घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबाद लोकसभेवर भाजपचा दावा, केंद्रीय मंत्री कराड निवडणूक लढवण्यास इच्छूक

औरंगाबाद लोकसभेवर भाजपचा दावा, केंद्रीय मंत्री कराड निवडणूक लढवण्यास इच्छूक

Subscribe

छ. संभाजीनगर – भारतीय जनता पक्षाचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर असलेला डोळा आणि भाजप नेत्यांच्या मनातलं अखेर ओठांवर आलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी शिवसेनेने औरंगाबाद लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडावी अशी जाहीर मागणी त्यांनी केली आहे.

शिवसेनेत फूट पडण्याच्या आधीपासून भाजपचा या मतदारसंघावर डोळा होता. 2019 मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्यापासून भाजपने या मतदारसंघात काम सुरु केले होते. त्याची जाहीर वाच्यता आता केंद्रीय मंत्री कराड यांनी केली आहे. 2019 मध्ये एआयएमआयएमचे इम्तियाज जलील येथून विजयी झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपाच्या एका पत्रानंतर…; सिनेट निवडणुकीच्या स्थगितीचं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं कारण

शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील सहा आदारांपैकी पाच शिंदेंसोबत गेले आहेत, तर फक्त एक आमदार ठाकरेंसोबत राहिला आहे. जिल्ह्यात एकूण नऊ आमदार आहेत, त्यापैकी दोन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. औरंगाबाद लोकसभाही शिवसेनेच्या ताब्यातून गेली आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेना कमकूवत झाल्याचा दावा भागवत कराड यांनी केला आहे.

- Advertisement -

भाजपने येथील लोकसभा निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही कराड म्हणाले. भाजपने शहरात आणि जिल्ह्यात बुथ कमिटी मजबूत केली आहे. लोकसभेच्या प्रभारींपर्यंत सर्व येथे कामाला लागले आहेत. त्यामुळे आता येथे भाजपची ताकद वाढत असल्याचाही युक्तिवाद कराड यांनी केला आहे. यावर शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला धक्का

कराड यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा माध्यम प्रतिनिधींसमोर व्यक्त केली आहे. मात्र ते एकमेव येथून इच्छूक उमेदवार नाहीत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया राहटकर या देखील स्पर्धेत आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. येथून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे चार वेळा लोकसभेत गेले आहेत. मात्र 2019 च्या निवडणुकीत हैदराबादमधील पक्ष एमआयएमने शिवसेनचा बालेकिल्ल्यातच पराभव केला. मराठा आरक्षण मुद्दा हा लोकसभा निवडणुकीत कळीचा ठरला होता. 1998 ची एकमेव निवडणूक सोडली तर 1989 पासून औरंगाबाद लोकसभा ही शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे. 1989 मध्ये मोरेश्वर सावे हे येथून शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यानंतर 1991 मध्ये सावेंनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. 1996 मध्ये शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांना मैदानात उतरवले आणि तेही विजयी झाले होते. 1998 मध्ये काँग्रेसचे रामकृष्ण पाटील विजयी झाले होते. 1984 नंतर काँग्रेसचा पहिला विजय होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -