घरमहाराष्ट्रदार उघड, उद्धवा दार उघड

दार उघड, उद्धवा दार उघड

Subscribe

राज्यात ठिकठिकाणी भाजपचे घंटानाद आंदोलन

भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी आज भाजपतर्फे राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्याची मागणी करत घंटानाद आंदोलन केले. यावेळी ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही. मात्र, भाजपने मंदिरं सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.

मुंबईत सिद्धीविनायक मंदिराबाहेर शनिवारी भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. मंदिराची दारे उघडावी म्हणून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबई भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ठाण्यात विविध ठिकाणी मंदिराबाहेर घंटानाद करण्यात आला. सरकारला जाग यावी याकरिता हे आंदोलन करण्यात आले. तसेच वारकरी संप्रदायाकडून देखील मंदिरांची दारे उघडण्याची मागणी करण्यात आली. एकीकडे सरकार मद्य विक्री केंद्रासाठी मुभा देत आहे. मात्र, मंदिरे का उघडत नाही? असा सवाल भाजपकडून करण्यात आला. यावेळी भाजपकडून ठाण्यात कोपीनेश्वर मंदिर, लोकेश्वर मंदिर, सिद्धीविनायक मंदिर, राम मंदिरा बाहेर अशा 15 ठिकाणी सरकारच्या विरोधात घंटानाद करण्यात आला. यावेळी भाजप आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

कल्याण-डोंबिवली
भाजपचे आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकार्‍यांनी डोंबिवली गणेश मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले. संपूर्ण देशात सर्व भागांमध्ये मंदिरात भाविकांना दर्शन सुरू झालेले आहे. कोरोना संकट काळात भाविकांना मंदिरात प्रवेश बंद होता. मात्र आता कोरोना संकट कमी होऊ लागले आहे.

पुणे
पुणे भाजपकडून सारसबाग गेटवर घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाविकांना दर्शनासाठी राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून राज्यभरात घंटानाद आंदोलन केले जात आहे.

- Advertisement -

नाशिक
रामकुंड परिसरात साधू महंत यांनी घंटानाद आंदोलन करत मंदिरे खुली करण्याची मागणी केली. या आंदोलनात राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी करत अनेक साधू, महंत, पुरोहित संघाचे पदाधिकारी सहभागी झाले. ‘उध्दवा अजब तुझे सरकार, कधी उघडतो मंदिरांचे द्वार’ अशी घोषणा देत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला.

अहमदनगर
मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भाजपने शिर्डीतील साई मंदिराजवळ आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साई मंदिरचे गेट नंबर 4 बंद केले. पोलिसांनी या भागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्तही ठेवला आहे. भाजपच्या या आंदोलनात आमदार राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी बालाजी मंदिरचे दार उघडले आहे. टाळ, मृदंग आणि घंटा वाजवत आंदोलन केले. आंदोलनात वसुदेवासह भजनी मंडळाचाही सहभाग पाहायला मिळाला. औरंगाबादमध्येही भाजपने घंटानाद आंदोलन सुरू केले. गजानन महाराज मंदिरासमोर भाजपने आंदोलन केले. यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते मंदिरासमोर जमा झाले होते. भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

जो उत्साह सरकारने दारुची दुकाने उघडताना दाखवला त्यापैकी अर्धा उत्साह तरी धार्मिक स्थळे उघडण्यात दाखवावा. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग राबवावे, लोकांनाही ते समजते. हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे आणि सध्याच्या परिस्थितीत मानसिक आधाराचीही सर्वांना गरज आहे. धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय योग्य नाही. देशात अनेक ठिकाणी धार्मिक स्थळे उघडली, परंतु ती उघडल्यामुळे कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला असे झाले नाही.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

महाविकास आघाडी सरकार जागे झाले तर ठीक आहे आणि दोन दिवसात मंदिरे उघडली नाही तर भारतीय जनता पार्टीकडून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात येतील. सरकार झोपले आहे, त्याला जागे करण्यासाठीच हा घंटानाद राज्यभर केला जात आहे.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -