घरमहाराष्ट्रबदलता काळ तुमच्याशी जास्त निर्घृणपणे वागू शकतो, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

बदलता काळ तुमच्याशी जास्त निर्घृणपणे वागू शकतो, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

Subscribe

मला त्याचा स्पर्शही झाला नव्हता. याचे कारण शिवसेनाप्रमुख जे सांगायचे की पदे असतील, सत्ता असेल ती  येते जाते. मात्र लोकांशी नेहमी नम्र राहा. मी नम्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करत आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले

मुंबई : निर्घृणपणाने वागू नका. दिवस आणि काळ हा नेहमी सर्वांसाठी चांगलाच असतो असे  नाही. तो बदलत असतो. काळ बदलल्यानंतर आपण जसे लोकांशी वागलोय तसा तो बदललेला काळ कादाचित जास्त दृष्टपणाने, निर्घृणपणाने तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी सोमवारी भाजपला दिला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आपण संपर्कात आहोत. काल यांचा मुखवटा बाजूला झाला आहे. जे. पी. नड्डा  यांच्या पोटातील ओठावर आले आहे. त्यांना या देशात दुसरा कोणताही पक्ष नको आहे. म्हणजेच त्यांना हुकूमशाही आणायची आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. पक्ष संपवायचा असेल तर जनतेत जा, असेही त्यांनी भाजपला उद्देशून सांगितले.

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भोवती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फास आवळला आहे. राऊत यांना अटक झाल्यानंतर ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही, असे ते म्हणाले. राजकारणात बुद्धी दिसत नाही तर फक्त बळ दिसते. हे सध्या सत्तेच्या हमामात आहेत. सत्तेचा फेस उतरला की सगळे स्पष्ट होईल, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

यावेळी ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या शिवसेना संपल्याच्या विधानाचा समाचार घेतला. आज नड्डा जे म्हणालेत हे पक्ष संपतील. म्हणजे प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची हिंदूंमध्ये फूट पाडायची. भाषिक भिंती उभ्या करायच्या. स्थानिक अस्मिता चिरडायची. मराठी माणसाला चिरडून टाकायचे आणि पुन्हा मराठी, अमराठी असे राजकारण करायचे. स्वत:च्या राजकारणाच्या तुंबड्या भरून घ्यायच्या. आपले विरोधक कोणी असतील तर त्यांना संपवायचे. असे हे भाजपचे कारस्थान अत्यंत निष्ठुरपणे जनतेसमोर आले आहे, असे ठाकरे म्हणाले. प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला. पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचे भाजपचे कारस्थान असून, त्याची सुरुवात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यातून झालेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

उद्धव यांनी यावेळी सध्याच्या काँग्रेसच्या परिस्थितीचा संदर्भही दिला.आज काँग्रेसची परिस्थिती पाहिल्यानंतर लगेच जे कोणी सत्तेत बसलेले आहेत, त्यांनी मोठमोठ्या बढाया मारण्यात अर्थ नाही, असा टोला ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री जरुर होतो. पण त्या अडीच वर्षाच्या काळात माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्रिपदाची हवा गेली नव्हती. मी ती जाऊ दिली नव्हती. मला त्याचा स्पर्शही झाला नव्हता. याचे कारण शिवसेनाप्रमुख जे सांगायचे की पदे असतील, सत्ता असेल ती  येते जाते. मात्र लोकांशी नेहमी नम्र राहा. मी नम्र राहण्याचा प्रयत्न नेहमी करत आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचाः संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी, जाणून घ्या काय आहेत आरोप?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -