घरमहाराष्ट्रपहिली ते बारावी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

पहिली ते बारावी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

Subscribe

१०१ विषयांचा अभ्यास कमी करण्याचा निर्णय, दहावीसाठी गणित आणि विज्ञानातील पाठ कायम , गद्य-पद्य पाठ आधारीत स्वाध्याय कृती वगळले

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण आहेत. हे लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सध्या ऑनलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने पहिली ते बारावी या अभ्यासक्रमात सुमारे २५ टक्केे कपात केली आहे. ही कपात करताना १०१ विषयांचा अभ्यास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दहावीबाबत पुढील शिक्षणासाठी उपयुक्त गणित आणि विज्ञानातील पाठ कायम ठेवून इतर अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. सध्याचे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन, टीव्ही आणि इतर माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू न झाल्याने मुलांच्या मनावरील दडपण कमी करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पाठ्यक्रमातून २५ टक्केे भाग वगळताना भाषा विषयांमध्ये काही गद्य आणि पद्य पाठ व त्यावर आधारीत स्वाध्याय कृती वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन व वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. भाषा विषयातील व्याकरण यातून वगळण्यात आलेले नाही. इतर विषयांमधील काही भाग विद्यार्थ्यांना स्वअध्यायनासाठी देण्यात आला आहे.

- Advertisement -

इयत्ता १ ली ते १२ वीचा इयत्ता निहाय, विषय निहाय कमी करण्यात आलेला २५ टक्के अभ्यासक्रम www.maa.ac.in वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परीक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीबीएसईप्रमाणे ३० टक्के अभ्यासक्रम कपात करा
विविध शिक्षक संघटना आणि शिक्षक, शाळांच्या मागणीनंतर इतक्या दिवसांनी राज्य शिक्षण विभागाकडून केवळ २५ टक्के अभ्यासक्रम कपात करण्यात आली आहे. सीबीएसई मंडळाने आपल्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. अजून कोरोना संसर्ग कमी झाला नसल्याने शाळा कधी सुरू होणार याबाबतीत अनिश्चितता आहेच. त्यामुळे सीबीएसई मंडळाशी तुलना करता शिक्षण विभागाचा २५ टक्के कपातीचा निर्णय असमाधानकारक असून, अधिक अभ्यासक्रम कपात करण्यात यावा असे, मत शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी व्यक्त केले. तसेच शिक्षण विभागाने अभ्यासक्रम कपातीची घोषणा केली. मात्र, वर्षभरातील परीक्षांचे नियोजन कसे करावे याबाबतीत काहीच मार्गदर्शन केलेले नाही. यामुळे विनाकारण विद्यार्थी-पालक अजूनही संभ्रमात आहेत. या निर्णयाला उशीर लावला त्याप्रमाणे परीक्षांच्या निर्णयाला अजून किती वेळ लावणार, असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -