घरमहाराष्ट्रफडणवीसांनी सावरली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बाजू

फडणवीसांनी सावरली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बाजू

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगली जिल्ह्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. अलमट्टी धरणात कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातले होते. पाण्याची पातळी वाढू लागताच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग का नाही झाला? याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते. मुख्यमंत्र्यांनी काल सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतही याच प्रश्नांचा भडीमार पाहायला मिळाला. पहिल्या दिवसापासून कर्नाटक सरकारशी आमची चर्चा सुरु होती. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी आम्ही विनंती केली होती, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मात्र हे करत असताना त्यांनी कर्नाटकातील भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री येडियुरप्पांची देखील बाजू सावरून घेतली.

फडणवीस म्हणाले की, अलमट्टीतून चार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होतो, तेव्हा कर्नाटकची काही गावे पुराखाली जातात. त्यामुळे येडियुरप्पा यांच्याशी बातचीत केल्यानंतर अलमट्टीतून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल दुपारपर्यंत धरणातून ५ लाख ३० हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून पुढच्या ४८ तासांत सांगलीतील पूर ओसरण्यास सुरुवात होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

कर्नाटकमध्ये महिन्याभरापूर्वीच सत्तांतर झाले. भाजपने कुमारस्वामीच्या ताब्यातून सत्तेची खुर्ची हिसकावून घेतले. जर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार असते तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशीच मवाळ भूमिका घेतली असती का? असाही प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला पत्रकारपरिषदेतून पत्युत्तर दिले. विरोधकांचे काम करतरता दाखविण्याचे आहे, ते त्यांनी जरूर करावे. पण पुरपरिस्थितीचे राजकारण करु नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

२०१९ चा पाऊस लक्षात घेऊन भविष्याचे नियोजन

आतापर्यंत २००५ च्या पुराला ग्राह्य धरून मदतकार्याचे नियोजन केले जात होते. मात्र यापुढे यावर्षीच्या पावसाचे प्रमाण आणि दाहकता लक्षात घेऊन आगामी काळात नियोजन करावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. चार महिन्यात पडणारा पाऊस जर दोन दिवसांत पडत असेल तर आपण काहीच करु शकत नाही. सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन दिवसांत अचानक जास्त पाऊस पडल्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली. कधी, किती पाऊस पडेल हे आधीच ओळखण्याचे तंत्रज्ञान अजूनतरी अस्तित्वात नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -