घरमहाराष्ट्रचाकरमान्यांनू... गणपतीक गावाक ७ ऑगस्टआधीच येवा!

चाकरमान्यांनू… गणपतीक गावाक ७ ऑगस्टआधीच येवा!

Subscribe

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांनी चाकरमान्यांना कोकणात प्रवेश नाकारला होता. गणेशोत्सवासाठी गावाला जाता यावे यासाठी अनेकजण आतापासून तयारीला लागले आहेत. मात्र, गणेशोत्सवासाठी कोकणात यायचे असेल तर 7 ऑगस्टपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत यावे असा फतवा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना तब्बल 15 दिवस अगोदरच गाव गाठावे लागणार आहे.

यामुळे हजारो चाकरमान्यांना मोठा धक्का बसला असून, एवढे दिवस सुट्टी घेऊन गावी कसे जाणार असा प्रश्न पडला आहे. गणपती की नोकरी या चक्रव्यूहातून गणपती बाप्पाच आता चाकरमान्यांची सुटका करेल, अशी आशा ते करत आहेत. कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरु होत असून कोरोनामुळे मे महिन्यामध्ये मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना गावाकडे जाता आले नाही. परंतु, गणेशोत्सवासाठी काही करून जाणार असा पवित्रा चाकरमान्यांनी घेतला आहे. त्यानुसार अनेकजण तयारीला लागले आहेत. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गणेशोत्सवासाठी गावाला यायचे असेल तर 7 ऑगस्टपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत यावे असा निर्णय जाहीर केला आहे.

- Advertisement -

त्यामुळे चाकरमान्यांना तब्बल 14 दिवस अगोदर गावी जावे लागणार आहे. परजिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांना गाव नियंत्रण समितीच्या सल्ल्याने 14 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक असणार आहे. मात्र, क्वारंटाईनची व्यवस्था नागरिकांना स्वत: करावी लागणार असून, चाकरमान्यांनी येताना क्वारंटाईन राहण्यासाठी घराची क्षमता, सोयी सुविधा आहेत का याची खात्री करूनच यावे अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर गावाला येण्यासाठी त्यांना ई-पास घेणे आवश्यक असून, पास नसल्यास त्यांना जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. ई-पास आणि गृह विलगीकरणाचा नियम मोडल्यास चाकरमान्यांना पाच हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे.

गणेशोत्सव कालावधीत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने घ्यावयाची जबाबदारी व करावयाच्या उपाययोजनांबाबत गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये चाकरमान्यांना गावात येण्यासंदर्भात व गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

- Advertisement -

गणेशोत्सव साजरा करण्याबाबत दिलेल्या सूचना

सिंधुदुर्गमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची 32 मंडळे आहेत. गणेशोत्सवादरम्यान गावातील, वाडीतील लोकांनी एकत्र येऊन भजन, आरत्या न करता प्रत्येकाने घरीच भजन, आरत्या कराव्यात. महापूजा, डबलबारीचे आयोजन करू नये, गणपती मूर्तीच्या विसर्जनासाठी घरातील दोनच व्यक्तींनी जावे, मिरवणुका आणि मनोरंजनाची साधने टाळावीत, इतरांच्या घरातील गणपतीचे दर्शन टाळावे, म्हामद सुद्धा घरीच करावे, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी गणेशोत्सवासाठी विशेष बस गाड्यांची व्यवस्था करू नये, तसेच भटजींनी ऑनलाईन व्हिडिओ अ‍ॅपद्वारे पूजेची व्यवस्था करावी.

विशेष कारणासाठी मिळणार पास

7 ऑगस्टनंतर गणेशाोत्सव कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येणार असले तरी विशेष कारण असलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. विशेष कारणाव्यतिरिक्त अन्य जिल्हे व महापालिकांना ई-पास न देण्याबाबत पत्र देण्यात येणार आहे.

सध्या कोरोनाची महामारी बघता थोडं सगळ्यांनी समजून घ्यायला हवे. चाकरमान्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अगोदर जावे. कारण जर गणपतीच्या काळात कोकणात गेल्यावर घरी जाऊन पूजा करता आली नाही तर इतका लांबचा प्रवास करून जाण्याचा काय उपयोग. त्यामुळे मी देखील परिवहन मंत्री आणि पालकमंत्री अनिल परब यांना भेटून यावर काय करता येईल का? याविषयी चर्चा करणार आहे.
– दिपक केसरकर, शिवसेना आमदार

सिंधुदुर्गात जाण्याचे नियम
=7 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंतच प्रवेश मिळणार
=ई-पास नसल्यास वाहनांना प्रवेश नाही
=14 दिवस क्वारंटाईन होण्याची सुविधा असल्याची खात्री करूनच गावी यावे
= ई-पास, गृह विलगीकरणाचा नियम मोडल्यास प्रत्येकी 5000 रुपये दंड
= या दरम्यान सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात येणार
=बाहेरील राज्यातून येणार्‍या व्यक्तीची ग्रामस्तरीय समितीकडे नोंदणी करणे आवश्यक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -