घरCORONA UPDATEमुंबई विद्यापीठाशी संलग्न ५० टक्के कॉलेजचे अस्तित्त्व धोक्यात

मुंबई विद्यापीठाशी संलग्न ५० टक्के कॉलेजचे अस्तित्त्व धोक्यात

Subscribe

कॉलेज प्रशासनाचा हा मनमानी कारभार आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजांमधील अभ्यासक्रम, शुल्क, प्रवेश क्षमता, पायाभूत सुविधा यासह अनेक शैक्षणिक उपक्रमाची माहिती सर्वांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावी, यासंदर्भात मुंबई विद्यापीठाने वारंवार काढलेली परिपत्रके, कुलगुरूंनी केलेल्या आवाहनानंतरही ५० टक्के कॉलेजांनी संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कॉलेज प्रशासनाचा हा मनमानी कारभार आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. कॉलेजची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपल्बध करून न देणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्याचा इशारा मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाचे निर्णय धाब्यावर बसवणाऱ्या कॉलेजांची संलग्नता आगामी शैक्षणिक वर्षी धोक्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित कॉलेज आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये कोणते अभ्यासक्रम शिकवले जातात, एखाद्या अभ्यासक्रमाचे शुल्क किती आहे, प्रवेश क्षमता किती आहे, त्या महाविद्यालयात कोणत्या पायाभूत सुविधा आहेत, या अशा अनेक शैक्षणिक उपक्रमांची माहिती आता सर्वांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुढाकाराने मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या कॉलेजांच्या शैक्षणिक परिक्षणासाठी विद्यापीठाने माहितीचे ॲानलाईन संकलन केले आहे. सुमारे ४०० हून अधिक कॉलेज आणि संस्थांनी माहिती भरली असून ही माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानुसार मुंबई विद्यापीठाने सर्व सलंग्नित कॉलेजांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी संकेतस्थळावर एकेडेमिक ऑडिट पोर्टलच्या रुपाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यामध्ये सर्व कॉलेजांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देऊन त्यांच्यासंबंधी सर्व माहिती १५ जानेवारी २०२०पर्यंत भरण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यानुसार जवळपास ४०० हून अधिक कॉलेजांनी माहिती भरली आहे. ज्या महाविद्यालयांनी अजूनही माहिती भरलेली नाही अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरविले आहे. अशी माहिती विद्यापीठाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उच्च शिक्षणाचे अध्ययन-अध्यापन, कार्यक्षम व संवेदनशील प्रशासन, शास्त्रशुद्ध व तंत्रज्ञानात्मक करण्याची तरतूद आहे. तसेच व्यवस्थापनाची व्यवहार्यता आणि वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे महाविद्यालयांच्या, विद्याशाखांच्या आणि विषयाच्या शैक्षणिक कामगिरीची मानके लक्षात घेता महाविद्यालयांच्या संलग्निकरणाच्या आणि परिसंस्थांच्या मान्यतेच्या शर्ती निर्धारीत करणे आणि त्या शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे. याबाबत नियतकालिक किंवा अन्य प्रकारे मुल्यांकन करुन स्वतःची खात्री पटविणे अशीही जबाबदारी विद्यापीठांवर असल्यामुळे मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व ८२३ महाविद्यालये आणि परिसंस्था यांचे शैक्षणिक परिक्षण करण्यासाठी शासनस्तरावर समितीचे आणि कार्यबलाचे गठण करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -