घरमहाराष्ट्र११ हजार कैद्यांना पॅरोलवर घरी सोडणार; ३ हजारहून अधिक पोलिसांना कोरोना संसर्ग

११ हजार कैद्यांना पॅरोलवर घरी सोडणार; ३ हजारहून अधिक पोलिसांना कोरोना संसर्ग

Subscribe

राज्यभरात तीन हजाराहून अधिक पोलिसांना कोरोना ची बाधा, अपुर्‍या आरोग्यसुविधा , वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलीस दलात अस्वस्थता

राज्यभरातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांनाही करोनाची लागण होत असल्याने राज्य सरकारने तातडीने आणखी ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपातील पॅरोलवर घरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या पोलिसांची संख्या तीन हजारांच्या घरात पोचली आहे. त्यामध्ये २०० पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे. तर २८०० पोलीस कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. तर ३० पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला आणि त्याची कठोर आणि काटेकोर अंमलबजावणी करता करता पोलिसांच्या नाकीनऊ आले. खरेतर केंद्र सरकारचा लॉकडाऊन जरी २२ मार्चपासून सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात १५ आणि १६ मार्चपासूनच लॉकडाऊनचे वारे वाहायला सुरुवात झाली होती. गेले तब्बल तीन महिने राज्यातील पोलिसांवर प्रचंड मानसिक आणि शारिरीक ताण आला आहे. त्यातच बंदोबस्तावरील पोलिसांना पुरेशा आरोग्य सुविधा सुरुवातीच्या काळात न मिळाल्याने त्याचा मोठा फटका बंदोबस्तावरील पोलिसांना बसला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत ३० पोलीस कर्मचार्‍यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या मुंबई शहरातील १८ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये १५१० पोलिसांना करोनाचा प्रादुर्भाव झाला असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे कामाचे वाढलेले तास ,लॉकडाउनची अंमलबजावणी करताना झालेले हल्ले, यामुळे पोलिसांना तीन महिन्यात प्रचंड तणावाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या तीन महिन्यांत पोलिसांवर हल्ले होण्याच्या २६०  हून अधिक घटना घडल्या असून त्यामध्ये ८६ पोलीस जखमी झालेले आहेत, तर हल्ले करणार्‍या ८३८ हल्लेखोरांना राज्यभरातून पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांबरोबरच राज्यात असलेल्या कारागृहांमधील कैद्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे राज्याच्या गृहखात्याने आणखीन अकरा हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर घरी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यभरात ६० कारागृहे आहेत त्यामध्ये सद्यस्थितीत ३८ हजार कैदी बंदीवान आहेत त्यातील नऊ हजार ६७१ कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात पॅरोलवर सोडण्यात आले आहे. कारागृहातील कोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यसरकारने आणखीन ११ हजार कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर घरी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -