व तयारीचा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

Subscribe

61 हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी तैनात

आगामी लोकसभा निवडणूक पूर्व तयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी घेतला. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी सोयी उपलब्ध व्हावीत याची खातरजमा करून घ्या, त्याचप्रमाणे एकूणच निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पुरेसे आणि योग्य प्रशिक्षण मिळावेत असे निर्देश नार्वेकर यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी 61 हजार 994 कर्मचारी यांची सेवा घेण्यात आली असून, 200 व्हिडिओग्राफर्स, 72 भरारी पथके, 867 झोनल अधिकारी व तितकेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारे अधिकारी असणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याने नियोजन भवन येथे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज एकूणच निवडणूक व्यवस्थेचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या अपेक्षांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात व्यवस्थित व बिनचूक काम झाले पाहिजे, असे सांगितले. प्रारंभी उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर यांनी निवडणूकविषयक तयारीचे तसेच निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील यांनी कर्मचारी नियोजनाचे सादरीकरण केले. राष्ट्रीय सुचना केंद्राच्या अर्पिता वैद्य यांनी देखील आज्ञावलीसंदर्भात माहिती दिली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, उपायुक्त शिवाजी कादबाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशन जावळे यांची देखील उपस्थिती होती.

- Advertisement -

मतदान केंद्रांवर सर्व सुविधा आवश्यक
यावेळी राजेश नार्वेकर यांनी मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसे फर्निचर, मदत कक्ष, वीज पुरवठा, प्रसाधनगृहे, नाम फलक, केंद्राकडे जाण्यासाठी रस्ते या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यासाठी 15170 बेसिक युनिट्स, 8961 सेन्ट्रल युनिट, आणि 7761 व्हीव्हीपॅट अशी यंत्रे असून संबंधित कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

आयटी अ‍ॅप्लिकेशन्सवर भर द्या
भारत निवडणूक आयोगाने यावेळेस सी व्हिजिल, सुगम, सुविधा, समाधान या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग करावा यावर भर दिला आहे. जिल्ह्यातील यंत्रणेने देखील याविषयी व्यवस्थित तांत्रिक दृष्ठ्या माहिती घेऊन त्यांचा उपयोग करावा. 1950 ही हेल्पलाईन देखील असून त्याद्वारे मतदार व नागरिकांना व्यवस्थित माहिती मिळावी. योग्य रीतीने प्रशिक्षणाचे नियोजन व्हावे, पुरेसे तंत्रज्ञ असावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मतदार ओळखपत्रांचे काम 100 टक्के पूर्ण करावे 2 आणि 3 मार्च च्या विशेष मोहिमेत जास्तीत जास्त तरुण तरुणींना मतदार म्हणून नोंदणीसाठी प्रवृत्त करावे असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्ह्यात 6488 मतदान केंद्रे
ठाणे जिल्ह्यात 6488 मतदान केंद्रे असून 1 जानेवारी 2019 च्या अंतिम मतदार यादी प्रमाणे 60 लाख 93 हजार 87 मतदार असतील. यात 33 लाख 21 हजार 790 पुरुष आणि 27 लाख 70 हजार 957 महिला आणि 340 तृतीयपंथी आहेत. 2014 या वर्षी झालेल्या निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात 5681 मतदान केंद्रे होती, त्यात वाढ होऊन ती आता 6488 इतकी झाली आहेत.

मतदानाची टक्केवारी

ठाणे जिल्ह्यात 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 38.52 टक्के , 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 51.56 टक्के, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत 47.93 टक्के तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 50 .65 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढली पाहिजे यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यादृष्टीने आपणाकडून मतदार जागृतीसाठी पुरेपूर प्रयत्न झाले पाहिजेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -