घरमहाराष्ट्रपूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे - बाळासाहेब थोरात

पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे – बाळासाहेब थोरात

Subscribe

सरकारने पूरग्रस्त भागात मदत बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

राज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. प्रशासन व एनडीआरएफ हे बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत. त्यामुळे सरकारने पूरग्रस्त भागात मदत बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे तसेच केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला ४ हजार कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, गेल्या पाच सहा दिवसांपासून राज्यात भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील लाखो लोक पूरामुळे बेघर झाले आहेत. लाखो लोक पूराच्या पाण्यामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. पण महाजनादेश यात्रेच्या जल्लोषात व्यग्र असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पूरग्रस्तांचा व्यथा पोहोचू शकल्या नाहीत हे दुर्दैव आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना चार पाच दिवस पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेही नाहीत. या सरकारमध्ये पालकमंत्री फक्त ध्वजारोहण करण्यासाठीच नेमले आहेत का?, असा संतप्त सवाल आमदार थोरात यांनी केला.

- Advertisement -

राज्य आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे. महाराष्ट्रावर एवढे मोठे संकट आले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप निवडणूक विजयातच मश्गुल आहेत. एरव्ही प्रत्येक गोष्टीवर ट्वीट करणाऱ्या पंतप्रधानांनी राज्यातील पूरस्थितीची अद्याप साधी दखलही घेतली नाही. आज बचावकार्य करणारी एक बोट उलटल्यामुळे जवळपास १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पूर ओसरल्यावर रोगराई पसरण्याची भीती आहे त्यावेळी परिस्थिती अजून गंभीर होईल. मदत आणि बचावकार्याला वेग देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी आम्ही केली आहे. आलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास उशीर झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. राज्य सरकारने कर्नाटक सरकारच्या संपर्कात राहून पाणी सोडण्याचे नियोजन केले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. काँग्रेस पक्षाचे आमदार व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण भाजपचे लोकप्रतिनिधी मात्र कोठेही दिसत नाहीत. भाजपला जनतेची गरज फक्त मतांपुरतीच आहे. मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन सरकारने लोकांच्या जीवाची पर्वा करावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -