बेस्ट चालकांनी पुकारला अचानक संप, प्रवासी हैराण; नेमकं कारण काय?

बेस्ट उपक्रमात भाडे तत्वावरील बस चालकांचा कंत्राटदार काही महिने वेतन थकवीत आहेत, तर काही कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा तिढा सोडवत नसल्यानेच आज बेस्टउपक्रमात कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचे हत्यार उगारल्याचे बोलले जात आहे.

बेस्ट परिवहन विभागात भाडे तत्वावर चालविण्यात येणाऱ्या बस गाड्यांच्या बस चालकांनी थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची समस्या यावरून रविवारी व आज सोमवारीही अचानकपणे संप पुकारला. त्यामुळे या संपाचा बेस्टच्या दैनंदिन उत्पन्नावर परिणाम झाला आणि त्याचा बेस्टच्या प्रवाशांनाही फटका बसला. मात्र बेस्ट प्रशसनाने या संपाचे गंभीर्य ओळखून काही ठिकाणी पर्यायी बसगाड्यांची व्यवस्था करून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. (BEST workers on strike)

हेही वाचा – बेस्ट प्रवाशांसाठी ‘ई – बाईक सेवा’; अंधेरीत प्रयोग यशस्वी

मात्र बेस्ट उपक्रमात भाडे तत्वावरील बस चालकांचा कंत्राटदार काही महिने वेतन थकवीत आहेत, तर काही कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा तिढा सोडवत नसल्यानेच आज बेस्टउपक्रमात कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचे हत्यार उगारल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे बेस्ट परिवहन विभागात कंत्राटी कामगार का संप करतात, त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, याबाबत बेस्ट प्रशासनाला यशस्वी तोडगा काढण्यात अद्यापही यश आलेले नसल्याचे बोलले जात आहे.

बेस्ट परिवहन विभागातील भाडे तत्वावरील बसगाड्या चालविणाऱ्या ‘एटीसी ग्रुप’च्या बस चालकांनी एप्रिलपासून रखडलेल्या वेतनाबाबत रविवारी अचानकपणे संप पुकारला. तर सोमवारपासून ‘एमपी ग्रुप’ च्या चालकांनीही अचानकपणे संप पुकारला. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यातही बेस्ट उपक्रमात वेतनासाठी कंत्राटी बसचालक संपावर गेल्याची ही तिसरी वेळ आहे.

हेही वाचा – खासगी, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीत मिळणार बेस्ट बस पास

बस चालकांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकीत असल्याचे ‘एमपी ग्रुप’ चालकांनी सांगितले. काही चालकांना तर अर्धाच पगार मिळाला असून एक वर्षापासून भविष्य निर्वाह निधीचे पैसे देखील जमा झालेले नाहीत. त्यांना पगाराच्या स्लिपही दिल्या जात नसल्याचा आरोप बसचालकांनी केला आहे.

चार महिन्यांपासून पीएफ बंद

वडाळा, कुलाबा, वांद्रे, कुर्ला आणि मुलुंड आगारात प्रत्येकी २०० पेक्षाही अधिक मिडी, मिनी बसेस चालवल्या जात असल्याचे चालकांनी सांगितले. दोन्ही शिफ्ट एकत्र करून सुमारे ३०० चालक आंदोलनात सहभागी झाले आहेत जुन्या कंपनीने पाच महिन्यांपासून पीएफ जमा केला नाही. चार महिन्यांपासून पीएफ बंद केला आहे. चालक आपल्या घरगुती समस्यांना बगल देऊन बस चालवतात. आम्हाला १८,००० पगार दिला जातो. कामावरून एक दिवस सुट्टी घेतल्यावर १,६५० रुपये कापले जातात, असे काही बस चालकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – आर्थिक संकटात बेस्टला पालिकेचा आधार; ४८२.२८ कोटींची आर्थिक मदत

तर कायद्यातील तरतुदीनुसार बेस्ट उपक्रमाने संबधित कंत्राटदारावर कडक कारवाई करणे अपेक्षित असताना बेस्ट प्रशासन सदर गंभीर समस्येकडे लक्ष देत नसतानाही त्यावर कडक कारवाई का करीत नाही, असा सवाल बेस्टचे कंत्राटी कर्मचारी व सामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.