घर महाराष्ट्र 'लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?'

‘लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?’

Subscribe

'काँग्रेसने कोकणात अनेकांना मोठे काम करण्याची संधी दिली. मात्र, त्यातील काही जणांनी पक्षाऐवजी केवळ स्वतःचाच विचार केला', अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कणकवलीत लागलेले काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर काढण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला गेला. याच पार्श्वभूमीवर ‘तुम्हाला रस्त्यावरचे झेंडे आणि बॅनर काढता येतील पण लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर कसे काढणार?’ असा खडा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.
जनसंघर्ष यात्रेच्या कणकवली येथील सभेत चव्हाण यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता, काँग्रेस सोडणाऱ्यांवर सडकून टीका केली. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, ‘कणकवलीत आजही काँग्रेसच्या झेंड्याखाली मोठी सभा होऊ शकते. ही बाब लोकांच्या मनात काँग्रेस किती खोलवर रुजलेली आहे याचे द्योतक आहे.’ तसेच ‘आगामी निवडणुकीत कार्यकर्ते सांगतील तो उमेदवार देऊ’ अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम संदीप तसेच आ. भाई जगताप यांच्यासह अन्य अनेक पदाधिकारी हजर होते.

कोकणातील दडपशाही संपली पाहिजे

‘कोकणातील दडपशाही संपवली नाही तर भविष्यात कदाचित मतदान करण्याची संधी नागरिकांना मिळणार नाही’, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. ‘काँग्रेसने कोकणात अनेकांना मोठे काम करण्याची संधी दिली. मात्र, त्यातील काही जणांनी पक्षाऐवजी केवळ स्वतःचाच विचार केला. अध्यक्ष एका पक्षाचे, खासदार दुस-या पक्षाचे आता निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार त्यांचे त्यांनाच ठावूक…’ असा खोचक टोमणा चव्हाण यांनी यावेळी मारला. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. शेतक-यांना कर्जमाफी मिळाली नाही लोकांना चारा छावण्यांची गरज आहे आणि या परिस्थितीत सरकार डान्सबार आणि लावण्या सुरु करण्याचे काम करत आहे. मागील तीन वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम रखडले आहे. इंदू मिलच्या जागेवर नियोजीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन स्वतः पंतप्रधानांनी केले होते.  तरी आजवर ही स्मारके का उभी झाली नाहीत?’ अशी विचारणा त्यांनी केली.

रामाचे नाव घेऊन युती होईल – विखे पाटील

- Advertisement -

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी भाजप सेनेवर घणाघाती टीका केली. यावेळी विखे पाटील म्हणाले की, ‘२०१४ च्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा प्रचंड गैरवापर केला. आज तोच सोशल मिडीया भाजपच्या डोक्यावर पाय ठेवायला लागला आहे. सोशल मिडीयातून पोलखोल होत असल्याने, त्यावर विश्वास ठेवू नका असे सांगण्याची नामुष्की भाजपावर ओढावली आहे.’ ‘देशातील एकंदर परिस्थिती पाहता अघोषित आणीबाणीसारखी स्थिती आहे. रामाचे नाव घेऊन या पुढे आता भाजप सेनेची युती होईल. जे मंदिर बांधायला अयोध्येत गेले ते शरयू नदीची आरती करून परत आले’, अशी टीकाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. याच सभेत विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -