घरमहाराष्ट्र'राज्यातील पूरपरिस्थितीचे संकुचित राजकारण करण्याचा प्रयत्न आहे'

‘राज्यातील पूरपरिस्थितीचे संकुचित राजकारण करण्याचा प्रयत्न आहे’

Subscribe

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर केलेल्या आरोपावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी टीका केली. पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा रशियाचा दौराही रद्द केला, असं भांडारी म्हणाले.

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सलग सात दिवस महापूराने थैमान घातलं होतं. या पूरग्रस्त नागरिकांपर्यंत बचावकार्यला विलंब झाल्याने विरोधीपक्ष हे सरकारवर जोरदार टीका करत होतं. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्या सरकारवर पश्चिम महाराष्ट्रातील पुराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. म्हणून या आरोपावर राज्यातील पूरपरिस्थितीचे संकुचित राजकारण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सोमवारी केली. तसेच भांडारी म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती गंभीर होऊ लागल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात चालू असलेली आपली महाजनादेश यात्रा सोडून मुंबईला प्रयाण केलं.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी पूरस्थिती हाताळण्यासाठी चालू असलेल्या कामाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या अंत्यसंस्काराला नवी दिल्ली येथे उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताबडतोब परतले आणि त्यांनी कोल्हापूरला भेट दिली. तसेच त्यांनी मदतकार्याला चालना दिली. सांगलीला भेट देणं शक्य झाल्याबरोबर त्यांनी त्या शहराला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रंदिवस कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तेथील मदतीसाठी त्यांनी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन त्यांनी त्यांचा रशियाचा दौराही रद्द केला, असं माधव भांडारी यांनी सांगितलं.

- Advertisement -

….म्हणून मुंबईला वाऱ्यावर सोडले का?

भांडारी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी शक्ती एकवटली असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मदत-पुनर्वसनमंत्री सुभाषबापू देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह सरकारमधील वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून काम करत आहेत. मुंबईत २००५ साली महापूर आल्यानंतर किमान एक हजार जणांचा बळी गेला पण त्यांच्या वारसांना किंवा पुरामुळे जखमी झालेल्यांना सरकारी मदतीचा योग्य लाभ झाला नाही. त्यावेळचे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांनी मुंबईला वाऱ्यावर सोडले का? याचाही जाब पृथ्वीराज चव्हाण यांनी द्यावा, असा प्रश्न भांडारी यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -