घरमहाराष्ट्रयंदाच्या आषाढी वारीत पुरविणार टँकरद्वारे पाणी

यंदाच्या आषाढी वारीत पुरविणार टँकरद्वारे पाणी

Subscribe

आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी पालखी मार्गावर आवश्यक टँकर व विहीर अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विजय देशमुख यांनी आषाढी वारी सोहळा नियोजनाच्या बैठकीत दिली. आषाढी वारी 2019 च्या नियोजनासाठी तुकाराम भवन येथे जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी व मानाच्या पालख्यांचे विश्वस्त यांची बैठक झाली.

पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले, आषाढी वारी सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालये, अखंडीत वीज पुरवठा, सुरक्षा या बाबींना प्राधान्य द्यावे. पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे, दुरुस्ती, पालखी मुक्कामाची व विसावा ठिकाणची कामे करण्याबरोबरच पालखी विश्वस्तांनी सुचविलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.

- Advertisement -

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले, ‘यावर्षी आषाढी वारीत सोहळ्यात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. वारी पूर्वी आणि वारी नंतर पंढरपुरातील स्वच्छता करण्यात येईल. प्रदक्षिणा मार्गावर खचखडी राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. प्रशासनामार्फत वारकऱ्यांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे ’.

डॉ. भोसले म्हणाले, ‘आषाढी वारीत करावयाच्या कामांच्या‍ नियोजनासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन त्यांना त्यानुसार कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या पुढेही आवश्यकता भासल्यास संबंधितांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेण्यात येईल ’. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘ पालखी मार्गावर सर्व सुविधा देण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले असून वारकाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात २७ टँकर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात २२ टँकर पुरवण्यिात येणार असून मानाच्या अन्य पालखी सोहळ्यात आवश्यकतेनुसार टँकर पुरविण्यात येणार आहेत.

- Advertisement -

पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पालखी मार्ग व पंढरपूर, वाखरी व ६५ एकर येथे पुरेशी शौचालये उपलब्ध करण्यात आली आहे ’. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘आषाढी वारी सोहळ्यात चंद्रभागा नदीत पुरेसे पाणी राहील याची दक्षता घेण्यात आली असून जलसंपदा विभागामार्फत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मुक्काम, विसावा, ६५ एकर, वाळवंट येथे विद्युत वितरण कंपनीमार्फत तात्पुरती वीज कनेक्शन देण्याचे नियोजन झाले आहे. वारकऱ्यांना केरोसीन व गॅस मिळावा याचे नियोजन केले आहे’. बैठकीत मानाचे पालखी विश्वस्त व पंढरपुरातील नागरीकांनी अनेक सूचना केल्या. या सूचनांवार आवश्यक ती कार्यवाही केले जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपस्थितांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -