घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या आव्हानानंतर राज्य बँक घोटाळ्यात आरोपपत्र दाखल, अजित पवारांचे नाव वगळले

शरद पवारांच्या आव्हानानंतर राज्य बँक घोटाळ्यात आरोपपत्र दाखल, अजित पवारांचे नाव वगळले

Subscribe

शरद पवारांनी घोटाळ्यांच्या मुद्द्यावरून वक्तव्य करताच एका दिवसाच्या आत ईडीकडून राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडण्यापूर्वी बुधवारी (ता. 30 ऑगस्ट) महाविकास आघाडीने पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना थेट आव्हानच केलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ राज्य सहकारी बँक घोटाळा, जलसंपदा घोटाळा असे राष्ट्रवादीवर आरोप करून थांबू नये, तर सखोल चौकशी करून त्याची माहिती देशाला द्यावी, असे म्हटले होते. ज्यानंतर आता अवघ्या एका दिवसाच्या आत ईडीकडून राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ईडीकडून ज्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील नाव होते. परंतु हे नाव आता वगळण्यात आले आहे. ( Chargesheet filed in Rajya Bank scam after Sharad Pawar’s challenge, Ajit Pawar’s name omitted)

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपपत्रात राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांची नावे

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये 14 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला असला तरी आरोपपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव वगळण्यात आले आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय यादीमध्ये प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजीत देशमुख, प्रसाद सागर, अलाईड अॅग्रो प्रोडक्ट, तक्षशिला सिक्युरिटीज, समीर मुळ्ये, अर्जून खोतकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवार हेही अडचणीत आले होते. 2010 मध्ये शिखर बँकने राम गणेश गडकरी साखर कारखाना विकला होता. साखर कारखान्याची विक्री किंमत 26 कोटी 32 लाख रुपये, तरीही हा कारखाना अवघ्या 12 कोटी 95 लाखांना विकण्यात आला. त्यानंतर, या प्रकरणात अपेक्षित प्रक्रिया राबवली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. यावेळी बँकेच्या संचालक पदी अजित पवार होते. ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडे वर्ग करण्यात आला.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवारांनी मोदी सरकारला घोटाळ्यांबाबत चौकशी करण्याचे आदेश देताच बँकेच्या घोटाळ्यात राष्ट्रवादींच्या नेत्यांचे नाव समोर आले. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये शरद पवार यांच्या गटातील ज्या नेत्यांची नावे समोर आलेली आहेत, त्यांच्यावर ईडीकडून नेमकी काय कारवाई करण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर याआधी या प्रकरणात अजित पवारांच्या नावाचा समावेश होता. परंतु आता या आरोपपत्रातून त्यांचे नाव वगळण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -