घरताज्या घडामोडीरेमडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक साठा असताना नागरिकांची वणवण का?

रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक साठा असताना नागरिकांची वणवण का?

Subscribe

देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यामुळे देशातील सध्यस्थिती अधिकच गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात खाटांची कमतरता भासत आहे तर कोरोनावरील इंजेक्शनसह औषधांचा पुरेसा साठा नसल्याने सर्वत्र ओरड होत असल्याचे दिसतंय. दरम्यान, कोरोनाने सगळेच जण हैराण झाले असताना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यातील आऱोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला असून रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा सर्वत्र भासतोय. अशापरिस्थितीत रेमडेसिवीर या इंजेक्शनचा साठा केला जातोय किंवा काळाबजार होत असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या उपलब्धतेवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यासोबतच राज्यात गेल्या काही दिवसांपासून लसींच्या राज्य सरकारला होणाऱ्या पुरवठ्यावरून, केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाद विवाद होताना दिसतोय. या सगळ्या गोंधळात कोरोना रुग्णांच्या जीवाचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यात कित्येक ठिकाणी कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्याठी वणवण करावी लागत आहे.

रेमडेसिवीरसाठी नागरिकांची वणवण?

एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते तर दुसरीकडे प्रत्यक्ष रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासल्यास ते मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाला धावाधाव करावी लागते, असे नागरिकांकडून सांगितले जात आहे. नागरिकांनी स्थानिक नगरसेवक, आमदार, प्रतिष्ठित व्यक्ती, रुग्णालये, औषधांची दुकाने या सर्व ठिकाणी आपल्या स्तरावर प्रयत्न केल्यानंतर त्याच्या वाटेला भ्रमनिरास आल्याचे वास्तव आहे. यासोबतच अन्न व औषध प्रशासनाने दिलेले काही नंबर बंद तर कित्येक नंबर हे संपर्कक्षेत्राच्या बाहेर. दहा ते बारा तासांची पायपीट केल्यानंतर वणवण फिरल्यानंतर एखादं इंजेक्शन उपलब्ध होतेय. हजारो इंजेक्शनचा साठा उपलब्ध असताना मग तो गरजेच्या वेळी गरजू नागरिकांना का मिळत नाही? आणि गरज असेलच तर मग बड्या नेत्यांच्या ओळखी, वशिला का लावावा लागतोय?, असे एक न अनेक प्रश्न सध्या सामान्य माणसांच्या मनात घर करताना दिसताय.

- Advertisement -

कोरोनाच्या उपचारात महत्वपूर्ण असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक हे सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी जीवाचा आकांत करताना दिसताय. मात्र, त्यांना रेमडेसिवीर मिळत नसल्याने आपल्या रुग्णाचं काय होणार याची चिंता त्यांना सतावत आहे. काही खासगी डॉक्टर रुग्णांना अनावश्यकरित्या रेमडेसिवीर हे इंजेक्शन लिहून देत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. रुग्णाचा स्कोर दहाच्या पुढे गेल्यास या इंजेक्शनचा वापर करावा असे निर्देश असतानाही अनेक खासगी डॉक्टर या इंजेक्शनची मागणी करत असल्याने या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.

राजकीय पक्षांकडून गरजूंना मोफत रेमडेसिवीर देण्यामागे राजकारण?

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी इंजेक्शनचा काळाबजार करणाऱ्यांवर कारवाई करा असा इशारा दिला असताना देखील रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी फोना-फोनी केली तरी हे इंजेक्शन वेळेत उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत काही राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन गरजूंना हे इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याचे दिसते. नुकतेच भाजपाकडून आणि राष्ट्रवादीकडून गरजूंना या इंजेक्शनचे मोफत वाटप करण्यात आले.

दरम्यान, सुरतमध्ये भाजपकडून कोरोनावरील रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत वाटप करण्यात येत आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना भाजपकडे इतक्या मोठ्या प्रमाणात साठा कुठून आला, असा सवाल केला जातोय. यावरून विरोधी पक्षांनी भाजपला लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष जरी गरजूंचा रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत वाटप करत असले तरी त्यामागे कोणता हेतू आहे की राजकारण सुरू आहे? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. एकीकडे देशात रेमडेसिवीर या कोरोनावर वापरात येणाऱ्या इंजक्शनचा तुटवडा असताना सुरत भाजप शाखेने शनिवारी औषधाच्या १००० कुप्यांचे मोफत वाटप केले. नवीन सरकारी रुग्णालय व एसएमआयएमइआर रुग्णालयात या इंजेक्शनचा साठा नसल्याचे जाहीर करण्यात आले असताना भाजपने या औषधाचे वाटप केले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांसह अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या.

तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पुणे, सोलापूरसह अहमदनगर जिल्ह्यात मोफत इंजेक्शन उपलब्ध करून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर ट्रस्टच्या तर्फे हे वाटप करण्यात आल्याने काहींची गैरसोय टळली मात्र यामध्ये राजकारण असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केल्याने सध्या राजकारणात या इंजेक्शनवरून आरोप-प्रत्यारोप होतांना दिसताय.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -