घरमहाराष्ट्रएलईडी बल्ब खरेदी भोवली

एलईडी बल्ब खरेदी भोवली

Subscribe

चौक ग्रामपंचायत बरखास्त

खालापूर तालुक्यातील महत्त्वाच्या आणि मोठ्या चौक ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता आढळल्याने ती बरखास्त करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांकडून ग्रामपंचायत बरखास्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. एलईडी बल्ब खरेदी प्रकरण पंचायतीला भोवले असून, दिवा उजळण्यापूर्वीच विझल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

चौक ग्रामपंचायतीत एलईडी बल्ब खरेदी प्रकरणात जास्त रकमेची निविदा स्वीकारण्यात आली असून, जादा दराने सर्व साहित्य खरेदी करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या सदस्या सुषमा गावडे यांनी केला होता. या प्रकरणात गावडे यांचे पती सुरेश गावडे यांनी आवाज उठवून या गैरकारभारात तत्कालीन ग्रामसेवक अनंतकुमार सूळ, सरपंच लता कोंडीलकर यांच्यासह त्यांना सामील सदस्याविरोधात तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषदेपर्यंत लढा दिला. गावडे दाम्पत्य अलिबाग येथे बेमुदत उपोषणालादेखील बसले होते. अखेर याची संपूर्ण चौकशी होऊन कारभारात अनियमितता आणि एलईडी खरेदीत भ्रष्टाचार असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले. त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी सावरोली ग्रामपंचायतदेखील भ्रष्टाचार प्रकरणी बरखास्त झाल्यानंतर सरपंचासह, सामील सदस्यांवर पंचायत समितीकडून गुन्हे दाखल होऊन भ्रष्टाचार्‍यांना पोलीस कोठडीत बसण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता चौक प्रकरणात काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. ग्रामसभेला पुरेसा कोरम नसणे यासारख्या अनेक तक्रारी आहेत. गावातील रस्ता रूंदीकरण, बंदिस्त गटारे, व्यापार संकुल, डम्पिंग ग्राऊंड, स्कायवॉकसारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. असे असताना फक्त वर्कऑर्डर घेणे-देणे यातच कारभारी गुंतल्याची खंत एका जबाबदार नागरिकाने बोलून दाखवली. या निकालाच्या विरोधात ग्रामपंचायत राज्य सरकारकडे अपील करणार का, याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. सरपंच बाहेरगावी असल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

चौक ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली असून, पंचायत समितीचा विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी प्रशासकीय कारभार पाहणार आहे. सावरोली ग्रामपंचायतीत आर्थिक भ्रष्टाचार होता. त्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल केले होते. चौक प्रकरणात अनियमितता असल्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल करणार नाही. चौक ग्रामपंचायत सदस्य अपिलात गेल्यास ग्रामपंचायतीला मुदत वाढ मिळेल.
-संजय भोये, वरिष्ठ गट विकास अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -