घरताज्या घडामोडीमुंबईतील कूपर रुग्णालयात एका दिवसात तीन रुग्णांवर 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया

मुंबईतील कूपर रुग्णालयात एका दिवसात तीन रुग्णांवर ‘अँजिओप्लास्टी’ शस्त्रक्रिया

Subscribe

मुंबई: मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन आणि नायर यांसारख्या प्रमुख रुग्णालयांप्रमाणेच पश्चिम उपनगरातील कूपर रुग्णालयात हृदयरोगाने पिडीत रुग्णांवर आज एकाच दिवशी तीन रुग्णांवर ‘अँजिओप्लास्टी’ची यशस्वी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यापूर्वी, फेब्रुवारी २०२२ पासून ‘अँजिओग्राफी’ची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे आता पश्चिम उपनगरातील हृदयरोगाने पिडीत रुग्णांना कूपर रुग्णालयात लवकरात लवकर ‘अँजिओग्राफी’ आणि ‘अँजिओप्लास्टी’ शस्त्रक्रिया मोफत करून मिळणार आहेत. त्यामुळे अशा पिडीत रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईत किडनी, मेंदू, कॅन्सर आदींसारख्या दुर्धर आजारांवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया, औषधोपचार करणे खूपच खर्चिक असते. तसेच, हृदयरोग्यांनाही खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. मात्र पालिकेच्या केईएम, सायन, नायर यांसारख्या मोठ्या प्रमुख रुग्णालयात मोठ्या आजारांवर शक्यतो मोफत अथवा अगदी माफक दरात शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जातात. मात्र ही तिन्ही रुग्णालये शहर हद्दीत आहेत. उपनगरातील पालिका रुग्णालयात मोठ्या आजारांवर सुविधांअभावी शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. ही गंभीर बाब पाहता, आता कूपर रुग्णालयात ‘अँजिओग्राफी’ आणि ‘अँजिओप्लास्टी’ शस्त्रक्रिया करून मिळणार आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिका संचालित, विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी एकूण तीन रुग्णांवर ‘अँजिओप्लास्टी’ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. विशेष म्हणजे या तीनही अँजिओप्लास्टी ‘महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य योजने’ अंतर्गत करण्यात आल्याने सदर गरजू रुग्णांवर खर्चाचा कोणताही भार पडलेला नाही.

विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये फेब्रुवारी २०२२ मध्‍ये हृदयरोग विभाग सुरु करण्यात आला. हृदयरोग विभाग सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिली ‘अँजिओग्राफी’ करण्‍यात आली होती. तेव्हापासूनच म्हणजे गेल्या दहा महिन्यांपासून ‘अँजिओप्लास्टी’ शस्त्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत होते.

- Advertisement -

महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आता रुग्णालय प्रशासनाने हृदयरोग विभाग सुरु केला आहे. रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. शैलेष मोहिते यांनी हा विभाग सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच, महापालिकेच्या केईए रुग्‍णालयाचे हृदयरोगविभाग प्रमुख डॉ. अजय महाजन यांनी ही सुविधा सुरु करण्‍यासाठी महत्त्वाचे सहकार्य पुरवले आहे.

साधारणतः आठ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का बसल्याने ६० वर्ष वयाचा एक मधुमेहग्रस्‍त रुग्‍ण उपचारार्थ कूपर रुग्‍णालयात दाखल झाला होता. ‘अँजिओग्राफी’ केल्‍यानंतर सदर रुग्णाच्या हृदयाला रक्‍तपुरवठा करणार्‍या वाहिन्‍यांमध्‍ये दोन ठिकाणी अडथळे (ब्‍लॉकेज) आढळून आले. या रुग्‍णाच्या हातातील रक्‍तवाहिनीमधून २ स्‍टेन्‍ट हृदयापर्यंत नेवून ‘अँजिओप्लास्टी’ करण्‍यात आली व हृदयाचा रक्‍तपुरवठा यशस्वीपणे पूर्ववत करण्‍यात आला. या व्यतिरिक्त आणखी दोन रुग्णांवर सोमवारी ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली.

या ‘अँजिओप्लास्टी’ पार पडलेल्या तीनही रुग्णांवरील अँजिओप्लास्टी व स्‍टेन्‍टसाठी येणारा संपूर्ण खर्च शासनाच्‍या महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य योजने अंतर्गत विनामूल्य करण्‍यात आला आहे. कूपर रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्‍णांना खर्चाचा भार सोसावा लागणार नाही.


हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना फोन, बाहेर येताच सत्तारांनी दिली प्रतिक्रिया…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -