घरताज्या घडामोडीसंगमनेरातील सर्व आस्थापना २६ मेपर्यंत बंद

संगमनेरातील सर्व आस्थापना २६ मेपर्यंत बंद

Subscribe

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची माहिती

नॉन रेड झोनमधील उद्योगांचे चक्र हळूहळू सुरू झाले असले तरीदेखील संगमनेरात मात्र अद्यापही या चक्राला ब्रेक लागलेला आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आणि हॉटस्पॉट असलेल्या संगमनेरची मुदत २३ मेच्या मध्यरात्री संपत असल्याने यात वाढ करत आणखी तीन दिवस येथील सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. मंगरुळे म्हणाले, यावर्षी रमजान ईद साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय येथील मुस्लिम समाजाने घेतला आहे. तसे निवेदनदेखील त्यांनी प्रशासनाला दिले आहे. कोरोनामुळे संगमनेर शहर हॉटस्पॉट घोषित केलेले असल्याने नियम शिथिल केल्यास आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचा फायदा होणार नाही. ईदच्या निमित्ताने जर शहरातील दुकाने उघडली गेली, तर दोन महिन्यांपासून संयमाने घरात थांबलेले सर्वच समाजातील लोक रस्त्यावर गर्दी करतील. यामुळे सुरक्षित अंतराचे पालन होणार नाही. यासाठी मुस्लिम समाज यावर्षी साधेपणाने ईद साजरी करणार आहे. मुस्लिम समाजाने घेतलेल्या या भूमिकेचे प्रशासनाने स्वागत केले आहे. तसेच संगमनेर शहरातील व्यापारी संघटनांनीदेखील या भूमिकेस सकारात्मक प्रतिसाद देत २४ मे ते २६ मे या कालावधीत बाजारपेठेत होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी २६ मे पर्यंत उत्स्फूर्तपणे आपली दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

याशिवाय मजान ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सूचना केल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळे ३१ मे पर्यंत नागरिकांसाठी बंद राहणार असल्याने कोणत्याही नागरिकाने धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने यापूर्वी केलेल्या आवाहनानुसार सामाजिक विलगीकरणाचे पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी मशिदीमध्ये अथवा इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण, ईद मिलाद साजरी करू नये. मुस्लिम समाज बांधवांनी घरातच नमाज पठण व धार्मिक कार्यक्रम पार पाडावे. ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, दहा वर्षाच्या आतील बालके या अती जोखमीच्या व्यक्तींची काळजी घेतली जावी. सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.

ईदगाह अथवा मज्जिदमध्ये सामूहिक नमाजपठण केले जाणार नाही

संगमनेर तालुक्यातील साकुर येथील मुस्लिम समाजानेदेखील यावेळेस साधेपणाने घरातच रमजान ईद सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष इसाक पटेल यांनी ही माहिती महसूल प्रशासनाला कळविली असून यावर्षी ईदगाह अथवा मज्जिदमध्ये सामूहिक नमाजपठण केले जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -