घरमहाराष्ट्रपालघर हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे

पालघर हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आल्याचीही महत्त्वपूर्ण माहिती सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधताना ठाकरे यांनी पालघरच्या दुर्दैवी घटनेचा विस्तृत आढावा घेतला. गेल्या पाच वर्षांतही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झाले असून असे प्रकार कुठल्याही परिस्थितीत होता कामा नयेत. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने १०० पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देऊ नये आणि राजकारण करू नये, असेही आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

पालघरमधील घटनेत जमावाने चोर समजून दोन साधूंसह तीन जणांना अतिशय निर्घृणपणे ठार मारले होते. जिथे हा प्रकार घडला तो भाग पालघरपासून ११० किमी अंतरावर आहे. सरळ मार्गाने जाता येत नाही, हे लक्षात येताच दोन साधू वाहन चालकासह दुर्गम भागातून जात होते. हे गाव दादरा नगर हवेलीपासून काही मीटर अंतरावर आहे. केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरू होते. तिथे त्यांना अडवले गेले आणि त्यानंतर त्यांना परत पाठवले गेले. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. या परिसरात गेले काही दिवस चोर फिरत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. मोठ्या गैरसमजातून हा प्रकार घडला, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ही घटना रात्री जेव्हा घडली तेव्हा मध्यरात्रीही पोलीस पोहचले. पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना पकडलं. आम्ही कारवाई केलेली असून या प्रकरणावरून आता राजकारण करू नये. मी या घटनेत जात-पात-धर्म पाहिलेला नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. पालघर प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. यामध्ये नऊ मुलं अल्पवयीन आहेत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणातल्या पाच म्होरक्यांनाही अटक केली आहे, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

उद्योग हळूहळू सुरू
राज्यातील उद्योग हळूहळू सुरू झाले आहे. मात्र लॉकडाऊन संपलेला नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. गर्दी वाढली, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही तर पुन्हा बंधनं टाकावी लागतील. आज महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडून सहा आठवडे पूर्ण झाले आहेत. या सहा आठवड्यांमध्ये आपण संयमाने घरात बसला आहात. मात्र या सगळ्या दिवसांमध्ये पोलीस, आरोग्य सेवेतील कर्मचारी, स्वच्छता विभागातील कर्मचारी हे सातत्याने काम करत असून हे आपले लढवय्ये आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे-अमित शहा चर्चा
या प्रकरणाविषयी उद्धव ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली आहे. अमित शहा यांनी ठाकरे यांना या प्रकरणी आश्वस्त करताना त्या भागात धार्मिक संदर्भ असण्याचे काही कारण दिसत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दोन पोलीस अधिकारी निलंबित
या प्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडी गुन्हे शाखेचे डीआयजी अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. घटनेला जबाबदार असणारे सगळेच गुन्हेगार तुरुंगात आहेत. आणि जे फरार आहेत त्यांना शोधून शिक्षा केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -