घरताज्या घडामोडीशरद पवार यांचा भाजपवर गंभीर आरोप, महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा केंद्राचा डाव

शरद पवार यांचा भाजपवर गंभीर आरोप, महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा केंद्राचा डाव

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून खाली आणण्यासाठी केंद्रातल्या भाजप सरकारने सारी शक्ती कामी लावली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर आसूड ओढले आहेत. सरकार पडण्याची स्वप्न सोडून द्या, उलट आगामी सरकारही महाविकास आघाडीचे असेल, असे त्यांनी ठासून सांगितले. राज्याच्या ३२ हजार कोटींच्या जीएसटी परतावाची रक्कम गोठवणारे केंद्र सरकार ३ हजार कोटींच्या कोळशाचा हिशोब कसा काय मागू शकतो, असा सवाल करत पवारांनी केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात पकडले आहे. पिंपरी येथे पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार शहरात माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसर्‍या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचा आरोप केल्याचे पवार म्हणाले. पवार म्हणाले, ‘माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही’. केंद्र सरकार कशा पद्धतीने यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला. महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून घालवण्यासाठी केंद्राने इतके प्रयत्न केले की यापूर्वी तसे कोणी केल्याचे आठवत नाही, असे पवार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसर्‍या मेळाव्यातील भाषणानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते, असा आरोप केला. फडणवीसांनी असा आरोप करणे कदापि योग्य नाही, तो त्यांनी करू नये, अशी माझी त्यांना विनंती आहे, असे पवार म्हणाले. सत्ता स्थापन करताना त्यात मी स्वत: हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचे. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हते अन् मनीही. मीच उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केली. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून घोषणेचे स्वागत केले.

- Advertisement -

अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी धाडी टाकल्या. पाच दिवस या धाडी चालल्या. त्यानंतर तिथे जाऊन मी चौकशी केली. अधिकार्‍यांनी मागितलेली कागदपत्रे पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल असे मला वाटत नाही. छापेमारीसाठी अजितदादांच्या बहिणींच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोक छापेमारीसाठी गेले होते. त्यांच्या हाती काही लागले नाही तरीही त्यांना तिथे थांबवण्यात आले. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. आता मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असे पाच-पाच दिवस येऊन राहणे किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केलाय. चौकशीचा अधिकार मला मान्य आहे. माझ्या घरीही येऊन ते चौकशी करु शकतात. पण चौकशी केल्यानंतर, काम संपल्यानंतर तिथे थांबू नये. पण बिचार्‍या पाहुण्यांचा दोष नव्हता. त्यांना वरुन आदेश होते. हे सगळे चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकार अस्थित करण्यासाठी ही पावले टाकली जात आहेत. तपास यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप पवार यांनी केलाय.

महत्वाची बाब म्हणजे काही लोक या छापेमारीचे, कारवाईचे समर्थन करण्यासाठी पुढे आले. खुलासा करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येतात. कधी माजी मुख्यमंत्री तर कधी भाजपचे मुंबईचे माजी अध्यक्ष पुढे येतात. त्या यंत्रणांचे अधिकारी, त्यांचे प्रवक्ते यांनी भाष्य केले तर मी समजू शकतो. पण भाजपचे नेते पुढे येतात. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करण्यासाठी हा सर्व खाटाटोप सुरु आहे, हे लक्षात येईल. राजकीय आकसानं चौकशी सुरु असल्याचं दिसून येतं, असंही पवार म्हणाले.

- Advertisement -

वसुली चीप कशी असते?

वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर त्यांनी दाखवावे, असे आव्हानच पवारांनी फडणवीसांना दिले. ते मुख्यमंत्री होते, त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो. असे आरोप त्या जागी बसलेल्या कोणाही मुख्यमंत्र्यांनी आजवर केले नाहीत. या पदाला फडणवीस धक्का पोहोचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते, असे सांगत पवारांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राचा बंगालशी एक घरोबा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवले, हे ऋणानुबंध जुने आहेत. ते आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे नेमके फडणवीसांना काय म्हणायचे आहे, अशी विचारणा पवारांनी केली.

गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई

अमली पदार्थाची एक यंत्रणा आहे, जी आजवर कोणाला माहिती नव्हती. नवाब मलिकांच्या नातेवाईकांसोबत काय घडते आहे. कारवाई करावी म्हणून अधिकार्‍यांंवर केंद्राचा दबाव आहे. मलिक केंद्राच्या धोरणावर टीका करतात म्हणून त्यांच्यावर हल्ला करता येत नाही. मग याची भरपाई त्यांच्या जावयाला अटक करून केली जात असल्याचा गंभीर आरोप पवारांनी केला. मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला म्हणून अटक केली होती. पण संबंधित तज्ज्ञ मंडळींनी हा गांजा नसून एक वनस्पती आहे, असे म्हटले आहे. याचा अर्थ काय समजायचा? अमली पदार्थ पथकाने दोन साक्षीदार आणले, त्यात एक गुन्हेगार होता, असे सांगत पवारांनी अमली पदार्थ विरोधी पथकाची पिसेच काढून घेतली. गुन्हेगारीत अडकलेला हा पंच तेव्हापासून गायब आहे. पुणे पोलिसांनी त्याच्यासाठी वॉरंट काढलं आहे. म्हणजे हे गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करतात. गुन्हेगारांना सोबत घेऊन कारवाई करायची आणि चांगल्या लोकांना अडकवायचे, हे एकमेव धोरण या यंत्रणेचे दिसते आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.

तपास यंत्रणा आणि भाजपचा संबंध काय?

यंत्रणेवर आरोप केला तर भाजपचे नेते खुलासा द्यायला पुढे येतात. त्या यंत्रणेच्या प्रमुखांनी उत्तर दिले तर समजू शकतो; पण भाजप जर त्यावर बोलत असेल तर याचा स्वच्छ अर्थ आहे की भाजप ह्यांना चालवते. महाविकासआघाडी सरकार ढासळत नसल्याने, भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळे राजकीय आकसाने हे होतेय. केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे पवार यांनी म्हटले. कितीही छापेमारी करा सरकार हरणार नाही, अशा शब्दात पवारांनी होत असलेल्या कारवायांची निर्भत्सना केली.

तीन हजार कोटींचे निमित्त पुढे करत राज्याच्या वीज कंपन्यांचा कोळसा केंद्राने रोखल्याची दखल घेत पवारांनी तीन हजारांचा हिशोब मागणारे केंद्र सरकार राज्याचे ३२ हजार कोटी कसे गोठवून ठेवते, असे पवारांनी विचारले. राज्याच्या जीएसटीचा ३२ हजार कोटींचा परतावा केंद्र देत नाही. इतकी देणी असताना ३ हजार कोटींचे निमित्त दाखवण्यामागे केंद्राचा इरादा स्पष्ट दिसतो, असे पवार म्हणाले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -