घरमहाराष्ट्रबाळासाहेबांनी विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं

बाळासाहेबांनी विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं

Subscribe

मंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चे नाव देणे नाकारले असते, असं सांगून नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यामुळे नामकरणासाठी लढणार्‍या स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला बळ मिळण्याची शक्यता असून, नामकरणाच्या मुद्दयावरून आघाडीत बिघाडी असल्याचे समोर आले आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी बोलनताना भुजबळ यांनी हे विधान केले आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वत:चे नाव विमानतळाला देणे नाकारले असते. जे. आर. डी. टाटा यांचे नाव विमानतळाला सूचवले असते, असे सांगतानाच नामकरण वाद एकत्र बसून सोडवावा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. मात्र, हे सांगतानाच बाळासाहेब आणि दि. बा. पाटील या दोन्ही नावाला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भुजबळ यांनी थेट नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सुनावतानाच ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

- Advertisement -

वाघ पंजाही मारू शकतो…

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरही भाष्य केले. राज्याचे अनेक प्रश्न केंद्राकडे आहेत. त्यामुळे जमवून घ्यावच लागते. मैत्री करायची की नाही हे वाघाच्या मनावर आहे. वाघ पंजाही मारू शकतो, असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला.

राजे सुज्ञ आहेत

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केले. मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध नाही. कोरोना पार्श्वभूमीवर आंदोलन कसे करावे हे आम्ही काय सांगणार? राजे सुज्ञ आहेत. संभाजीराजे सावध पावले टाकत आहेत, असे सांगतानाच ते राजे आहेत. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे भक्त आहोत, असे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठा आरक्षण मोर्चामुळे ओबीसींनी विचलित होण्याचे कारण नाही. अखेर हा प्रश्न सुप्रीम कोर्टात सुटणार आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

पवार सल्ला नक्कीच ऐकतील

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रशांत किशोर यांनी अनेक राजकीय पक्षांना सल्ले दिले. त्यामुळे या राजकीय पक्षांना यशही मिळाले आहे. निवडणुकीच्या रणनीतीत त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी काही सल्ला दिला तर पवार साहेब नक्कीच ऐकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -