घरमहाराष्ट्र‘कप्प्यांची’ कापडी पिशवी – उद्योजिकेचा अनोखा आविष्कार

‘कप्प्यांची’ कापडी पिशवी – उद्योजिकेचा अनोखा आविष्कार

Subscribe

देशभरात प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी लागू झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या. प्लॅस्टिक पिशव्यांच्या बंदीवर लोकांच्या संमीश्र प्रतिक्रीया उमटल्या. कुणी या निर्णयाचं समर्थन केले तर कुणी प्लॅस्टिक पिशव्या दैंनदिन वापरासाठी खूप सोयीच्या पडतात, असे म्हणत या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मात्र पुण्यात राहणाऱ्या एका तरुण उद्योजिकेने यावर एक नामी उपाय शोधून काढला. मृणाल पोरे असं त्यांचं नाव असून त्यांनी चक्क कप्पे असलेल्या कापडी पिशव्या बनवायला सुरुवात केली.



- Advertisement -

सहज सुचलेल्या कल्पनेला व्यावसायिक आकार

पुण्यात राहणाऱ्या लघु उद्योजिका मृणाल पोरे यांनी त्यांच्या कारखान्यामध्ये या कप्पे असलेल्या कापडी पिशव्यांची निर्मीती करायला सुरुवात केली. लोकांनी उपयोगी पडेल अशाप्रकारची ही पिशवी बनवण्याची कल्पना, मृणाल यांना त्यांच्या दैनंदिन कामातूनच सुचली. याविशयी बोलताना मृणाल म्हणतात ‘’सहज एक दिवस बाजारात भाजी घेत फिरत असताना माझ्या डोक्यात ही कल्पना आली. भाज्या तसेच फळं घेताना एकावेळी अनेक छोट्या छोट्या पिशव्या हाहात पकडणं आणि तितक्याच गर्दीमध्ये तितक्याच निगुतीने त्या पिशव्या सांभाळणं हे खूप कठीण जातं. माझ्या सारख्या अनेक महिला आणि पुरुष नेहमीच ही तारेवरची कसरत करत असतात. यावर उपाय म्हणून अशा कप्पेवाल्या कापडी पिशव्या बनवण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. त्यातच प्लॅस्टिक बंदीमुळे लोकांना अशाप्रकारच्या पिशव्यांची असलेली गरज लक्षात घेत मी त्या बनवण्याचा निर्णय घेतला.’’

- Advertisement -

उपलब्ध साधन-सामुग्रीची लाभली साथ

पुण्याच्या कल्याणी नगर मधील आदर्श नगर या भागात मृणाल यांचा स्वत:चा एक कारखाना आहे. गेली अनेक वर्ष त्या महिलांसाठी कुर्ती बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या कारखान्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या या कुर्तींची विक्री त्या महाराष्ट्रातील अनेक शहरांत तसेच कोचीन आणि इंदोर या शहरांमध्येही करतात. या व्यवसायामुळे मृणाल यांच्या कारकान्यात कापड आणि मशीनरी या दोन मुख्य गोष्टी उपलब्ध होत्याच. कापडी पिशव्या बनवण्यासाठी लागणारं इतर सर्व साहित्य एकत्र करत मृणाल यांनी ताबडतोब या कार्याचा श्रीगणेशा केला. त्यांनी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या चौदा ते पंधरा कामगारांना, या पिशव्यांबद्दल पूर्ण कल्पना दिली, त्याचे महत्व समजावून सांगितले आणि त्यानंतर लगेचच कप्पे असलेल्या या अनोख्या कापडी पिशव्या बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली.

सोशल मीडियामधून विक्री

मृणाल सांगतात की ”सर्वप्रथम मी व माझ्या सहकाऱ्यांनी या पिशव्या प्रत्यक्षात वापरुन पाहिल्या आणि ज्यावेळी या पिशव्या खरंच खूप फायदेशीर असल्याची आम्हाला खात्री पटली त्यावेळी आम्ही त्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियांचं सध्याचं महत्व लक्षात घेता, आम्ही तोच प्लॅटफॉर्म वापरत या पिशव्यांची जाहिरात आणि विक्री करण्याचे ठरवले. सोशल मीडियावर या कप्पेवाल्या कापडी पिशवीचे फोटो व्हायरल केल्यानंतर काहीवेळातच आम्हाला लोकांकडून त्याविषयी सकारात्मक प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. हळूहळू लोकांकडून या पिशव्यांसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी यायला देखील सुरुवात झाली. आज आम्ही बनवलेल्या या पिशव्यांना बाजारात चांगलीच मागणी आहे. लोकांकडून या पिशव्यांचं स्वागत केले जाते आहे.’’

मृणाल पोरे आणि त्यांचे सहकारी केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करतात. लोकांचा या पिशव्यांच्या प्रती असेलला सकारात्मक प्रतिसाद, ही आमच्या मेहनतीची आणि कल्पकतेची खरी पावती असल्याचं मृणाल सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -