नाशिक : मी नाशिक लोकसभा निवडणूक लढवावी, असा निर्णय दिल्लीतील वरिष्ठांकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीतील नेते सांगतील त्याप्रमाणे काम करणार, असेही भुजबळांकडून सांगण्यात आले. परंतु, यामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण नाशिक लोकसभेत शिवसेनेचे (ठाकरे गट) विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आधीच प्रचाराला सुरुवात केवी आहे. (Chhagan Bhujbal big statement about contesting Nashik Lok Sabha)
हेही वाचा… Devendra Fadnavis : महायुतीत अजूनही 4-5 जागांचा तिढा, फडणवीसांनीच केले मान्य
शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. परंतु, नाशिक लोकसभेमुळे मुख्यमंत्री शिंदे चिंतेत सापडणार आहेत. कारण विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी या लोकसभेतून निवडणूक लढण्याबाबत ठाम भूमिका घेतली असून त्यांनी प्रचाराला ही सुरुवात केली आहे. पण दुसरीकडे मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, असा निर्णय दिल्लीतील वरिष्ठांकडून घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना दिली.
नाशिक येथे आज (ता. 30 मार्च) प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मी निवडणूक लढवावी, अशी चर्चा दिल्लीत झाली. दिल्लीतील वरिष्ठांनी ही चर्चा केली. महाराष्ट्रात कोणती जागा कोणी आणि कोणत्या उमेदवाराने लढवायची, याबाबतची दिल्लीत चर्चा सुरू असताना माझे नाव समोर आले. त्यानंतर त्यांनी भुजबळांनी ही नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवावी, असा निर्णय घेतला. पण याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती. उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह देखील नव्हता.
तर, दिल्लीत बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली. मला बोलविण्यात आले. मी होळीच्या दिवशी मुंबईहून नाशिकला यायला निघालो. मला पुन्हा मुंबईला बोलावण्यात आले. तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले माझ्या उमेदवारीची चर्चा आहे ते खरे आहे का? फडणवीसांनी मला सांगितले हो खरे आहे. त्यामुळे तुम्हालाच उभे राहावे लागेल, असे सांगत त्यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढण्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
तसेच, ज्याला उभे राहायचे असते तो चार पाच महिन्यांपासून चर्चा करतो. मात्र माझे नाव अचानक पुढे आल्यानंतर आमची काही लोकांसोबत चर्चा सुरु झाली. त्यावेळी ही गोष्ट मिडियापर्यंत पोहोचली. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा उमेदवारीचा फार आग्रह आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत चर्चा सुरु आहे. जो निर्णय वरिष्ठ देतील, तो मला मान्य आहे. महायुतीसाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करणार आहोत. महायुतीकडून राष्ट्रवादीला नाशिकची जागा सुटली तर राष्ट्रवादीचे घड्याळ हीच निशाणी असणार आहे, असेही छगन भूजबळ यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.