घरमहाराष्ट्रमहाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली

महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली

Subscribe

शहरातील काजळपुरा विभागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. यात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. सन 2011 मध्ये पनवेलच्या कोहिनूर डेव्हलपरने या इमारतीचे बांधकाम केले होते. या इमारतीच्या दोन विंगमध्ये एकूण ४७ सदनिका असून, राहणार्‍यांची संख्या 200 पर्यंत आहे.

दुर्घटना घडताच स्थानिक नागरिकांनी ढिगारे बाजूला करण्याचे काम सुरू केले. घटनास्थळी नगर पालिका आणि एमआयडीसीचे अग्निशमन दल, तसेच एनडीआरएफचे जवान दाखल झाल्यावर बचाव कार्याला वेग आला. आतापर्यत १५ जणांना बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश मिळाले आहे. इमारत नेमक्या कोणत्या कारणामुळे कोसळली हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

शहराच्या पश्चिम भागात असलेली ही इमारत अचानक कोसळल्याने काजळपुरासह कोट आळी, मधली आळी या परिसरांमध्ये मोठा आवाज आल्यानंतर सर्वत्र घबराट पसरली. इमारत कोसळल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यामुळे काही वेळातच 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले. ढिगारा उपसण्यासाठी जेसीबी, पोकलेन इत्यादीची मदत घेण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अजून किती रहिवासी अडकले याची काहीच माहिती मिळाली नसली तरी अडकलेल्यांची संख्या मोठी असावी अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगाताप घटनास्थळी दाखल झाले. तसेच महसूल यंत्रणाही बचावकार्यात गुंतली आहे.

दरम्यान, या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित बिल्डरच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीच्या दुर्घटनेमध्ये किती जणांना आपला जीव गमावावा लागला याची माहिती ढिगारे बाजूला केल्यानंतर कळू शकेल. या दुर्घटनेनंतर आर्थिक हव्यासापोटी चुकीच्या पद्धतीने इमले बांधण्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, संशयास्पद इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी पुढे आली आहे.

- Advertisement -

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या इमारतीला नगर पालिकेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते बिपीन महामुणकर यांनी आक्षेप घेतला होता. मात्र पालिकेने त्याकडे दुर्लक्ष करीत बिल्डरला पाठीशी घातले. त्यामुळे या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -