घरमहाराष्ट्रनाणारऐवजी बारसूचा पर्याय

नाणारऐवजी बारसूचा पर्याय

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र, स्थानिकांचा जोरदार विरोध

स्थानिकांसह शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे नाणार येथील तेल शुद्धिकरण प्रकल्प थंड बस्त्यात गेला होता, मात्र या रिफायनरी प्रकल्पासाठी नाणारऐवजी राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील १३ हजार एकर जागा देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारी महिन्यात पत्र लिहून पर्यायी जागेसंदर्भातील प्रस्ताव दिल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प रत्नागिरीतच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर दुसरीकडे ही बातमी पसरताच बारसू गावातील रहिवाशांनीही या प्रकल्पाला विरोध दर्शवत बुधवारी जोरदार आंदोलन केले. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना या प्रकल्पावरून पेचात अडकण्याची शक्यता आहे.

एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रत्नागिरीतील तेल शुद्धिकरण प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन झाल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यातच कोकण दौर्‍यावर असलेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी लोकांचा विरोध नसेल अशा ठिकाणीच रिफायनरी प्रकल्प हलवण्याबाबतचे विधान केले. त्यानंतर बारसू-धोपेश्वर परिसरातच हा प्रकल्प उभारावा, अशी मागणी करत स्थानिकांनी आदित्य ठाकरे यांची भेटही घेतली होती, तर बुधवारी काही स्थानिकांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला जोरदार विरोध करत आंदोलन केले. यामुळे रिफायनरी प्रकल्पाचा वाद पुन्हा चिघळणार असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

पत्रात काय?
राजापूर तालुक्यातील बारसू येथील १३ हजार एकर जागा तेल शुद्धिकरण प्रकल्पासाठी आम्ही प्रस्तावित करत आहोत. त्याचबरोबर खनिज तेल टर्मिनलसाठी नाटे येथे २१४४ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. बारसूच्या जागेपैकी ९० टक्के जमीन ही पडीक असून, या जागेत वाडी-वस्ती नसल्याने कोणाचेही विस्थापन होणार नाही. पर्यावरणाचे संतुलन न बिघडवता या जागेचा उपयोग तेल शुद्धिकरण प्रकल्पासाठी करणे शक्य आहे, असे राज्य सरकारने म्हटले आह़े, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -