घरमहाराष्ट्रराजकीय नेत्यांनी गाजवली पुण्याची सभा

राजकीय नेत्यांनी गाजवली पुण्याची सभा

Subscribe

शरद पवारांची मोहिते-पाटलांशी चर्चा ,अजित पवारांची हर्षवर्धन पाटलांशी कुजबूज

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा राजकीय नेत्यांनी चांगलीच गाजवली. या नेत्यांनी सभास्थानी अशा काही कृती केल्या की त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, ‘सध्या माझ्यासोबत नाहीत ते उद्या सहकारी मित्र होऊ शकतील,’ असे सांगत त्या कृत्यांवर कडी केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यास उशीर होणार होता. त्यादरम्यान, सभास्थानी चांगलीच नाट्य रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार हे व्यासपीठावर बसले होते. त्यांच्यापासून काही खुर्च्यासोडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील व्यासपीठावर होते. त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ते पवारांपासून लांबचे होते. मात्र पवार यांनी मोहिते-पाटील यांना जवळ येण्यास सांगितले. त्यानंतर व्यासपीठावर समोरासमोर खुर्ची टाकून मोहिते-पाटील यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. मोहिते पाटील यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता, मी राष्ट्रवादीत आहे. माझा मुलगा भाजपमध्ये गेला आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात जबरदस्त सामना रंगला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आपण भाजपमध्ये जात असल्याचे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. अजित पवार यांनी पाटील यांना आमदार होऊ देणार नाही, अशा विडा घेतला होता. मात्र हे वैर संपल्याचे दिसून आले. व्यासपीठावर अजित पवार आणि पाटील यांच्यामध्ये जयंत पाटील यांच्या नावाची पाटी होती. पवार यांनी जयंत पाटील यांच्या नावाची पाटी बाजूला करून हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची पाटी त्यांच्या बाजूला घेतली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे पवार यांच्या शेजारी बसले. बराच वेळ त्यांची कानांत कुजबूज सुरू होती. याबाबत हर्षवर्धन पाटील यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, ते म्हणाले,‘आमची साखर उद्योगाबाबत चर्चा सुरू होती. अन्य कोणतीही नव्हती. मी सध्या आहे त्याच ठिकाणी आहे.’

व्यासपीठावर हे चित्र असताना, मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच, माझे सगळे नवे मित्र, नवे सहकारी या कार्यक्रमाला आहेत. आता माझ्याबरोबर नाहीत, तेदेखील उद्या सहकारी मित्र होऊ शकतील, अशी कोपळखळी मारल्याने राजकीय चर्चा रंगात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -