घरदेश-विदेश9 years of Modi govt : 2014च्या आधी भारताला जगात मान नव्हता...

9 years of Modi govt : 2014च्या आधी भारताला जगात मान नव्हता का? ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व त्यांचे सध्याचे सहकारी म्हणजे कमाल आहे. खोटारडेपणाच्या बाबतीत एकाला झाकावे व दुसऱ्याला काढावे असेच एकापेक्षा एक असे सरस लोक आहेत. मोदी सरकारला नऊ वर्षे झाली (9 years of Modi govt ) व त्यानिमित्त मोदींच्या माणसांनी खोटेपणाची बहार उडवून दिली आहे. देशभरात केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा सुरू आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या मुंबईत आल्या व त्यांनी खोटेपणावर कळस चढवला. मोदींमुळे देशाला मान मिळाला, जगभरात भारताची मान उंच झाली वगैरे हास्यतुषार त्यांनी उडवले. मोदी 2014 साली पंतप्रधानपदी आले. त्याआधी जगात देशाला मान नव्हता असे निर्मलांना सांगायचे आहे काय? असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

मोदी व त्यांच्या अंधभक्तांच्या दृष्टीने हिंदुस्थान 2014 नंतरच निर्माण झाला. त्याआधी हा देश अस्तित्वात नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व देशाच्या उभारणीत कोणतेही योगदान नसलेला राजकीय पक्ष गेल्या नऊ वर्षांपासून सत्तेवर आहे व हीच नऊ वर्षे म्हणजे देश असे त्याचे सांगणे आहे, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून करण्यात आली आहे.

- Advertisement -

मोदींविषयी अनेक कल्पित कथा

मोदींमुळे जगात मान वाढला. म्हणजे कसा? अंधभक्तांनी मोदींविषयी अनेक कल्पित कथा पसरवल्या. मोदी हे नुकतेच ऑस्ट्रेलियात जाऊन आले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी असे सांगितले की, मोदी हेच ‘बॉस’ आहेत, पण त्याच ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानातील पाच राज्यांतील विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारला आहे. सात राज्यांवर निर्बंधच घातले. मोदी ‘बॉस’ असल्याचे हे लक्षण कसे मानायचे? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

बायडेन यांनी मोदींना विचारला यशाचा मंत्र!

जपानमध्ये ‘क्वॉड’ परिषद झाली. तेथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन होते. मोदी भक्तांनी असे पसरवले की, मोदी यांच्या जागतिक प्रभावामुळे बायडेन प्रभावित झाले. त्यांनी मोदींना विचारलं, ‘‘तुम्ही इतकी वर्षे राष्ट्रीय राजकारणात कसे काय टिकलात? त्याचा मंत्र काय?’’ मुळात बायडेन यांचे वय 80 आहे व ते 1971पासून अमेरिकेच्या सिनेटवर आहेत. त्यामुळे बायडेन मोदींकडे यशाचा मंत्र विचारतील हे शक्य नाही, पण भक्तांनी तसे पसरवले, अशा शब्दांत ठाकरे गटाने समाचार घेतला आहे.

- Advertisement -

बायडेन हे मोदींचे इतके फॅन बनले की, त्यांनी मोदींचा ऑटोग्राफ घेतला. हे असे घडले याची एक ओळीची बातमी अमेरिकेच्या मीडियात नाही. अशा बातम्या पसरवल्यामुळे पंतप्रधानांचे हसे होते, हे भक्तांनी समजून घेतले पाहिजे, असेही ठाकरे गटाने सुनावले आहे.

रशिया आणि युक्रेन युद्ध मोदींमुळे शांत झाल्याची पुडी

मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन व युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात गोड समझोता केला असून दोन देशांतले युद्ध मोदींमुळे शांत झाल्याची पुडी भक्तांनी मोदी जपानच्या दौऱ्यावर असताना सोडली. प्रत्यक्षात चित्र असे आहे की, पुतीन यांनी युक्रेनवर हल्ले वाढवले आहेत. युक्रेनची पुरती राखरांगोळी करायची, हे पुतीन यांनी ठरवले आहे. युक्रेननेही रशियावर ड्रोन हल्ले चढवून मोठे नुकसान केले आहे. युरोप, अमेरिका, नाटो, युनोचे ऐकायला पुतीन तयार नाहीत, तेथे मोदी यांनी युद्ध शांत केले असे सांगण्याचा मूर्खपणा भक्त मंडळी कसा करू शकतात? अर्थात निर्मला सीतारामन यांच्यासारखे तोंडपुंजे असल्यावर दुसरे काय व्हायचे? असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -