घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मेडिकल कॉलेजसाठी १२०कोटींची आर्थिक तरतूद

आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मेडिकल कॉलेजसाठी १२०कोटींची आर्थिक तरतूद

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने कुलगुरू माधुरी कानिटकर यांच्या व्हीजन डॉक्युमेंट नुसार २०२३-२४ वर्षासाठीचा विद्यापीठाचा ५४३ कोटींचा अर्थसंकल्प तयार केला आहे. त्यात पदवी वैद्यकीय महाविद्यालयासाठी १२० कोटींची तरतूद आहे. त्यात ६० टक्के खर्च शासन व ४० टक्के खर्च विद्यापीठ करणार आहे. परीक्षा विभागासाठी १०४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याव्दारे परीक्षा विभागाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्यामुळे डिजिटल मूल्यांकन करणे सोयीचे होणार आहे. संशोधन विभागासाठी ३ कोटी १५ लाख, विद्यार्थी सहायता निधीसाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे देण्यात आली.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुरू झाले त्यावेळी १४५ महाविद्यालये संलग्न होती. आता ही संख्या थेट ५१२ वर पोहोचली आहे. व्हीजन डॉक्युमेंट नुसार आपल्कालीन, मध्यवर्ती व दीर्घकालीन उद्दीष्ठ्ये ठेवली असून, त्यानुसार विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. विद्यालये व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सहा विभागीय कार्यालये पुणे, मुंबई, संभाजीनगर, सोलापूर, लातूर व नागपूर येथे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे नाशिकला आरोग्य विद्यापीठात न येता विभागीय कार्यालयातच विद्यार्थ्यांचे काम होते. महत्वाकांक्षी उद्दीष्ठ्ये सर्वसमावेश संगणक प्रणाली सी-डॅकमार्फत केली जात आहेत. नवीन कॉलेज सुरू करताना पेपरलेस कामावर भर दिला जात आहे. तर, मानसिक आरोग्यासाठी मानस अ‍ॅप तयार करण्यात आले.

- Advertisement -

मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी मदत होत आहे. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात आयूष, फार्मास्युटिकल मेडिसन, युनिवर्सिटी रिसर्च डिपार्टमेंट सुरू करण्यात आले असून, त्यासाठी डीन नियुक्त करण्यात आले आहेत. विद्यापीठातर्फे कॉलेज, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ कॅम्पसमध्ये हेल्थ सेंटर, मेडिटेशन सेंटर, योग सेंटर, संवेदना गार्डन आहेत. आता पंचकर्म युनिट सुरू होते आहे. मेडिकल व डेंटल विभागाची तपासणी सॉफ्टवेअरमार्फत करण्यात आली आहे. मेडिकलचे ५२ आणि डेंटलचे २२ कॉलेजची तपासणी करण्यात आली. पुढील आठवड्यात आयुर्वेदाची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, आरोग्य विद्यापीठातर्फे १२२ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ऑक्टोबर २०२२ मध्ये लेखी परीक्षा व नोव्हेबर २०२२ मध्ये निकाल जाहीर करण्यात आला.
डिसेंबरमध्ये उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी करून नियुक्त करण्यात आली. १२२ पैकी ११२ पदांची निवड करण्यात आली आहे. ४१ जण रूजू झाले असून, उर्वरित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

आज टपाल तिकीट अनावरण, सुवर्णपदक वितरण सोहळा

विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (दि.९) सायंकाळी ५ वाजता टपाल तिकीट अनावरण व सुवर्णपदक वितरण सोहळा केंद्रिय राजमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री दादा भुसे, डॉ. किरण बेदी, पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र किसन जायभाये, कुलगुरु माधुरी कानिटकर, प्रतिकुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

विद्यापीठातर्फे नॅक मूल्यांकन सुरू

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रौप्य महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी इंटर्नशीपसाठी अर्ज केला आहे. विद्यापीठात सर्वसमावेशक काम व नॅक मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाचा दर्जा वाढीस मदत होईल. त्याच्या रॅकिंग वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. २० टक्के महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले आहे. सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन सुरू करण्यास सांगितले असून, त्यासाठी समितीमार्फत परीक्षण केले जात आहे. बी प्लसहून अधिक मूल्यांकन असणार्‍या महाविद्यालयांना तीन वर्षासाठी संलग्नीकरण सुविधा दिली जात आहे. महाविद्यालयांसाठी नॅकबाबत विद्यापीठात कार्यशाळा सुरू करण्यात आली असल्याची माहिती कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी दिली.

बक्षीस वितरण सोहळा 

विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता टपाल विविध पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रतिकुलपती गिरीश महाजन, अरुणा वनीकर, डॉ. अश्विनी जोशी, कुलगुरु माधुरी कानिटकर, प्रति कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -