घरमहाराष्ट्रअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी!

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी!

Subscribe

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि प्रसंगी वाद झाल्याचं जरी पाहायला मिळालं असलं, तरी काही प्रसंगी झालेले विनोद आणि कोपरखळ्या वातावरण हलकं करून गेल्या. त्यातच, स्वत: मुख्यमंत्र्यांनी केलेली शेरोशायरी सभागृहात सगळ्यांचीच दाद मिळवून गेली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यंदाच्या अधिवेशनात विरोधकांनी मराठा आरक्षण, दुष्काळ, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प अशा स्वरूपाच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये शांततापूर्ण चर्चा आणि प्रसंगी कोपरखळ्या आणि विनोदाचं वातावरण पाहायला मिळालं. एकीकडे विधानपरिषद सभागृह स्थगित झाल्यानंतर सभागृहाबाहेर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार खेळीमेळीच्या वातावरणात बाहेर पडताना दिसले, तर दुसरीकडे विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी सगळ्यांचीच दाद मिळवून गेली!

माझ्यावर टिकेची करून कामना…

विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचा पाढाच सभागृहापुढे वाचला. मात्र, त्याचवेळी हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी खास शैलीमध्ये शेरोशायरी करत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणाले…

माझ्यावर टिकेची करून कामना
विखे पाटील साहेब वाचतात सामना

संघर्ष यात्रेला लाभत नाही गर्दी
म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी

- Advertisement -

जनता जनार्दन आहे आमच्या बाजूला
म्हणून तुमची खुर्ची त्याच बाजूला

२०१९चा संग्राम आला जवळ
बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ

झाला असेल उशीर पण एक लक्षात घ्या

गिरते है शेर-ए-सवार ही मैदान ए जंग में

वो तिफ्ल क्या जानो, जो चलते है घुटनों के बल पे

सेनेचा बाण आणि कमळाची जोडी!

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शेरोशायरीमधून विरोधी पक्षनेत्यांना कोपरखळी मारली असली, तरी शेवटी जाताजाता त्यांनी एक सूचक उल्लेख केला. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही? याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. शिवसेनेकडून युतीसाठी रेड सिग्नल आधीच मिळाला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेना स्वबळावर २०१९ची निवडणूक लढवणार असं जाहीर देखील केल्यानंतर काही भाजप नेत्यांनी शिवसेनेला सोबत लढण्यासाठी चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शेरोशायरीमध्ये ‘२०१९चा संग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ’, असं विधान करून शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत सुरू असलेल्या चर्चांचाच निष्कर्ष लोकांसमोर आणि विरोधकांसमोर ठेवला आहे की काय? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.


हेही वाचा – विधानभवनातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणार!

विधान परिषदेबाहेर सत्ताधारी-विरोधक एकच!

दरम्यान, विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी दाद मिळवत असतानाचा विधान परिषदेमध्ये सभागृह स्थगित झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे चेष्टा-मस्करी करत बाहेर पडताना दिसले.

BJP NCP MLA together in Vidhan Bhavan
विधान भवनात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची चेष्टा-मस्करी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -