घरमहाराष्ट्र२९७ धरणे डेंजर झोनमध्ये

२९७ धरणे डेंजर झोनमध्ये

Subscribe

तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारचा जलसंपदा विभाग खडबडून जागा झाला आहे. नुकत्याच जलसंपदा विभागाकडे आलेल्या धरण सुरक्षा संस्थेच्या अहवालानुसार, राज्यातील २९७ धरणे डेंजर झोनमध्ये आहेत. त्यामुळे या धरणांच्या दुरूस्तीसाठीची कामे तातडीने करण्याचे अहवालात सूचवण्यात आले आहेत. राज्यातील १३५८ धरणांपैकी २९७ धरणांमध्ये उणिवा असल्याचा अहवाल राज्य सरकारच्या धरण सुरक्षा संस्थे (डीएसओ) मार्फत देण्यात आला आहे.

महिन्याभरातच या विभागांची पडताळणी करून अहवाल सादर करावा असे आदेश आता जलसंपदा विभागाकडून देण्यात आले आहेत. या २९७ धरणांसाठी तत्काळ दुरुस्तीची गरज असून या धरणांकडे तातडीने लक्ष देण्याच्या सूचना डीएसओकडून देण्यात आल्या आहेत. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक राज्यातील ३१३ धरणांमध्ये उणीवा आढळल्याचा ठपका याआधी ठेवला आहे.

- Advertisement -

धरण सुरक्षा संस्था ही राज्यातील धरणांची नियमित तपासणी करते. या तपासणीच्या आधारावर धरणांची वर्गवारी ही तीन टप्प्यात करण्यात येते. तात्काळ धरण दुरुस्तीची गरज असलेल्या धरणांचा समावेश हा श्रेणी १ मध्ये होतो. श्रेणी २ मध्ये ज्या धरणांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे, तसेच ही दुरुस्ती लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे अशा धरणांचा समावेश असतो. तर श्रेणी ३ अंतर्गत किमान दुरुस्तीची किंवा कोणतीही उणीव नसलेल्या धरणांचा समावेश होतो. डीएसओच्या अहवालानुसार सर्वाधिक तातडीने दुरुस्तीची गरज असलेली धरणे ही कोकण विभागातील आहेत. एकट्या कोकण विभागात एकूण १९९ धरणे आहेत.

त्यापैकी तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीची गरज असणारी ८६ धरणे आहेत. डीएसओच्या निकषांनुसार ही श्रेणी २ मधील धरणे आहेत. या श्रेणीअंतर्गत धरणातील उणीवांकडे तातडीने लक्ष देऊन त्या दुरूस्त करण्यासाठीची गरज अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. कोकणा पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये दुरुस्तीची गरज व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धरणांची संख्या ६५ आहे. पुण्यातील धरणांची संख्या ही ५५ आहे. अमरावती येथील दुरुस्तीची गरज असलेल्या धरणांची संख्या ४४ आहे. मराठवाड्यातील धरणांची संख्या २४ आहे. तर नागपूरातील दुरुस्तीची गरज असलेल्या धरणांची संख्या ही २२ आहे.

- Advertisement -

‘कॅग’च्या अहवालाकडे दुर्लक्षच
याआधीही २०१४ मध्ये ‘कॅग’च्या अहवालात राज्य सरकारने डीएसओचा अहवाल गांभीर्याने न घेतल्याने ताशेरे ओढण्यात आले होते. तिवरे धरणाच्या बाबतीतही दुर्घटना टाळता आली असती, पण या धरणाकडे दुर्लक्ष झाल्याचे संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. या धरणाच्या बाबतीतही याआधीच्या अहवालात अलर्ट देण्यात आला होता. पण याकडे कोणीही लक्ष न दिल्याने ही घटना घडल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -