Eco friendly bappa Competition
घर ठाणे thane ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

ठाणे | ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात तीन दिवसांपूर्वीच उपचार न मिळाल्याने एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते आणि ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा याच रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यातील रुग्णालयातील 13 रुग्ण हे आयसीयूमधील आणि 4 रुग्ण हे जनरल वॉर्डमध्ये होती. तर काही रुग्णांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर सिव्हिल रुग्णालय पुनर्बांधणीसाठी बंद झाल्याने सर्व ताण हा ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर येतो. पण रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

- Advertisement -

यापूर्वीच रुग्णालयात (ता. 10 ऑगस्ट) एका दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला होता. तर एका रुग्णाला पोलिसांनीच रुग्णालयात दाखल केले होते. हा रुग्ण रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडला होता. रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारामुळे ज्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये एका गरोदर महिलेचा देखील समावेश आहे. रुग्णालयाच्या या गलथान कारभाराची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड रुग्णालयात धाव घेत रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते.

हेही वाचा – Thane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू

रुग्णालयावर प्रचंड ताण

- Advertisement -

या रुग्णालयातील डॉक्टरांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून या रुग्णांच्या मृत्यूचे कारण देखील पाहणे गरजेचे आहे. सिव्हिल रुग्णालय पुनर्बांधणीसाठी बंद असल्यामुळे सर्व ताण हा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर येत आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे. म्हस्के पुढे म्हणाले, “यामुळे मेंटल हॉस्पिटलच्या परिसरात उपलब्ध असलेल्या जागेत सिव्हिल रुग्णालय सुरू करण्यात आलेले आहे आणि त्या रुग्णालयात रुग्णांना भर्ती देखील केले जाते. पण रुग्णालयाबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. त्यामुळे रुग्ण हे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलायत येतात. या रुग्णालयात महाड, पोलांदपूर, चिपळूणपासून रुग्ण येथे येतात. यामुळे रुग्णालयावर प्रचंड ताण येतो.”

- Advertisment -